व्हायचे होते क्रिकेटर; पण झाले नेमबाज, नंतर मंत्री…!

0
72

यशोगाथा
सत्तरीच दशक होतं ते… पूर्वीचे निशाणेबाज आणि आता केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांचा जन्म २९ जानेवारी १९७० रोजी राजस्थानातील जैसलमेर येथे झाला. एकाच जन्मात माणूस इतके काही करू शकतो, हे राज्यवर्धनसिंह राठोड यांनी समाजसेवा तसेच देशसेवा करून दाखवून दिले. खरंच राज्यवर्धनसिंह राठोड म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व!
नुकत्याच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अवघे ४७ वय असलेले राठोड यांना ‘खेल मंत्रालय’ तसेच ‘युवक कल्याण’ मंत्रालयाचे पूर्णवेळ मंत्रिपद देण्यात आले.
राठोड हे ऊर्जावान, तडफदार, बहुरंगी, अष्टपैलू, कर्तृत्ववान व तेजस्वी असे व्यक्तिमत्त्व तर आहेतच तसेच ते आमच्यासारख्या लाखो, करोडो तरुणांचे प्रेरणास्रोतसुद्धा होऊ शकतात. आपण राठोड यांचे पूर्वीचे आणि आताचे कर्तृत्व जर बघितले, तर ते लक्षावधीच्या संख्येतील तरुणाईला प्रेरणादायी तसेच जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करू शकतात.
एका छोट्या शहरातील व्यक्ती पुढे जाऊन जगात काय काय करू शकते, आपले व्यक्तिमत्त्व कसे घडवून आणते व सैन्यदलाचा उत्कृष्ट अधिकारी आणि आज देशाचा खेळ मंत्री कशी बनते, हा प्रवास अत्यंत रोचक व स्फूर्तिदायी आहे. राठोड यांचे बालपण राजस्थानमधील जैसलमेर येथे गेले. बिकानेर, जैसलमेर येथे त्यांचे प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेला राज्यवर्धन, पुढे जाऊन क्रिकेटचे धडे घेत जातो. मोठा क्रिकेटर बनण्याची मनीषा बाळगून असतो आणि त्यासाठी मेहनतही करतो. शालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावतो. त्याला पुढील संधी हवी असते आणि एके दिवशी तो खरोखरच मोठा क्रिकेटर बनतो. मध्यप्रदेश क्रिकेट संघाकडून त्याची रणजी ट्रॉफीसाठी निवड होते. त्या वेळी त्याचे वय असते अवघे १७ ते १८ वर्षे. राज्यवर्धनसाठी टीम इंडियाचा दरवाजा म्हणजे अगदी समोरची पायरी असते. पण, आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, हे अगदी खरं म्हटलं पाहिजे. नियतीच्या मनात काही औरच होते. राज्यवर्धनसिंह राठोड हार मानणार्‍यांपैकी नव्हते. तसेच त्यांच्या आईचा क्रिकेटला विरोध व त्यावेळची एकूण परिस्थिती राठोड यांच्या बाजूने नसल्यामुळे, क्रिकेट हा त्यांच्यासाठी नुसता खेळ राहून गेला. पण, मनातील आत्मविश्‍वास व मनगटातील ताकद त्यांच्या या प्रवासाला, खूप पुढे आणि वेगाने नेणार होती.
राज्यवर्धनसिंह राठोड यांचे वडील कर्नल लक्ष्मणसिंह राठोड हे भारतीय सैन्यदलात होते. आई शिक्षिका होती. मित्रांनो, यातूनच त्यांच्या घरी संस्कार कसे असतील, दिले गेले असतील याचा अंदाज आपण लावू शकतो. शिस्तप्रिय, संस्कारी, आदरयुक्त, मातीशी जुळलेले लोक, राष्ट्रसमर्पित विचार हे सगळे गुण त्यांच्यात आपोआप भिनले. वडिलांच्या इच्छेखातर राठोड यांनी एनडीए, पुणे येथून शिक्षण, योग्य प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्यदलात प्रवेश केला. १९९० मध्ये ते मेजर झाले. सैन्यदलातील शिस्त, प्रशिक्षण यामुळे राठोड यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिकच झळाळी येत गेली. सैन्यदलात असतानाच भारतातील विविध छोट्या-मोठ्या भागात जाण्याची राठोड यांना संधी मिळाली. भारतातील विभिन्न जाती, प्रदेश, विचार, संस्कृती, हवामान, पाणी याची खरी ओळख त्यांना सैन्यदलातील काळातच झाली. तसेच देशसेवा हीच सर्वोच्च सेवा, हे बाळकडू त्यांना घरीच मिळाले होते. पर्वतीय क्षेत्रात काम करताना कधी बर्फात, कधी वाळवंटात, ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता राठोड, डोळ्यांत तेल घालून शत्रूशी समर्थपणे सामना करण्यास सदैव तयार असत. १९९९ च्या कारगिल युद्धातसुद्धा राज्यवर्धनसिंह राठोड यांचा सहभाग होता, हे विशेष! काश्मीरमधील दहशतवाद्यांशी झुंज देताना त्यांनी आक्रमक कामगिरी बजावली. त्यातच त्यांची ओळख झाली ती विविध बंदुका आणि निशाणीशी. भारतीय सैन्यदलातील हा जवान पुढे वडिलांच्या पायावर पाऊल ठेवत कर्नल झाला. त्यांनी आपल्या निशाणीची छाप संपूर्ण सैन्यदलात उमटजवली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सैन्यदलातर्फे अतिविशिष्ट सेवा मेडलसह आणखी तीन मेडल्सनी सन्मानित करण्यात आले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी या दोन्ही महनीयांच्या हस्ते सत्कार होण्याचे भाग्य राज्यवर्धन राठोड यांना लाभले.
