संचलनाचे गीत (मार्चिंग सॉंग)

0
25

हलकं फुलकं
कोणतीही कवायत करीत असताना एरवीच्या लेफ्ट-राईटमुळे एक प्रकारचा तोच तोपणा जाणवून ते रटाळ वाटू लागते आणि एकदा का ते रटाळ वाटू लागले की, त्या कवायतीची आवड जाऊन कवायत काही वेळातच विसकळीत होत असते, असा अनुभव आहे. कवायत उत्तम होण्याकरिता नेहमीच एखाद्या स्फूर्तिगीताची आवश्यकता भासत असते.
जुन्या काळी, स्वातंत्र्यापूर्वी आझाद हिंद सेनेचे असेच एक स्फूर्तिगीत होते आणि ते म्हणजे,
‘कदम कदम बढाये जा खुशीक के गीत गाये जा|
यह जिंदगी है कौमकी| तू कौमपर लुटाये जा॥
अशा गीताने एक प्रकारची नवी चेतना, नवीन स्फुरण अंगी बाणून कवायत चांगली होत असते. असा त्या स्फूर्तिगीताचा/संचलनाच्या गीताचा उपयोग होत असतो.
सैन्यसेवेत असताना १९७० च्या काळी आम्ही फील्ड म्हणजे नॉनफॅमिली स्टेशनच्या भागात होतो. तिथे दिवस-रात्र शिबिरात राहावे लागे आणि सतत शिस्तबद्ध सैनिकी वातावरण असायचे. त्यामुळे कधीकधी आणि अधूनमधून कंटाळवाणे वाटायचे. त्याच वेळी आमच्या युनिटच्या जवानांची आजूबाजूच्या इतर युनिटच्या जवानांशी कवायतीची स्पर्धा घेण्याचे ठरविले. त्याकरिता सर्वच जवानांची दररोज कवायतीची प्रॅक्टिस कसून घेण्यात येत असे. काही काळानंतर मात्र असे आढळले की, जवानांच्या कवायतीची सूत्रबद्धता ढासळली आणि दिवसेंदिवस ते अधिकाधिक वाईट होऊ लागले. त्यामुळे शेवटी कंटाळून कवायत घेणार्‍या हवालदाराने माघार घेतली.
त्यानंतर त्या हवालदाराने आमच्या युनिटच्या प्रमुखांना (कमांडिंग ऑफिसरला) जाऊन सांगितले की, हे जवान कधीही सुधारणार नाहीत आणि यांना स्पर्धेतून वगळणेच योग्य ठरेल. पण, अशी माघार घेणे आमच्या प्रमुखांना साहजिकच पटले नाही आणि त्यांनी त्याला आणखी एक आठवडा प्रयत्न करून बघण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्या जवानांची कवायतीची प्रॅक्टिस पुन्हा एकदा पूर्ववत सुरू झाली, पण त्यात काहीच सुधारणा आढळून आली नाही. त्याच काळात आमच्या युनिटमध्ये मोबाईल सिनेमा युनिटने एक चलती का नाम गाडी हा जुना हिंदी सिनेमा दाखविला होता. त्यातील एक गाणे जवानांना खूपच आवडले होते. ते गाणे होते-
एक लडकी भिगी भागीसी, आधी रातों मे जागीसी,
कोई आगे ना पीछे, तुमही कहो ये कोई क्या बात है… त्यावेळचे ते गाणे सर्व जवानांना आवडल्यामुळे त्या गाण्याचा संचलनाच्या वेळी उपयोग करण्याचे त्यांनी ठरविले. आणि त्याप्रमाणे परेड करीत असताना त्या सर्वांनी बरोबर ते गाणे गुणगुणल्यामुळे साहजिकच एकसूत्रता आणि शिस्तबद्धता त्याना साधता आली आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणजे त्यांची कवायत सुधारली.
या फरकामुळे त्या हवालदारालाही हुरूप चढला. आपल्यामुळेच ही प्रगती झाली असावी, असे त्याला वाटले. पण कुणाही जवानाला त्याने विचारले नाही आणि त्यांनीही आपणहून त्यांचे गुपित त्याला सांगितले नाही. त्या हवालदाराने आमच्या युनिटच्या प्रमुखांना भेटून, त्या जवानांना स्पर्धेत सामील करण्याचा आपला निर्णय सांगितला. त्यामुळे त्या प्रमुखांनाही चांगले वाटले. पुढील एका आठवड्यात त्या जवानांच्या कवायतीची चांगली प्रगती झाली.
या अचानक झालेल्या बदलामुळे शेवटी युनिटप्रमुखांनी त्यांच्याकडे काम करणार्‍या सेवादाराला- हुकूमसिंगला विचारले की, हे अचानक बदल होण्याचे गुपित काय आहे? शेवटी त्याने सांगितले की, ते जवान कवायत करीत असताना त्या सिनेमातील गाणे गुणगुणतात आणि त्यामुळेच त्यांचे मार्चिंग सुधारले. पण, युनिटप्रमुख हुकूमसिंगला रागावले आणि म्हणाले, हा सगळा बालिशपणा बंद करा. मला अशा तर्‍हेची नौटंकी अजीबात आवडत नाही वगैरे.
हुकूमसिंगने त्या जवानांना युनिटप्रमुखांचे ‘मनोगत’ सांगितले, पण त्या जवानांनी आपले गाणे गुणगुणणे तसेच चालू ठेवले. त्या रात्री युनिटप्रमुखांनी तेच गाणे गुणगुणत आपल्या टेंटसमोर पावले टाकीत कवायत करून पाहिली. त्यांनाही जाणवले की, त्यांची पावले तालात पडत आहेत. त्यांनी दुसर्‍या दिवशी सकाळी निरोप पाठविला की, सर्वांनी गाणे गुणगुणल्यास त्यांची काही हरकत नाही. कमांडिंग ऑफिसरचा असा निरोप आल्यावर मग काय, त्या जवानांना आणखी हुरूप चढला आणि नवचैतन्य आले. साहजिकच त्यावेळच्या स्पर्धेत त्यांची कवायत उत्कृष्ट होऊन त्यांना प्रथम पारिताषिक मिळाले.
त्यावेळेस प्रथम पारितोषिकाचे वितरण करीत असताना त्या कवायतीच्या प्रमुखाला युनिटप्रमुखांनी हळूच म्हटले ‘‘एक लडकी भिगी भागीसी…’’ ते शब्द ऐकल्यावर तो सैनिक चपापला. पण लगेच भानावर येऊन तो हसला आणि त्याने त्यांना सॅल्यूट करून तो आपल्या जागी परतला. संचलनाच्या गीतामुळे असा योग्य परिणाम होऊन कवायतीत दृश्य फरक पडत असतो.
अरविंद भावे
९८९०४५१९७३