भिकार दुबळी वृत्ती…

0
34

कल्पवृक्ष

एक माणूस होता. गेल्या काही वर्षांपासून तो त्रस्त होता. सतत अडचणी, संकटं, वेगवेगळ्‌या समस्या यांचा त्याला सामना करावा लागत होता. एकदा त्या गावात एक गुरुमहाराज आले. तो एक दिवस त्यांना भेटायला गेला. त्यांना तो म्हणाला, ‘‘महाराज, मला काहीतरी मंत्र सांगा, ज्याचा जप केल्यामुळे माझ्या सर्व समस्या दूर होतील.’’ गुरुमहाराजांनी त्याला खूप समजावून सांगितले, की काही मंत्र नसतो, ज्यामुळे सार्‍या अडचणी तत्काळ दूर होतील.’’ पण, तो ऐकायलाच तयारच नव्हता. ‘‘तुम्ही फार मोठे गुरू आहात, त्यामुळे तुमच्याजवळ असा मंत्र असलाच पाहिजे.’’ शेवटी गुरूंनी त्याला एक मंत्र सांगितला. सकाळी त्याचा जप केला की सर्व समस्या दूर होतील, असे त्यांनी विश्‍वासाने सांगितले. त्या माणसाला खूप आनंद झाला. गेले किती दिवस झाले, तो अशाच साधूच्या शोधात होता. नाचतच तो बाहेर पडला. इतक्यात गुरूंनी पुन्हा आवाज दिला. ते म्हणाले, ‘‘अरे, एक नियम सांगायचा राहिला. मंत्रजप करताना माकडांची आठवण काढायची नाही.’’ तो म्हणाला, ‘‘महाराज, काही चिंता करू नका. गेले अनेक महिने झाले, मला कधी माकडाची आठवण आली नाही.’’ दुसरे दिवशी तो सकाळी उठला. स्नान करून मंत्रजप सुरू केला. आणि काय दुर्दैव! नेमके फक्त माकडच त्याच्या डोळ्‌यांसमोर नाचायला लागले. खूप प्रयत्न केला, पण माकडांचे काही विस्मरण होत नव्हते. अनेक दिवस तो प्रयत्न करत होता. पण, जपाला बसला की माकडांची आठवण हजर! शेवटी कंटाळून तो पुन्हा गुरूंकडे गेला. त्यांना म्हणाला, ‘‘हा नियम तुम्ही सांगितला कशाला? तुम्ही तो सांगितला नसता तर माकड कधीच आठवले नसते.’’ गुरुमहाराज खळखळून हसले. ते म्हणाले, ‘‘हा नियम माझा नाही. आपल्या मनाचा आहे.’’ माकडांची आठवण करायची नाही, असे ठरविले तर ती होणारच. अनेकदा माणूसही असाच दु:ख, अडचणी, समस्यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. ते विसरण्याचा प्रयत्न करतो. पण, ती अधिकाधिक माणसाला छळतात. असा एखादा मंत्र शोधणे, ही एक पळवाटच असते. व्यसनाधीन होणे हीसुद्धा एक पळवाटच असते. माणूस मन कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करतो, तात्पुरते काही काळ यश मिळते. पण, पुन्हा ती समस्या उसळून वर येते. पेनकिलरने वेदना काही वेळापुरत्या कमी होतात, पण रोग समूळ नष्ट होत नाही. माणूस त्याच त्या विचारांच्या भोवर्‍यात फिरत असतो. त्यातच गटांगळ्या खात असतो.एक माणूस सार्‍या कटकटींना, अडचणींना कंटाळून संन्यास घेण्याकरिता संध्याकाळीच घराबाहेर पडतो. हिमालयाच्या दिशेने चालू लागतो. रात्र होते. सर्वत्र अंधार असतो. गाव केव्हाच मागे पडले असते आणि समोर दूर एका वळणावर त्याला अचानक भूत दिसते. भूत चांगलेच उंच असते. तो घाबरतो. तेथेच थांबतो. काय करावे त्याला सुचत नाही. शेवटी तो परत जाण्याचा निर्णय घेतो. मागे फिरून तो चालू लागला, तितक्यात भला मोठा लांब साप रस्त्यात