शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही

 किशोर तिवारी यांचा निर्वाळा • निमणी कोलाम पोडवर सरकार आपल्या दारी कार्यक्रम 

0
131

यवतमाळ, ६ सप्टेंबर

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६० लाखांवर शेतकर्‍यांनी आनलाईन अर्ज भरले आहेत. कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्‍यांना व्हावा, एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी अर्ज भरताना गावातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांना मदतीचे आदेश देण्यात आले आहेत. ही मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून तांत्रिक अडचणी असल्यास वाढविण्यात येणार असल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. झरी तालुक्यातील निमणी-दाभाडी कोलाम पोड येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी सुरेश बोलेनवार यांनी आयोजित केलेल्या सरकार आपल्या दारी कार्यक्रमात दिली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेमध्ये सर्व अडचणीतील शेतकरी येतील व २००९ ते २०१६ पर्यंत पीककर्ज थकीत असलेले व बँकांनी पुनर्गठित केलेले २०१७ च्या हंगामात एकही हप्ता न भरलेले शेतकरी पात्र असल्याची माहिती देत घरात वडील व १८ वर्षांवरील सर्व वेगवेगळे सातबारा असणारी मुले स्वतंत्रपणे कर्जमाफी पात्र असून मयत शेतकर्‍यांचे वारस यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे ते तिवारी म्हणाले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी संदीप अपार, झरी तालुका तहसीलदार गणेश राऊत, झरी गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गेडाम, वणी परिक्षेत्र वन अधिकारी, पटवारी, पाटणचे ठाणेदार वाघ, आदिवासी सेवक डॉ. महेंद्र लोढा, धर्मा आत्राम, भाजपा नेते सुरेश बोलेनवार, अंकित नैताम, विलास आत्राम, भीमराव नैताम उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकर्‍यांनी आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर तसेच काही खासगी केंद्रांद्वारे शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज भरताना प्रचंड हेलपाटे व आर्थिक भुर्दंड पडत असल्याची तक्रार केल्यावर तिवारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अर्ज भरल्यानंतर एका अर्जामागे दहा रुपये सरकार देणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना पैसे देण्याची शेतकर्‍यांना गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीदेखील कोणाकडून पैशांची मागणी झाल्यास किंवा कामकाजाबाबत हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारी आल्यास आणि या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित केंद्रांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना यावेळी तिवारी यांनी दिल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार ‘सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील महसूल, कृषी, ग्रामविकास, वीज वितरण, अन्नपुरवठा, आरोग्य, रोजगार, शिक्षण, पोलिस प्रशासन यांच्या विभागाच्या तालुका व ग्रामस्तर तक्रारींची सुनावणी होणार आहे. जिल्हास्तर अधिकार्‍यांकडून समाधान व कारवाईसाठी अधिकारी-कर्मचारी चेतना जागृती अभियानाचा एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये  झरी तालुक्यातील निमणी-दाभाडी कोलाम पोड येथे सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात आला. दाभाडी, वरपोड, खडकडोह, पवनार, घोन्सा, पेंढरी, सोनेगाव व शिवपोड परीसरातील कोलाम पोडावरील आदिवासींनी जमिनीच्या मालकीचा प्रश्‍न, घरकूल योजनेच्या अडचणी, शेतकर्‍यांच्या शेती मालविक्रीसाठी येत असलेल्या अडचणी, नवीन पीककर्ज, मुद्राकर्ज वाटप, ग्रामीण जनतेला काम व खावटी, अन्न, आरोग्य, गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण, शिक्षण, प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्‍न उपस्थित केले.यावेळी आदिवासीबहुल भागात सातबारावर वारसाची नावे चढविणे तसेच पिवळ्या शिधापत्रिका वाटप नाही, अशा तक्रारी येत आहेत. अनेक कोलाम व पारधी पोडात जनतेला घरकूल मिळत नसून अनेक तांत्रिक अडचणींमुळे वर्षानुवर्षे हा प्रश्‍न रेंगाळत असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच वंचितांना आजही मूलभूत सुविधेसाठी वाट पहावी लागत असल्याने या सर्व समस्यांवर तत्काळ तोडगा काढा, असे आदेशही किशोर तिवारी यांनी दिलेत. (तभा वृत्तसेवा)