संघ समजून घ्यावा!

0
132

अग्रलेख

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सुसंस्कारित मनुष्यनिर्माण करणारी राष्ट्रवादी लोकांची सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना असल्याचे कितीदा सांगितले, तरी देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसला, डाव्या पक्षांना, मुस्लिम लीग, एमआयएम, नॅशनल कॉन्फरन्स पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उमगत नाही. खरेतर या मंडळींना संघाची ताकद माहिती आहे, या संघटनेच्या राष्ट्रनिष्ठादेखील त्यांना अवगत आहेत. पण, चांगले काही न बघण्याचा, उदात्त न ऐकण्याचा आणि हृदयावर हात ठेवून प्रामाणिकपणे न बोलण्याचा संकल्पच केला असेल, तर तुम्ही कितीही चांगल्या उद्दिष्टांनी काम करा, त्याला यांच्याकडून स्वीकारोक्ती मिळणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे! उलट, या संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये अडथळे कसे आणता येतील, यासाठी न थकता, न चुकता, नकळत अव्याहतपणे प्रयत्नरत असतात. डाव्यांचे तत्वज्ञानच मुळात हिंसाचाराने सत्ता हस्तगत करण्याचे आहे. त्यामुळेच केरळात संघ विचारांच्या कार्यकर्त्यांना टिपून मारले जात आहे आणि पुरस्कार परत करणारे कुणाच्या तरी पदराखाली लपून तमाशा पाहात आहेत. कुठे गेले ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा टाहो फोडणारे भाडोत्री. कुठे गेले ते विरोधकांचेही स्थान लोकशाहीत तेवढेच महत्त्वाचे आहे, म्हणणारे. हे सर्व लोक या विरोधकांच्या छळाला, कत्तलींना  मूक संमती देत आहेत, हे एक कटू वास्तव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि या संघटनांचे ठिकठिकाणचे नेते आणि कार्यकर्ते त्यांचे सॉफ्ट टारगेट आहेत. संघाविरुद्ध त्यांनी छुपे युद्धच सुरू केले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संघाचा कावीळ झालेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या, कोलकात्यातील कार्यक्रमाला ऐनवेळी परवानगी नाकारून आपल्या दादागिरीचे दर्शन घडविले आहे. वास्तविक पाहता हे ऑडिटोरियम जूनमध्येच संघाने बुक केले होते. पण, आता तीन महिन्यांनंतर डागडुजीच्या नावाखाली त्यांनी मोहनजींच्या सभेला परवानगी नाकारली आहे. भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतिनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोहनजी य कार्यक्रमात राजकीय भाष्य तर करणार नव्हते, ते सांगणार होते निवेदितांची महती! पण, ममता सरकारला तेदेखील नको होते. त्यांना राष्ट्रीयत्वाशी संबंधित कुठलाच कार्यक्रम पश्‍चिम बंगालमध्ये नको आहे. त्यामुळेच मोहनजींचा कार्यक्रम नाकारण्यासाठी नूतनीकरणाचे कारण सांगितले गेले. संघाचा कार्यक्रम रद्द करण्याची ममतांची ही काही पहिलीच वेळ नाही. जानेवारी महिन्यातही मोनहजींची अशीच एक ब्रिगेड परेड मैदानावर होणारी जाहीर सभा रोखण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी केला होता. पण, संघाने कोर्टात धाव घेऊन सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. कोर्टाच्या अनुमतीने नंतर हा कार्यक्रम पार पडला. तो दणका बसूनही ममतांना काही शहाणपण आलेले दिसत नाही. मागे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही स्टेडियम नाकारण्यात आले होते. पश्‍चिम बंगालात सध्या दहशतीचे वातावरण आहे. राज्य सरकार मुस्लिमांपुढे मान तुकवून उभे आहे. राज्यात सूर्यनमस्कार घालणे, योगा करणे यावरही बंधने आणली गेल्याची उदाहरणे आहेत. कुठेही जातीय तणाव झाला की त्यात हिंदूंना कसे बदनाम करता येईल किंवा त्यासाठी त्यांनाच कसे जबाबदार धरता येईल, याची कारणे शोधून