नेेत्र ही राष्ट्रीय संपत्तीच : ती सत्कारणी लावू या…!

0
34

दृष्टिदान

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी २० ऑगस्ट १९८५ ला सपत्नीक, मरणोत्तर नेत्रदान राष्ट्रार्पण करण्याचे संकल्पपत्र भरून वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा कालावधी ‘राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा’ म्हणून पाळण्यात यावा, अशी शिफारस केली. तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर हा नेत्रदान पंधरवडा राबविण्यात येतो.
अंधत्व निवारणासाठी भारतात १९७६ पासून स्वतंत्रपणे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच अंधत्वाची समस्या दूर करण्यासाठी ‘दृष्टी २०२०’ हे विशेष अभियान देशभर राबविण्यात येत आहे. आज जगातील अंधांची संख्या साडेचार कोटींच्या पुढे असून, त्यातील जवळपास १ कोटी ५० लाखाच्या वर अंध भारतात आहेत. यापैकी ८५ लाखांच्या जवळपास कॉर्नियामुळे अंधत्व असणारे आहेत. या अंधांपैकी जवळपास ३३ लाख युवकांची संख्या असून २ लाख ७५ हजाराच्या वर अंध बालकांची संख्या आहे. भारतात दरवर्षी २ लाखांपेक्षा अधिक नेत्रपटलांची (कॉर्नियाची) आवश्यकता असून, सध्या केवळ ३५ हजार नेत्रपटल नेत्रदानाद्वारे उपलब्ध होतात. उपलब्ध नेत्रपटलांपैकी केवळ ६० टक्के नेत्रपटल नेत्र प्रत्यारोपणासाठी वापरण्यात येेतात. भारतात अडीच लाख अंधांना बुबुळ प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दृष्टी देता येते. परंतु, नेत्रदानाद्वारे नेत्रपटल मिळण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे.
श्रीलंकेचा आदर्श
बौद्ध धर्म असलेल्या श्रीलंका या भारताच्या शेजारी असणार्‍या छोट्याशा देशात नेत्रदानाचे प्रमाण १०० टक्के असून, मानवीय नेत्र हे राष्ट्रीय संपत्ती या दृष्टीने बघण्याची मानसिकता तेथील लोकांनी स्वीकारल्यामुळे तसेच त्या देशाने नेत्रदानासाठी कायदा केल्यामुळे ते स्वत:च्या देशाची नेत्रपटलांची गरज भागवून, भारतासह इतर ६६ पेक्षा अधिक देशांना नेत्रपटल (कॉर्निया) पुरवीत असतात. त्यासाठी खास ऑरिबिस नावाच्या सुसज्ज विमानातून इतर देशात जाऊन कॉर्निया प्रत्यारोपण करीत असतात.
नेत्रदान म्हणजे आपले डोळे गरजू अंध व्यक्तींना दृष्टी येण्यासाठी आपल्या मृत्यूनंतर दान देणे होय. या दान दिलेल्या दात्यांच्या डोळ्यांच्या केवळ बुबुळांचे प्रत्यारोपण केले जाते. पूर्ण नेत्रगोलाचे केले जात नाही म्हणून त्याला नेत्ररोपण न म्हणता ‘बुबुळरोपण’ असेही म्हटले जाते. ज्या व्यक्तींना अंधत्व हे बुबुळाच्या आजाराने अर्थात कॉर्नियाच्या दोषामुळे आले व ज्या रुग्णांची दृष्टी गेलेली आहे आणि ज्यांच्या डोळ्यातील इतर भाग कार्यक्षम आहे अशा अंधांना बुबुळ प्रत्यारोपण केले जाते.
कुणी करावे नेत्रदान?
नेत्रदानासाठी स्त्री-पुरुष, जाती, वंश, धर्म आणि वय हा भेद मानला जात नाही. कोणत्याच धर्म-पंथाने या सत्कर्माला निषिद्ध मानले नाही. कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीस नेत्रदान करता येते. मोतीबिंदू काढलेल्या व्यक्तींचे डोळेदेखील नेत्रदानासाठी उपयोगात येऊ शकतात. परंतु, विषबाधा किंवा पाण्यात बुडून झालेला मृत्यू, धनुर्वात, हिपॅटायटिस, इनकॅप्लायटिस, एड्‌स, डोळ्यांचा कर्करोगी व एड्‌सग्रस्त नेत्रदान करू शकत नाही. याशिवाय मधुमेह, कुष्ठरोग, ट्युबरकोलीस, सेप्टीसिनिया, सिकोरीस इत्यादी व्याधींमुळे डोळ्यांवर परिणाम झालेल्या व्यक्तींचा कॉर्निया प्रत्यारोपणासाठी उपयुक्त ठरत नाही. भारतात कॉर्निया प्रत्यारोपणाचा पहिला प्रयत्न इंदोर येथे प्रोफेसर धांडा यांनी १९६० साली केला.
पारदर्शक असणारे डोळ्याचे बुबुळ जीवनसत्त्व ‘अ’च्या अभावाने, डोळे येण्यामुळे, डोळ्यांना इजा झाल्यामुळे तसेच अन्य आजाराने अपारदर्शक झालेले बुबुळ पांढरे होऊन अंधत्व येते. या कारणास्तव जगभरात ९१ लाखाचे वर लोकांना अंधत्व आले असून, त्यात प्रतिवर्षी ४५ हजार दृष्टिहिनांची भर पडत आहे. भारतातील ६० लाख लोकांना वरील कारणांमुळे अंधत्व आले असून, त्यात प्रतिवर्षी ४० हजार नवीन अंधांची भर पडतच आहे. दृष्टी गमावण्याच्या तुलनेत ०.३ टक्के नेत्रदान होत असल्याने हा आकडा वाढतच आहे. देशातील अंधत्वाचा एकूण अनुशेष भरून निघण्यासाठी प्रतिवर्षी १ लाख पन्नास हजाराचे वर बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने देशातील नोंदणीकृत ७६० नेत्रपेढ्या असून, ५० बुुबुळ प्रत्यारोपण केंद्रं अद्ययावत करण्याचा केंद्र शासनाने मागील वर्षी निर्णय घेतला आहे.
मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्यापूर्वी असे करावे…
मानवतावादी हे महान सत्कार्य, मृत्युपूर्व नेत्रपेढीत इच्छापत्र भरून संकल्पाद्वारे करता येते. मरणोत्तर नेत्रदानाचे ठरावीक नमुन्यातील इच्छापत्र आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या समक्ष भरून दिल्यानंतर दात्यास एक डोनर कार्ड दिले जाते. पत्नी, मुले, मुली आणि परिवारातील सर्वांना याची कल्पना द्यावी. नेत्रदात्यास जेव्हा केव्हा मृत्यू येईल तेव्हा फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष नेत्रपेढीत जाऊन, अविलंब नेत्रदानासंबंधी लगेच नेत्रपेढीशी संबंध साधणे गरजेचे असून, त्यासाठी १९९१ हा दूरध्वनी क्रमांक देशभरातील सर्व नेत्रपेढ्यांना देण्यात आला आहे. डॉक्टर येण्यापूर्वी मृत्यूचे प्रमाणपत्र उपलब्ध करून घ्यावे. मृतदेह ज्या ठिकाणी असेल तेथील पंखे बंद करावे. जेणेकरून मृतकाचे डोळे कोरडे पडणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. शक्य झाल्यास नेत्रदात्यांच्या डोळ्यांत ऍण्टिबायोटिक्स ड्रॉप्स टाकून डोळे उघडे असल्यास बंद करावे. डोळ्यांवर थंड पाण्याच्या कापडी पट्ट्या ठेवाव्यात. नेत्रदात्याचे डोके ६ इंच उंच राहील अशा स्थितीत ठेवावे. नेत्रदात्याच्या संकल्पपूर्तीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरावीक वेळेपूर्वी डोळे काढून नेत्रपेढीत जमा करणे आवश्यक असते. डोळ्याचे बुबुळ दोन ते चार तासांपूर्वी उन्हाळ्यात आणि चार ते सहा तासांपूर्वी हिवाळ्यात काढणे आवश्यक असते.
नेत्रपटल काढण्याची प्रक्रिया
नेत्रदात्याचा कॉर्निया काढण्यासाठी आलेले नेत्रतज्ज्ञ डॉक्टर, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून कॉर्निया काढण्यासाठी संमतिपत्र भरून घेतात किंवा मृत्युपूर्वी भरून दिलेले संकल्पपत्र उपलब्ध करून घेतात. मृत व्यक्तीचे कॉर्निया (नेत्रपटल) संपूर्ण निर्जंतुक केलेल्या उपकरणांच्या साहाय्याने १५ ते २० मिनिटांच्या अवधीत अलगद काढून घेतात. त्यानंतर विशिष्ट प्रकारच्या द्रावणात ठेवले जातात. नेत्रदान केलेले (बुबुळ) ४८ ते ७२ तासांच्या आत रोपण करणे आवश्यक असते. कॉर्निया (नेत्रपटल) काढल्यावर रक्तस्राव होत नाही. मृत व्यक्तीच्या चेहर्‍यावर कोणतीही विद्रुपता येत नाही. मृताच्या चेहर्‍यावर बॅण्डेज किंवा अन्य तर्‍हेने चेहरा झाकला जात नाही. लोकदर्शनासाठी चेहरा पूर्ववत राहतो. कोणतेही व्यंग्य दिसून येत नाही तसेच अंत्यविधीसाठी विलंब होत नाही. म्हणून आपल्या परिवाराची नेत्रदान ही परंपरा ठरावी!
मानवी मृतदेहांची अग्नी देऊन, जमिनीत पुरवून, पाण्याच्या प्रवाहात सोडून किंवा अन्य प्रकारे अंतिम विल्हेवाट लावली जाते. मृतदेह नष्ट करताना, अत्यंत मौल्यवान असे अंधांना दृष्टी देऊ शकणारे नेत्रही नष्ट केले जातात. नेत्र हे अमूल्य राष्ट्रीय संपत्ती आहे. ती अंधांना दृष्टी देण्यासाठी सत्कारणी लावू या! वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे आता अवयवरोपणासाठी आणि वैद्यकीय संशोधन करण्यासाठी आणि अभ्यासासाठी अत्यंत उपयोगी असा मानवी मृतदेह कोणत्याही अंत्यसंस्कार पद्धतीने नष्ट करणे हे आता कालबाह्य झाले आहे. त्यामुळे नेत्रदानासह देहदान करणे हेदेखील मानवतावादी महान कार्य आहे. आपले मरणोत्तर नेत्रदान दोन दृष्टिविहीन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणू शकतात. यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोठी चळवळ उभारण्याची गरज आहे. मरणोत्तर नेत्रदान हे मानवतावादी राष्ट्रीय सत्कार्य समजून आपल्या परिवाराची मरणोत्तर नेत्रदान ही परंपरा ठरावी!
‘‘हे जग सोडण्यापूर्वी, एवढं तुम्ही करून जा…अमोल तुमचे सुंदर डोळे, अंधांसाठी देऊन जा…!’’
मधुकर धंदरे
९८९०१५९९१२