आपले व्यक्तिमत्त्व कसे उज्ज्वल कराल…?

0
60

प्रबोधन

समाजात राम-रावण प्रवृत्तीची माणसे असताना आपल्याला काय व्हायचे, हे आपण ठरवायचे असते. म्हणून भा. रा. तांबे म्हणतात-‘ये बाहेरी तू अंडे फोडूनी| शुद्ध मोकळ्या वातावरणी॥का गुदमरसी आतच कुठूनी| रे मार भरारी जरा तरी|रे मना बघ जरा तरी|’प्रत्येक व्यक्तीची ओळख त्याच्या व्यक्तित्वाने होते. ज्यांचे चरित्र आणि चारित्र्य उज्ज्वल असते त्यांचीच समाजात प्रतिष्ठा असते. म्हणून आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व उज्ज्वल व्हावे असे वाटत असेल, तर त्याकरिता काही विशिष्ट गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यावयास हवे.पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आचरण शुद्ध आणि पवित्र असावे. ज्याप्रमाणे फुलांना महत्त्व त्यांच्या सुगंधामुळे असते उदा.- मोगरा, चमेली, शेवंती- प्रत्येकाचा सुगंध मन मुग्ध करून पुन:पुन्हा घेतो. शुद्ध-सात्त्विक प्रेम आपल्या जीवनाचा मूलाधार हवा. तरच समाजात आपली लोकप्रियता वाढेल. आमचे जीवन सद्गुणांच्या साधनेने ओतप्रोत भरलेले असावे, त्यात दुर्गुणांच्या मिठाच्या खड्याचे नावसुद्धा नको. व्यक्ती पोशाखाने श्रेष्ठ होत नाही तर पौरुषाने श्रेष्ठ ठरते. आमचा पुरुषार्थ केवळ शरीरशृंगाराकडे नसावा, तर आमचे शुद्ध चारित्र्य जीवनभर आम्हाला तेजस्वी करील. सद्गुणांमुळेच व्यक्ती समाजात, राष्ट्रात उच्चपदी आढळते. अगदी खांद्यावर पंचा पांघरून आणि चरखा चालवून महात्मा गांधी उज्ज्वल झाले. ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तेे मी मिळविणारच!’’ म्हणून लोकमान्य टिळक राष्ट्रीय नेते झाले. प्रत्येक माणूस देशभक्त व्हावा म्हणून डॉ. हेडगेवारांनी रा. स्व. संघ शाखांद्वारे समर्पणभाव देशाप्रती वाढवला आणि आज लोक त्या संघटनेकडे आदराने बघतात. अशी कितीतरी यादी देता येईल. ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ म्हणून आपली विद्या साधनेत घालविणे व्यक्तिविकासाकरिता अत्यंत फार मोठा चांगला परिणाम करू शकते, हे पक्के लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्तीला आपली कीर्ती, प्रशंसा, मान-सन्मान स्वभावत: आवडतो. त्यामुळे तुम्ही त्याच्या कार्याची बूज राखली तर तोदेखील तुमच्या कार्यात आनंदाने मदत करील, हे पक्के लक्षात ठेवा. ‘द्यावे तसे घ्यावे’ हा प्रकृतीचा नियम आहे.  द्वेष, मत्सर, ईष्यार्र् मनात ठेवून त्याच्यामागे त्याची बदनामी करू नका. इतरांनी अत्यंत कठीण परिस्थितीत उन्नती केली, हे माहीत असल्यानंतर आपणही तशी उन्नती करण्याचा प्रयत्न करावा.सर्व देशप्रेमी व्यक्तींच्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचा गुण आढळतो तो म्हणजे सात्त्विकता. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी तो असेल ती व्यक्ती विनम्र, सरळ आणि विचाराने सात्त्विक निश्‍चित असते. तेव्हा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला आत्मविश्‍वास दृढ ठेवा. ज्याचा आत्मविश्‍वास पक्का तो कितीही मोठी संकटे आली तरी घाबरून जाणार नाही. ज्याच्याजवळ आत्मविश्‍वास नाही त्याने आयुष्यात काहीही मिळविले नाही असे समजा. ज्याच्याजवळ आत्मविश्‍वास असतो त्याच्या मुखमंडळाची आभा कधीही मलिन होत नाही.सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे वेळेचे भान ठेवा. वेळेची गती, स्वभाव आणि प्रवृत्ती ओळखून जी व्यक्ती काम करते तिला यशस्विता हमखास मिळते. ज्याला हे कळले नाही त्याचे जीवन असफल झाले तर नवल कसले? ‘टाईम इज मनी’ असे म्हटले आहे ते त्याकरिताच. वेळेचा उपयोग ज्याने योग्य रीतीने केला तो उंचीवर पोहोचणार हे निश्‍चित! कारण ‘थांबला तो संपला’ हे सर्वांना विदितच आहे. आपल्याला मिळालेला वेळ योग्य आणि चांगल्या कामासाठी द्या. परमेश्‍वराची साथ नक्की मिळेल.