ठेवलेली आहेत. काही पोलिस अधिकार्‍यांना तर तसे तोंडी आदेशच देण्यात आले आहेत. मुस्लिमांचा सण मुहर्रम आणि दुर्गापूजा यंदा एकाच दिवशी येत असल्याने तणाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ममतांनी दुर्गाविसर्जनाचा मुहूर्त टाळून तो दुसर्‍या दिवशी करण्याचा घाट घातला आहे. सारा त्याग हिंदूंनीच करायचा, इतर समाजांनी आपापले धार्मिक अधिकार पूर्ण वापरून पुण्य पदरात पाडून घ्यायचे. हा कुठला न्याय? पण, मुस्लिमभक्तीने, त्यांच्या व्होटबँकेमुळे अंध झालेल्या ममतांनी, आपण या देशाच्या संस्कृतीचे, परंपरांचे पालन करणार्‍या लोकांचाच छळवाद मांडलाय्, हे सांगण्याची वेळ आली आहे. संघाविरुद्ध डाव्यांनीदेखील केरळात उच्छाद मांडला आहे. संघ स्वयंसेवकांची हत्या घडवून आणण्यासाठी कन्नूर मॉडेल विकसित करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर तर ममतांना पावले टाकायची नाहीत? भारताने लोकशाही स्वीकारलेली आहे. आणि लोकशाहीत जितके महत्त्व सत्ताधारी पक्षाला आहे, तितकेच महत्त्व विरोधकांनादेखील द्यायलाच हवे. मतस्वातंत्र्य तर राज्यघटनेनेच या देशातील प्रत्येक व्यक्तीला दिलेले आहे. मग कार्यक्रम नाकारून, भाषणाला परवानगी नाकारणे, हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ला ठरत नाही का? खरे तर संघाचा कार्यक्रम रद्द करण्यामागे राजकारण आहे. ममता बॅनर्जींनी मुस्लिमांची खुशामतखोरी सुरू केली आहे. पश्‍चिम बंगालमध्ये शेकडोंनी बांगलादेशी मुस्लिमांनी घुसखोरी केली असून, त्यातील अनेकांनी मतदानाचा अधिकारदेखील मिळविलेला आहे. अनेक मतदारसंघात कोण निवडून येईल, याची समीकरणे घुसखोरांच्या मतांवर निर्भर आहेत. ही एकगठ्‌ठा मते मिळविण्यासाठी केवळ संघावर टीका करणे, त्यांच्या नेत्यांना नामोहरम करणे, ही एकमेव पात्रता नेत्यामध्ये असणे अनिवार्य असून, ती पात्रता मिळविण्यासाठीच ममतांची धडपड सुरू आहे. कोलकाता पोलिस आता यात राजकारण नसल्याचा खुलासा करीत फिरत आहेत. पण, त्यांच्या खुलाशावर सहजासहजी विश्वास बसावा, हे या दूधखुळ्यांना कसे कळावे? प्रशासन कुणाच्या मर्जीनुसार चालते, हे या देशातील जनतेला कुणीही सांगू नये. संघाला विरोधकांचे वार सहन करण्याची आताशी चांगलीच सवय झाली आहे. मध्यंतरी पलक्कड जिल्ह्यातही स्वातंत्र्यदिनी एका शाळेत ध्वजारोहण करण्याच्या कार्यक्रमात डॉ. मोहनजी भागवत यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. पण, अखेर राष्ट्रवादाचा विजय होऊन सरसंघचालकांनीच ध्वज फडकावला. या देशातील एखाद्या व्यक्तीला ध्वजारोहणापासून रोखणे हा गुन्हा आहे, हेदेखील विरोधकांना माहीत नाही, याची कीव येते. पडले, झडले, नाक फुटले, तोंड फुटले तरी विरोधकांची संघाविरुद्धची कावकाव नाहीशी होण्याचे नाव नाही. संघस्थापनेची ९० वर्षे उलटून गेली, तरी विरोधक संघाच्या नावाने शंख फुंकतच आहेत. नागपूर महानगरात मोहिते शाखेत ८-१० युवकांनी स्थापन केलेल्या संघाने आज विराट रूप धारण केले, त्यामागची कारणे विरोधकांनी जाणून घ्यायला हवी. विरोधकांची राजकीय शक्ती क्षीण होताना दिसत असतानाही, त्यांनी यापासून धडा घेतला नाही, संघाचे संघटनकौशल्य जाणून घेतले नाही, त्यांची कार्यशैली आत्मसात केली नाही, तर आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यापासून साक्षात ब्रह्मदेवदेखील आपल्याला रोखू शकणार नाही! ममतांना भाजपाला रोखायचे आहे. पण, कोंबडा झाकला तरी सूर्य उगवतोच. अटलजी भाजपाच्या स्थापनेच्या वेळी म्हणाले होते… अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा…पश्‍चिम बंगालमध्ये आता कमळ उगवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ना ममता, ना डावे.