तुझी चिंता त्यासी सर्व आहे…

0
33

अध्यात्म
दुर्भाग्य, संकटे, अपमान, अवहेलना जीवन उदास करतात. प्रयत्न करूनही आलेल्या अपयशाने मनुष्य हताश होतो. जवळचे बोल बोल बोलतात, निंदा करतात तेव्हा दु:ख होते. दु:ख दाटून येते तेव्हा डोळे पाणावतात. दिलासा, धीर देणारे पाठीशी उभे राहणारे कोणी दिसत नाहीत, तेव्हा मनुष्यास एकाकी निराधार वाटू लागते. संकटे, प्रतिकूलता, निंदेने धैर्य मरते. कसे होणार, या चिंतेने मन जळू लागते. संकटे, निंदा- पूर्व-पश्‍चिम, उत्तर-दक्षिण असता निसटावे कसे? आधार देणारे, गोंजारणारे कुणी असावे, असे वाटते. मुलायम हाताचे ओढ लावणारे कुणी भेटावे वाटते.
आशा फोल ठरते, सगळेच हात खरखरीत होतात, सर्वत्र फटकारेच मिळतात, तेव्हा मनुष्य व्यथित होतो. आपत्ती, निंदेच्या फटकार्‍यात एक दिलासा, एक हात निश्‍चित असतो. हा हात देवाचा असतो- परमेश्‍वराचा असतो. देवाचा हात धैर्य देतो, नवी उमेद देतो. हताशा पळवून संकटात भिडण्याची ताकद देतो. संत एकनाथ महाराजांच्या एका अभंगात देवाचा हात, देवाचा आधार दिसतो.
आवडीने भावे हरिनाम घेसी| तुझी चिंता त्यासी सर्व आहे॥
सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनात अनेक आपत्ती येत असतात. आपत्तीत ‘पुढे कसे होणार’ या काळजीने चिंता उत्पन्न होते. चिंतेने मन बेचैन होऊन कशातच रस वाटत नाही. मन कुठेच लागत नाही. केविलवाणी स्थिती येते, घुसमट होऊन जीव रडकुंडीस येतो, पण रडता येत नाही. त्रागा, अकांडतांडव करता येत नाही. करावे म्हटले तर कुणासमोर करावे? आपलेही कुणी त्रागा सहन करीत नाहीत. निमूटपणे राहावे लागते. उगाच भटकंती होत राहते. पाय दारूकडे वळतात. मग सावरणे होत नाही. आपत्तीत सावरले पाहिजे. पण सावरणार कोण? सारेच धैर्यवान, आपत्तीत मुसंडी मारणारे नसतात. सावरण्यास पाठबळ लागते, ते पैशाचेच असावे असे नाही. शब्दांचे पाठबळही मोलाचे असते. शब्द नाही टीकास्त्र ऐकू येते. अपमान, अवहेलनेची हलगी ऐकून दारू, आत्महत्या हाच एक उपाय वाटतो. पण ते योग्य नाही. बिकट परिस्थितीत एक निवारा हरिनामाचा! आवडीने हरिनाम घेतले तर हरीलाच आपली चिंता लागून राहते. हे संत एकनाथांचे सत्य वचन आहे. बुडत्यास गर्तेतून कसे बाहेर काढावे, या काळजीने ‘हरी’ म्हणजे ‘देव’च साहाय्यास येतो. त्याला हाक मारावी लागते, तेही मन:पूर्वक. आवडीने हरिनामाचा घोष लावावा लागतो. आई दिसेनाशी झाली की बाळ आई-आईचा आकांत मांडते तसे हरीचा आकांत मांडावा लागतो. आयुष्यात मागे वळून पाहिले असता, मनाजोगते घडलेले दिसत नाही. तेव्हा खंतावून मन निराश होते. अपेक्षाभंगाच्या उदास मनास एकनाथ महाराज धीर देतात-
नको खेद धरू कोणत्या गोष्टीचा| पति तो लक्ष्मीचा जाणतसे॥