समाजात काम करताना इतरांप्रती स्नेह आणि सहानुभूती अवश्य ठेवा. प्रेम दिल्याने वाढते हे लक्षात ठेवा. गरजवंताला केलेली मदत, तो गरजवंत आणि परमेश्‍वराने पाहिली की ती मदत दुपटीने निश्‍चितच वाढते, हे कायम लक्षात ठेवा. कधीही विनाकारण कुणाचाही अपमान करू नका. तो जगन्नियंता वर हे सर्व बघतो, मग एखादे वेळी तोसुद्धा तुम्हाला तुमच्या केलेल्या कर्माचा साक्षी होऊन तुमचा त्यापेक्षा आणखी जास्त अपमान करवितो. परमेश्‍वराच्या घरी नेहमीच योग्य न्यायनिवाडा होतो, हे पक्के ध्यानी ठेवा. इतरांचे अवगुण बघण्यापेक्षा त्यांचे गुण बघा. त्या गुणांची प्रशंसा करा, ती सत्यावर आधारित असू द्या. खोटी प्रशंसा कुचकामी असते. म्हणून ‘सन्मार्ग टाकुनी भलो न जाती’ असा आपला व्यवहार ठेवा. आपला स्वभाव असा ठेवा की, आपण इतरांना हवेहवेसे वाटू लागावे. आपल्या मृदु स्वभावाने, गोड बोलण्याने इतरांची मने जिंकण्याचा सतत प्रयत्न करा. प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत करा. तुमचे दोन गोड शब्द त्याच्या हृदयावर नक्कीच कोरले जातील!जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट आचरण्याकरिता सदैव तत्पर असा, ती म्हणजे आपल्या हातून झालेली चूक कबूल करा. अशीच व्यक्ती घरात, समाजात, गावात, देशात लोकप्रिय होते. आपल्याकडून चूक झाल्यास कोणी दाखवून देण्यापेक्षा ती स्वत:च कबूल करण्यात मनाचा मोठेपणा दिसतो.जीवनात व्यसनांपासून दूर राहा. कारण व्यसनाधीन मनुष्य आपल्याच हातांनी आपल्याच संसाराची राखरांगोळी करतो. व्यसनांनी शारीरिक दुर्बलता येते. दुर्बल व्यक्तींना कोणतेही रोग फार लवकर जडतात. व्यसनाधीनतेमुळे कामाची गती मंद होते आणि आळस वाढतो. आळस माणसाचा शत्रू नंबर एक आहे. धूम्रपान, जर्दा, गुटका, दारू इ. मादक पदार्थ जीवनाची खूप खराबी करून टाकतात. आजकाल फॅशनच्या नावाखाली आणि त्या पदार्थाचे सेवन प्रतिष्ठितेचा विषय समजून, मित्रपरिवारात राहावे लागते असे मानून, तरुण पिढी त्यामागे नकळत जात आहे. पण, यासारखी मूर्खता अन्य दुसरी कोणतीही असू शकत नाही. यामुळे आपलेच पैसे आपणच बरबाद करतो.भारत देश हा सद्गुणांच्या प्रकाशात रममाण होणारा आहे. येथे मूल्यशिक्षण संतांनी पदोपदी शिकविले आहे. मग तो गोरा कुंभार असो, सावता माळी असो, समर्थ रामदास स्वामी असोत. सर्वांनी सर्वाभुती परमात्मा बघण्याची शिकवण दिली आहे. गोरा कुंभाराने सोन्याच्या कड्यावर माती टाकली, पण ते चोरून गाठीशी बांधले नाही. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी असे संत सावता माळी सांगून गेलेत. आपल्या पुरुषार्थ वैभवे इतरास सुखी करावे, परंतु कष्टी करणे ही राक्षसी क्रिया असे समर्थ सांगतात. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श बाळगून देशाचे नाव उंचावेल असे कार्य करा. आपला देश आदर्शपुरुषांची खाण आहे. त्यांच्यापासून गुण घ्या, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करा आणि एक चांगला नागरिक बना. लष्करात मोठे अधिकारी व्हा. संशोधक व्हा. प्रत्येकाने व्यसनापासून दूर आणि सात्त्विक गुणांची वाढ हा नियम जीवनात पाळला, तर जीवन स्वच्छ आणि शांत राहील. अशी स्वस्थ आणि शांत व्यक्तीच निरंतर स्वत:ची, समाजाची, देशाची प्रगती करू शकते.ज्यांना वर सांगितलेली व्यसने एकदा लागली, तर ती सुटणे अशक्यप्राय होऊन बसते. ते घेतल्यावर तो स्वत:चा राहातच नाही, मग ते इतरांचे काय भले करणार? जे मित्र त्याला या व्यसनांच्या नादी लावतात ते मित्र नसून त्याचे पक्के शत्रू समजा! मित्रानो, लक्षात असू द्या की, जीवन मिळाले त्याचा सदुपययोग करा. विनाकारण वाईट सवयींच्या नादी लागून जीवन बरबाद करू नका. ‘सत्कर्मयोगे वय घालवावे’ ही समर्थशिकवण पदोपदी अंगी बाणा आणि आपले, आपल्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे भले होण्याकरिता जीवनात थोर महात्म्यांचे चरित्र जीवनात स्वीकारून जीवनाचे सोने करा.

डॉ. वनमाला क्षीरसागर, नागपूर