कलावैभव

0
32

आनंद
प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते. काहींच्या बाबतीत ती पिढीदरपिढी म्हणजे रक्तातून आलेली असते. काहींची त्यांच्या आवडीतून, तर काहींच्या बाबतीत ती अभ्यासाने आलेली असते. कलेचे अनेक प्रकार आहेत. त्यात विशेषत: गायन, वादन, नृत्य, भाषण, लेखन, अभिनय, चित्र, मूर्ती वगैरेचा अंतर्भाव होतो. या कलांच्या माध्यमातून अनेक व्यक्तिमत्त्वे ही जगाला माहीत होत असतात, त्यांच्या कलेने ते स्वत:ला आणि विश्‍वालासुद्धा समृद्ध करीत असतात. कलेतून मिळणारा आनंद आणि समाधान हे अन्य कुठल्याही माध्यमातून मिळणार्‍या आनंद आणि समाधानापेक्षा कितीतरी पटीने अधिक असते.
प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास केल्यास लक्षात येते की, या भारतभूमीत असणार्‍या अनेक निसर्गदत्त वैशिष्ट्यांसोबतच प्राचीन कलेला विशिष्ट असा दर्जा आहे. कला ही ईश्‍वरदत्त देणगी अथवा वरदान मानून त्याची सेवा करीत आपले जीवन समृद्ध करण्यासाठी त्या कलेचा अभ्यासक कायमच प्रयत्नशील असायचा. कलेचा विस्तार व्हावा, प्रसार व्हावा आणि ही कला अनेकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी एकत्र कुटुंबपद्धती, गुरुकुलपद्धती अथवा गुरू-शिष्यपरंपरा ही माध्यमे कायम प्रयत्नशील असायची. अर्थात, कलेची आवड असणारे राज्यकर्तेही आपापल्या राज्यात कलेला प्रोत्साहन द्यायचे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या राजदरबारात कलाकारांचा योग्य तो मान आणि सन्मानही केला जायचा. राज्यातील कलेच्या आणि कलाकारांच्या अस्तित्वाने त्या राज्याचे सांस्कृतिक मूल्य ठरविले जायचे आणि त्यामुळे त्या राज्याची आणि राजाची प्रतिष्ठाही मान्य केली जायची.
कलेची रुजवण, संगोपन आणि संवर्धन यासाठी प्रयत्नशील असणारी प्रामाणिक आणि कलाप्रेमी व्यक्ती ही त्या कलेची सेवेकरीच समजली जायची. कलेची सेवा, त्यासाठी केलेला अभ्यास, त्यासाठी घेतलेले कष्ट ही एकप्रकारची तपश्‍चर्याच समजली जायची. कला जाणणारा, कला आत्मसात करणारा आणि त्या कलेची अंतापर्यंत सेवा करणार्‍याचे महत्त्व हे एका तपस्व्यापेक्षा नक्कीच कमी समजले जात नव्हते. कारण, एखाद्या कलेसाठी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण, आपल्या आयुष्याचा कण अन् कण जेव्हा खर्च होतो, तन-मन-धन या कलेसाठी अर्पण केले जाते, या कलायज्ञामध्ये स्वत:ला समिधा म्हणून मानले जाते तेव्हा त्या कलेच्या आसक्तीची तीव्रता नक्कीच तपस्वी व्यक्तिमत्त्वाएवढी असते.
कला ही त्या कलाकारासाठी भक्ती असते, आत्मोन्नतीचे साधन असते आणि साध्यप्राप्तीच्या लक्ष्यासाठी केलेली साधना असते. ती वाटते तेवढी सहज आणि सोपी नसते; परंतु कलेवर श्रद्धा आणि शुद्ध भक्ती ठेवणार्‍यांसाठी दुर्लभही नसते. कला ही अंत:करणातील अविचल, अनिर्बंध, आत्मकेंद्रित भावभावनांना साकार करणारे माध्यम असते आणि कलेच्या माध्यमातून ते जाणकारांपर्यंत पोहोचविणे, एवढाच त्या कलाकाराचा कलेमागील उद्देश असतो. हा उद्देश सफल झाला, असे त्याच्या निदर्शनास आले की, त्याला त्या कलेचे फळ प्राप्त झाले, याचा आनंद आणि समाधान मिळत असते.
जुणेजाणते कलाकार, त्यांची कला, त्या कलेविषयी त्यांचे समर्पण, भक्ती, एकनिष्ठता नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या सगळ्यांना त्या कलाकारांना मिळालेले यश, प्रसिद्धी आणि पदव्या, मान आणि सन्मान एवढेच ध्यानात येते. परंतु, त्या कलाकारांनी आपल्या बालपणापासून कलेसाठी दिलेलं संपूर्ण आयुष्य कधीच लक्षात येत नाही. काही कलाकारांनी तर आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवून, स्वत:च्या आणि कौटुंबिक सुखासमाधानाकडे दुर्लक्ष करून, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सारी संकटे झेलीत आणि विशेषत: त्या कलेच्या प्राप्तीसाठी आपल्या गुरूंच्या आज्ञा शिरसावंद्य मानून त्याप्रमाणे आपले आयुष्य घालविले, त्याचा विचारही आपल्या मनात येत नाही.
वर्तमानकाळात अनेक दूरचित्रवाहिन्या, आकाशवाणी, वृत्तपत्रे वा अन्य माध्यमांमधून नवनवीन कला आणि कलाकारांची ओळख आपल्याला होते आहे. पण, आपल्या कलेचा बाजार मांडला तर ती कला होऊच शकत नाही.
कला ही जेव्हा आत्मिक समाधान देऊन जाते, तेव्हा त्यासमोर कुठलेही आर्थिक सुख आणि समाधान मृत्तिकेसमान वाटते. त्या कलेशी तादात्म्य पावणारा कलाकार हा आत्मसुखाचा अनुभव घेत असतो आणि तो आपल्या कलेतून रसिकांना आणि समाजालाही सुख-समाधान प्राप्त करून देत असतो. कलाकारासाठी कलेचे आकर्षण, कलेसाठीची आर्तता आणि त्या कलेची पूर्तता करण्यासाठी त्याचे प्रामाणिक प्रयत्न, एवढेच महत्त्वाचे असते आणि अन्य काहीही त्याच्यासाठी गौण ठरत असते. म्हणूनच त्याचे मन हे त्या कलेच्या परिघापलीकडचे बघूच शकत नाही. हेच त्याचे कलाविश्‍व असते आणि कलावैभवसुद्धा!
मधुसूदन (मदन) पुराणिक
९४२००५४४४४