विद्यार्थिदशा संपली, तारुण्य आले की, व्यक्तीच्या मनात भावी जीवनाचे रसमय व रंगमय चित्र असते. कल्पनेतल्या व स्वप्नातल्या या मनोहर चित्राने तरुण स्वत:च हुरळून जातो. उत्सुकतेने तो भावी आयुष्य पाहत असतो. रसमय व रंगमय चित्र साकार होतेच असे नाही. अपेक्षेप्रमाणे काही झाले नाही, तर चित्र फसवे असल्याचे जाणवते. कल्पनेतले वास्तवात उतरत नाही व जीवनाचे चित्र सुमार होते. यथातथा जगावे लागते. नाइलाज असतो. यथातथा जगावे लागते म्हणून खेद व खंत वाटत राहते. खंत हानिकारक असते. वर्तमान निष्क्रिय करते. अपेक्षेप्रमाणे होत नाही म्हणून उमेदीचे नवे काही करू नये वाटते. मनाला मरगळ येते. कुढत राहू नये, तो लक्ष्मीचा पती विष्णू सर्व जाणतो, हे एकनाथ महाराजांचे शब्द आश्‍वासक आहेत. अदृश्य असणारा तो ईश्‍वर जाणून सर्व ठीक करेल, ही भावना चालना देणारी आहे.
जीवन सुरेख व लावण्यमय व्हावे म्हणून प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने झटत असते. लावण्यमय स्त्रीचा मोह सार्‍यांनाच होतो तसे लावण्यमय जीवनाचे आहे. कोणास लावण्य लाभते, कोणास नाही. ते न लाभण्याची कारणे अनेक असतात. न लाभले त्याला खेद व खंत वाटत राहते. खंताचा परिणाम दु:ख, खंत परिवर्तित करून देवाच्या मागे लागले, तर खेदाची तीव्रता कमी होतेे. देवाचा हात हळुवारपणे फिरत खेदाचे दु:ख कमी करतो. तोच सकलांचा आधार.
सकल जीवांचा करितो सांभाळ| तुज मोकलील ऐसे नाही॥
सर्व जीवांचा पालनपोषणकर्ता परमेश्‍वर, असे धर्म मानतो. धर्म वेगवेगळे असले, तरी एक अदृश्य शक्ती सर्व विश्‍वाचे संचलन करते, हे सर्व धर्मास मान्य आहे. माणसाचा यावर विश्‍वास आहे. आपण नगण्य आहोत, ही भावना माणसाची असते. मी मी म्हणतो ते अज्ञानाने. सगळ्यास चालविणारा हरिनाम घेणार्‍यास कसा लाथाडेल? तो अनन्य भावनेने स्मरण करणार्‍यास दूर करीत नाही. स्मरण म्हणजे त्याला घातलेली शपथ असते. तो शपथ मोडत नाही, स्मरण करणार्‍याची चिंता दूर करतो.
नशिबाचा सूर निष्पन्नतेत निघतो, संपन्नतेत मनुष्य मी मी करतो. नशिबाच्या गोष्टी दैन्यावस्थेत होत असतात. दैन्यामध्ये शांत राहिले की नशिबाचा रडका सूर कमी होतो. नशिबाचा अनाकलनीय खेळ मौजेने पाहता येतो. नशिबाने संपन्नता आली की, संपन्नतेचा खेळही मौजेने पाहावा. विपन्नतेत मौज कठीण वाटते. परमेश्‍वराचे चरण धरले की शक्य होते.
एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा| तुज हरिकृपे नाश झाला॥
आपत्ती, दैन्य, अकस्मात मृत्यू, कलह, अपयश हे प्रारब्धाचे भोग असतात. ते भोगावेच लागतात. त्यातून सुटका नाही. मात्र, हरिकृपेने प्रारब्ध उजळते व भोग सरतात, हे निश्‍चित! हरीची किमया अद्भुत आहे. त्यांच्या कृपेने भोग संपुष्टात येतात, मात्र त्याकरिता हरिनामाचा गजर केला पाहिजे…
प्र. जा. कुळकर्णी
९७६६६१६७७४