पुढे राज्यवर्धन यांनी स्वत:तील कलागुण ओळखले व निशाणेबाज होण्याचा निर्णय घेतला. तेथून त्यांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. राठोड यांच्या एका सोनेरी आयुष्याची सुरुवात झाली. पुढे त्यांनी अतोनात मेहनत करून अनेक स्पर्धंामध्ये भाग घेत घेत वर्ष उगवले २००४. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यांनी पुरुष दुहेरीमध्ये रौप्यपदक मिळवून भारताची शान जगात वाढवली. भारताला एक नवा नेमबाज मिळाला! सोबतच भारताला एक नवा सुपरस्टार- भारतातील असंख्य खेळाडूंना व तरुणांना मिळाला. बस एक मॅच! बस एक! आणि अतोनात मेहनतीने त्यांचे नशीबच पालटून गेले. पुढे त्यांनी आशिया कप, राष्ट्रकुल स्पर्धा व जागतिक पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन १७ पदके जिंकून दिली. त्यांना ‘पद्मश्री’, ‘राजीव गांधी खेलरत्न’, ‘अर्जुन’ अशा नामांकित पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आले.
दरम्यानच्या काळात भारतीय जनता पक्षाने त्यांच्यातील कर्तृत्वगुण ओळखून त्यांना भाजपात येण्याचे आमंत्रण दिले. मनाची पूर्ण तयारी झाल्यानंतर २०१३ मध्ये राज्यवर्धनराठोड यांनी सैन्यदल व खेळातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर वर्ष उगवले २०१४. हे वर्ष राठोड यांच्या जीवनात नवा प्रकाश घेऊन आले. राठोड यांना देशसेवेची अत्युत्तम संधी लाभली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यवर्धन राठोड यांना भारतीय जनता पक्षाने राजस्थानातून जयपूर ग्रामीण मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले आणि ते तीन लाखांवर मताधिक्याने निवडून आले. संसदेत भाजपाचे बहुमत आले. पहिल्याच मंत्रिमंडळात राठोड यांना माहिती व प्रसारण राज्यमंत्री हे पद देण्यात आले. आज त्यांच्याकडे माहिती प्रसारण, युवक कल्याण व खेळ यांचा स्वतंत्र प्रभार आहे. आज देशात सर्वत्र एकापेक्षा एक असे सरस व चांगले खेळाडू आहेत. अगदी छोट्याछोट्या गावांमधून क्रीडापटू तयार होत आहेत. त्यांना आवश्यकता आहे ती संधीची. त्यातूनच खेळाडूंचे उद्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. उद्याच्या सोनेरी किरणांचा प्रकाश राठोड यांनी टाकावा, ही राठोड यांच्याकडून अपेक्षा! आज खेळ मंत्रालयाचे वार्षिक बजेट फक्त १९४४ कोटी रुपये इतके आहे. त्यातूनच आजी-माजी खेळाडूंचे भवितव्य व वर्तमान तयार होत असते. विविध संस्था, जसे- नाडा तसेच डोपिंगसंबंधी एनडीटीएल तसेच स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातील आढावा व बैठकी सुरळीतपणे पार पडाव्या, याची अपेक्षा राठोड यांच्याकडून आहे. खेळाडूंचे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय दौरे, ऑलिम्पिकची तयारी करणार्‍या खेळाडूंची योग्य व्यवस्था तसेच त्यांच्या जीवनाला दिशा, स्थिरता, आनंद, नेतृत्व देण्याचं काम राठोड यांनी करावं, एवढीच अपेक्षा…
– कपिल जोशी
८७९३५०९७३५