आडवा पडलेला होता. त्याला खूप भीती वाटली. समोर भूत आणि मागे साप! समोरही जाणे शक्य नाही आणि मागेही जाता येत नाही. रात्रभर उपाशीपोटी तो रस्त्यातच अडकून पडला. माणूसही अशाच स्थितीत फसतो. कोणत्याही मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, तरी समोर भुतांसारखी अज्ञाताची भीती असते आणि मागे सापासारखी संकटं डोळ्यांसमोर उभी असतात. थांबून जातं अंधारातच आयुष्य, उपाशीपोटी. जीवनाचा आनंदही घेता येत नाही. कोणत्याही मार्गाने पळण्याचा प्रयत्न केला तरी हेच वाट्याला येणार. कारण मन, विचार, स्वभाव तोच आहे ना! संन्यास घ्यायला निघालेला माणूस असा मध्येच लटकला. रात्र संपत आली. पहाटेच्या अंधारात त्याला कोणीतरी समोरून येताना दिसला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, ‘‘तेथे भूत असताना तुम्ही कसे आलात?’’ त्याने विचारले, ‘‘कुठे आहे भूत?’’ या माणसाने तिकडे बोट दाखवले. ‘‘अहो, तो इलेक्ट्रिकचा खंबा आहे.’’ असे म्हणून तो सरळ चालायला लागला. याने त्याला थांबवले. समोर साप असल्याचे सांगितले. आता प्रकाश पडायला सुरुवात झाली होती. तो साप नसून दोरखंड असल्याचे स्पष्ट झाले. ज्ञानाचा प्रकाश पडल्याशिवाय संकटांचे स्वरूप स्पष्ट होत नाही. आपले मन एक भयानक विश्‍व उभे करत असते. पळून जाण्यापेक्षा समस्यांना तोंड देण्याची गरज असते. त्या समजून घेण्याची आवश्यकता असते. आपण समजतो तेव्हढ्या आपल्या समस्या महाभयंकर नसतात, हे जगाकडे पाहिल्यानंतर कळते. आहे ती परिस्थिती स्वीकारण्याची गरज असते. विसरण्याचा प्रयत्न केल्याने ती बदलत नसते. उलट, ती स्वीकारून आपल्या हातात काय आहे, आपण काय करू शकतो, याचा विचार करता येतो. ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत, त्यांची चिंता करण्यात अर्थ नसतो. समस्यांच्या मुळाशी जाणे, हाच खरा मंत्र आहे. खरे तर समस्या, अडचणी, संकटं, या ऐवजी आपण त्यांना आव्हाने, चॅलेंजेंस म्हटले पाहिजे. म्हणजे आपल्यातला पुरुषार्थ जागा होतो. लांबचा प्रवास करायचा असेल तर खाचखळगे, वळणं, गतिरोधक, गाडी खराब होणे, ट्रॅफिक जाम या सर्वांची तयारी ठेवलीच पाहिजे. आव्हानं स्वीकारताना त्या त्या वेळच्या परिस्थितीचे वास्तव आकलन करून, सर्व पर्यायांचा विचार करून, आपल्या सर्व प्रकारच्या क्षमता वापरून मार्ग काढण्यातच खरा पराक्रम असतो. दारू पिणे, अकांडतांडव करणे, एखाद्या बाबाच्या मागे लागणे, नुसतेच नवस करत सुटणे, हे मार्ग नसतात. श्रद्धा असावीच. त्यामुळेच मन शांत, संयमित ठेवून, विवेक जागा करून तर्कशुद्ध विचार करता येतो.कृष्णाने अर्जुनाला गीतेत दिलेला संदेश आपल्याकरिता कायम प्रेरणा देणारा आहे. श्रीकृष्ण त्याला म्हणतो,निर्वीर्य तू नको होऊ, न शोभे हे मुळी तुज| भिकार दुबळी वृत्ति सोडुनी उठ तू कसा॥या एका श्‍लोकात गीतेचे सार आहे, असे विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात.

रवींद्र देशपांडे ८८८८८०३४११