वैभव : देवाचे की स्वत:चे?

0
78

अध्यात्म

‘मंदिरे’ भारतीय संस्कृतीचे एक महत्त्वाचे, आदराचे आणि जिथे आल्याने मन:शांती मिळते असे स्थान. भारतीय संस्कृतीत देव आणि मंदिरे ही अध्यात्माचे केंद्रस्थान मानले जाते. मानवाने जसजशी प्रगती केली तसतसा बदल या मंदिरामधेही घडत गेला.आज प्रत्येक मंदिरात देवाची अप्रतिम अशी सजावट केलेली दिसते. सोन्या-चांदीचे दागिने, वस्त्रालंकारादी गोष्टींनी देवांना सुशोभित केले जाते. या सर्व गोष्टीतून कोणता देव अधिक श्रीमंत आहे, याची स्पर्धा सुरू होते व या स्पर्धेतून पुढे मंदिराला बाजारीकरणाचे स्वरूप प्राप्त होते. मंदिरात चोर्‍यांचे, भांडणांचे, तंटे-बखेड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मनुष्याला देवाचे वैभव कशात आहे, हे कळतच नाही. केवळ सोने, चांदी, हिरे, पैसा याने देवाचे वैभव वाढत नाही, तर देवाचे कार्य केल्याने देवाचे वैभव वाढते.   मनुष्य आपल्याप्रमाणे देवाचा विचार करतो. देवाचे वैभव म्हणजे काय? हे कसे वाढवावे? यासंबंधी समर्थ रामदासस्वामींनी फार मोलाचे विचार मांडले आहेत.देवाचे वैभव वाढवावे, हे समर्थांनी आपले जीवितकार्य निश्‍चित केले होते. स्वातंत्र्याकरिता लोकांना उत्सवादी कार्याची कास निर्भयतेने धरायला समर्थांनी शिकविले. धार्मिक अन्यायामुळे भेदरून स्वस्थ बसलेल्या जनतेला देवविषयक वर्तनाचे स्वातंत्र्य संपादन करण्याचा कित्ता समर्थांनी घालून दिला. लोकांना राजी राखून त्यांना देवाच्या वैभवाचा अभिमान समर्थांनी शिकविला. देऊळ हे देवभक्तीच्या शिक्षणाचे व संघटनेचे केंद्र होय, अशी खूणगाठ मनाशी बांधून समर्थांनी देवाचा महिमा गायलेला आहे. समर्थांनी अनेक स्थळी समुदायाची उठावणी करून देवाचे वैभव वाढविले. लोकांची देवधर्मविषयक उदासीनता आपल्या उपदेशाच्या आघातानी नष्ट करून लोकांमध्ये देवधर्माचा उत्कट सक्रिय अभिमान उत्पन्न करण्याचे महत्कार्य समर्थांनी अंगीकारले होते.समर्थकाळातदेखील हिंदू समाजात रूढ असलेल्या देवधर्माच्या आचारविचारांनी उडवून दिलेला गोंधळ समर्थांच्या चित्ताला विशेष पीडा देत होता. खरा देव कोणता? त्याच्याशी भक्ताचा संबंध कसा असावा, याचे बिनचूक निश्‍चित ज्ञान लोकांत नसल्यामुळे, देवाच्या व्यवहारात जिकडेतिकडे अंधाधुंदी माजलेली होती.अनेक देव, त्यांच्या उपासनेचे अनेक पंथ व मंत्र, नाना शास्त्रे, नाना मते, बहुविध गुरू… कुणाचा कुणाशी मेळ नाही. जो तो आपल्या मताच्या अभिमानाने यथेच्छ चाललेला. म्हणून समर्थ म्हणतात-‘‘देव ध्यानी भाविजे| ज्ञाने द्रव्य मोक्ष पाविजे|जन्म सार्थक कीजे| कानकोंडे न कीजे|दास म्हणे उदास| धरा देवाची कास|भक्ती मार्ग विशेष| जेथे पावे जगदीश॥देवाच्या संबंधात कसे वागावे, याची प्रस्तावना म्हणून समर्थांनी दासबोधात आपले विचार प्रकट केले आहेत-‘‘देव करिजे ऐसा नाही| देव टाकीजे ऐसा नाही|म्हणोनी याचा काही| विचार पहावा॥देव नाना शरीरे धरितो| धरूनी मागुती सांडितो|तरी तो देव कैसा आहे तो| विवेके ओळखावा॥ब्रह्मज्ञान हा देव ओळखण्याचा एक उपाय आहे. समर्थ म्हणतात, ‘‘भक्तिचेन योगे देव| निश्‍चये पावती मानव॥ऐसा आहे अभिप्राव| इये ग्रंथी॥या देवाच्या भक्तीसाठी- ‘‘देवाचे वैभव सांभाळावे| न्यूनपूर्ण पडोची नेदावे| चढते वाढते वाढवावे| भजन देवाचे॥ ‘‘ऐसे वैभव चालवावे| आणि नीच दास्यत्वही करावे॥देवाचे वैभव भजनाने म्हणजे देवाच्या गुणगानाने, त्याच्या कार्याने वाढते. हे वैभव वाढविताना नीच दास्यत्वही करावे म्हणजेच कोणतेही काम करण्याची लाज वाटू देऊ नये. मोठमोठी देवालये स्थापावी. त्याचबरोबर वापी, कूप, सरोवरे बांधावी, जेणेकरून पाण्याची व्यवस्था नीट होईल.देवाचे वैभव वाढविण्यासाठी नरदेहासारखे दुसरे साधन नाही. देह जर नसेल तर ‘भजनासी कैसा ठाव’ असे ते म्हणतात. नरदेहाच्या साहाय्याने ‘‘काही धर्मचर्चा पुराण| हरिकथा निरूपणे| वाया जाऊ नेदी क्षण| दोहीकडे॥मी देवाचा आहे, ही भावना ठेवून ज्या ज्या कृतीने देवाचे वैभव वाढेल ते ते करण्यास निरंतर तयार असावे. केवळ सोने, हिरे, चांदी यांनी देवाचे वैभव वाढत नाही, तर देवासारखी माणसे तयार करण्याने देवाचे वैभव वाढेल. देवळात येणारा माणूस जेव्हा नरापासून नारायणापर्यंत आपली आध्यात्मिक उंची वाढवितो व ती वाढविण्यास देऊळ त्याला सहकार्य करते. त्याच वेळी हे होऊ शकते आणि हे होणे यातच देवाचे वैभव आहे. मंदिरे ही ज्ञानाची विद्यापीठे झाली पाहिजेत. मंदिरातून समाजातील स्त्री-पुरुषांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास होण्यास पूरक असे वातावरण निर्माण केले पाहिजे. हरिकथा, बलोपासना, आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, निरूपण या मार्गाने हे शक्य आहे. हे झाल्यास समाज निरोगी व ज्ञानी होऊन मानसिक रीत्या सक्षम होईल. हे देवाचे वैभव आहे.

डॉ. प्रा. प्रज्ञा प्रकाश पुसदकर,९४२३७३३६३०