लक्ष्मणसाधना

0
42

कल्पवृक्ष

आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा हा काळ आहे. श्रद्धापूर्वक त्यांचे स्मरण करायचे, त्यांनी दिलेला वारसा जपण्याचा संकल्प करायचा आणि कृतज्ञतेच्या भावनेने पितृऋण फेडण्याकरिता कृतिशील व्हायचे, हाच या पंधरवड्याचा संदेश असतो. आपण भूतकाळाच्या पायावरच उभे असतो. त्याचे चिंतन केल्याशिवाय भविष्यकाळाला आकार देताच येत नाही. या काळात हे एकमेव काम करायचे, त्यानंतर नऊ दिवस शक्तीची उपासना करायची आणि विजयाच्या मोहिमेवर निघायचे. विजयाकरिता हा क्रम आवश्यक आहे. कारण त्याशिवाय मोहिमेचे सारे संदर्भ स्पष्टच होत नाहीत.
ही मोहीम रावणावर विजय मिळविण्याची आहे. रामकार्याची आहे. राम हा आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे. पण, राम समजून घ्यायचा असेल तर आधी लक्ष्मण समजून घेतला पाहिजे. रामकार्य हे आपले लक्ष्य असेल, तर लक्ष्मणही ते प्राप्त करण्याची साधना आहे. रामकार्याची पताका आकाशात उंच फडकायची असेल, तर लक्ष्मण त्याचा ध्वजदंड आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. लक्ष्मणाची रामावरची श्रद्धा आणि प्रेम एक क्षणही कधी कमी झाले नाही. लक्ष्मण ही राम आणि रावण यांच्यातली सीमारेषा आहे. ती ओळखणे, त्याचे तंतोतंत पालन करणे, हाच रावणाला दूर ठेवण्याचा मार्ग असतो. सीतासुद्धा हे विसरली. कांचनमृगाच्या लोभाला बळी पडली. ‘‘लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव…’’ हा आक्रोश ऐकून तिचा तोल गेला. लक्ष्मणाचा मात्र रामावर पूर्ण विश्‍वास होता. राम संकटात सापडेल, तर जीवनप्रयोजनच संपुष्टात येते. उगीच नाही केले त्याच्याकरिता जीवन समर्पित! पण, सीता मात्र विचलित झाली. लक्ष्मणावर आरोप करण्यापर्यंत तिची मजल गेली. शेवटी लक्ष्मणाला रामाकडे जावे लागले. जाताना ही रेषा ओलांडू नको, असा स्पष्ट इशारा दिला होता. पण, सीता ती रेषा ओलांडते आणि रावणी वृत्तीला बळी पडते. या रेषेची जाणीव असणे, हीच लक्ष्मणसाधना आहे! आजही आपल्याला हेच पाहायला मिळते. लक्ष्मणरेषेचे भान हरवलेल्या समाजात काय अनर्थ घडतात, हे उघड्या डोळ्‌यांनी रोजच आपण पाहतो. कोणतेच क्षेत्र त्याला अपवाद नाही. राक्षसही रामाच्या आवाजात आणि रामाची भाषा बोलतात, हे सीतेला कळले नाही. आज तर ते ओळखणे फारच कठीण झाले आहे. पण, लक्ष्मणाचा मात्र या बाबतीत कधी संभ्रम होत नाही.
खरं तर कैकेयीला दिलेल्या वरानुसार रामाला वनात जायचे आहे. राम त्याला न येण्याविषयी परोपरीने समजावतो. पण, लक्ष्मण स्वखुषीने रामकार्याकरिता वनवास पत्करतो. कारण त्याला रामाविषयी प्रचंड आत्मीयता आहे. लक्ष्मणासारखी माणसं आदेशातून नव्हे, तर आत्मीयतेतून घडत असतात. रामाचा आदेश तर वनात न येण्याचा आहे. रामाचेही लक्ष्मणावर प्रचंड प्रेम आहे. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर तो बेशुद्ध पडला. या प्रसंगी राम व्याकुळ झाला आहे, अस्वस्थ झाला आहे. लक्ष्मण गतप्राण होणार असेल तर मला अयोध्या नको, युद्ध नको, सीताही नको, असे उद्गार तो काढतो. एका क्षणी तर तो असेही म्हणतो, अगदी त्रिभुवनात शोध घेतलाच तर सीतेसारखी पत्नी मिळेल, पण लक्ष्मणासारखा भाऊ, मंत्री व अनुयायी मिळणार नाही. रामकार्याची प्राथमिकता लक्ष्मणासारखा माणूस असते. तो जाऊ द्यायचा नाही, तुटू द्यायचाच नाही, ही रामाची तगमग असते. विशेष म्हणजे हे सीतेलाही मान्य आहे. हनुमान अशोकवनात सीतेला भेटतो. ती राम, लक्ष्मणाची चौकशी करते. बोलताना ती म्हणते, ‘मत्त: प्रियतरो नित्यं भ्राता रामस्य लक्ष्मण:’ म्हणजे माझ्यापेक्षाही रामचंद्रांचे भाऊ लक्ष्मणावर अधिक प्रेम आहे. सीतेचा त्याला आक्षेप नाही. ज्या दिवशी भावाबहिणींपेक्षा पत्नी अधिक प्रिय होते किंवा भावाबहिणींवर अधिक प्रेम करायला पत्नीचा आक्षेप असतो, त्या दिवशी कुटुंब तुटायला सुरुवात होते. कुटुंबव्यवस्थेला हादरे बसतात. रामाच्या मनात लक्ष्मणाला काय स्थान आहे, याची हनुमंतालाही जाणीव आहे. एकदा हनुमंत रामाला म्हणतो, ‘‘तुमचे माझ्यावर प्रेम असेलही, पण लक्ष्मणावर तुमचा माझ्यापेक्षा जास्त विश्‍वास आहे.’’ राम विचारतो, ‘‘तुला असे का वाटते?’’ यावर हनुमंताने दिलेले उत्तर फारच मार्मिक आहे. तो म्हणतो, ‘‘एकदा लक्ष्मणासमोर तुम्ही माझ्यावरचे प्रेम व्यक्त केले. मला तर आनंद झालाच, पण लक्ष्मणावर तुमचा किती विश्‍वास आहे, हेही लक्षात आले. तुम्हाला खात्री होती की लक्ष्मणावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.’’ किती विश्‍वास असतो, याची नोंद हनुमंतही घेतो. कोणत्याही कार्यात हा विश्‍वासच महत्त्वाचा असतो. आज तर कोण कोणाकडे, का जातो, यावरही पाळत ठेवली जाते. प्रेम व्यक्त करायलाही लोक घाबरतात, अशा वातावरणात आज आपण राहतो. चॅनेल आणि हाइरार्किची परवानगी असल्याशिवाय नेतेही आत्मीयता व्यक्त करू शकत नाहीत. रामकार्य या सत्ताशैलीच्या पलीकडे असते. लक्ष्मण रामकार्याकरिता संपूर्ण समर्पित आहे. पण, तरीही तो सत्यनिष्ठ आणि परखड बोलणारा आहे. अनेकदा तो क्रोधितही झाला आहे. भरताला राज्याचा लोभ झाला असेल, तर त्याच्यासोबतही युद्धाची भाषा करतो. पण, त्यामागचे कारण रामाविषयीचे प्रेम आहे, हे राम ओळखून आहे. कालपुरुष रामासोबत एकान्तात गुप्तवार्ता करतो, त्या वेळी लक्ष्मणलाच दारावर उभे केले जाते. कोणालाही आत सोडले तर मृत्यदंड दिला जाईल, अशी कालपुरुषाची अट असते. नेमके दुर्वास ऋषी त्या वेळीच येतात. लक्ष्मण त्यांना सर्व प्रकारे विनंती करतो. रामाला भेटू दे, नाहीतर अयोध्या शापाने भस्मसात करतो, अशी ते धमकी देतात. या धर्मसंकटात अयोध्येला वाचविण्याकरिता मृत्यूचा स्वीकार करण्याचा निर्णय लक्ष्मण घेतो आणि दुर्वासांना आत सोडतो. रामावर वचन मोडण्याची वेळ येऊ नये म्हणून शेवटी शरयू नदीत आत्मसमर्पण करतो. अत्यंत पराक्रमी, मोठ्या मनाचा, नि:स्वार्थी, समर्पित, चारित्र्यसंपन्न लक्ष्मण सोबत असेल तरच रामाला विजय मिळत असतो.
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११