साधेपणा

0
50

कल्पवृक्ष
गेल्याच महिन्यात प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात, सुधा मूर्ती यांनी त्यांचा एक अनुभव दिला आहे. सुधा मूर्ती काही सामान्य व्यक्ती नाहीत. इन्फोसिसचे जनक नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत तसेच इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षाही आहेत. त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. त्या कन्नड या मातृभाषेतून बोलतात. उगाच गरज नसताना केवळ प्रभाव पाडण्याकरिता इंग्रजीत बोलत नाहीत. लंडनच्या हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांना हा अनुभव आला. त्या बिझनेस क्लासच्या रांगेत उभ्या होत्या. त्या मुंबईला येत होत्या. त्यांच्याच रांगेत समोर एक अत्यंत फॅशनेबल पाश्‍चात्त्य वेषभूषा केलेली महिला उभी होती. तिची हायहिल सॅण्डल आणि आकर्षक मॅचिंग पर्स लक्ष वेधून घेत होती. सुधा मूर्तींनी साधा कॉटनचा सलवार-कुडता घातला होता. ती महिला त्यांना म्हणाली, ‘‘ही बिझनेस क्लासची रांग आहे. इकॉनामी क्लासची रांग पलीकडे आहे.’’ सुधा मूर्तींनी त्याकडे दुर्लक्ष केले. आपण सांगूनही या बाईवर काही फरक पडत नाही, हे पाहून त्यांनी त्यांच्यावर कॉमेंटस् करायला सुरुवात केली- इकॉनामीच काय, ही तर कॅट्‌ल्स क्लासमधील वाटते. आपल्या कपड्यांवरून त्यांनी आपला क्लास ठरविला, हे सुधा मूर्तिंनी ओळखले. खरे म्हणजे एका क्षणात आपला बोर्डिंग पास दाखवून त्यांना उत्तर देता आले असते. पण, त्यांचा क्लास खरोखरच वरचा असल्यामुळे अनोळखी महिलांसमोर आपला मोठेपणा मिरवण्याची त्यांना गरज वाटली नाही. उलट राग येण्याऐवजी, कपड्यांवरून माणसाचा क्लास ठरवण्याच्या वृत्तीमुळे त्या अस्वस्थ झाल्या. विशेष म्हणजे दुसर्‍याच दिवशी सरकारी शाळेतील मुलांना मदत करणार्‍या एका संस्थेच्या कार्यक्रमात सुधा मूर्ती मंचावर होत्या आणि विमानात त्यांच्यासोबत असलेली महिला समोरच पहिल्या रांगेत बसली होती. सुधा मूर्तींचा कॅट्‌ल्स क्लास आहे की अन्य कोणता, हे तिला न सांगताच कळले. या अनुभवावर सुधा मूर्ती यांनी केलेले भाष्य त्यांच्या प्रगल्भ विचारसरणीचे निदर्शक आहे. त्या म्हणतात, ‘‘क्लास डझ नॉट मिन हग पझेशन ऑफ मनी. मदर टेरेसा वॉज अ क्लासी वूमन सो ऍज मंजुला भार्गव, ग्रेट मॅथेमॅटिशीअन ऑफ इंडियन ओरिजिन. दी कन्सेप्ट, दॅट ऍटोमॅटिकली गेन क्लास बाय ऍक्वायरिंग मनी इज आऊटडेटेड थॉट प्रोसेस.’’ (केवळ पैसा म्हणजे दर्जा नव्हे. मदर तेरेसा किंवा गणिततज्ज्ञ मंजुला भार्गव यांना खरा दर्जा आहे. पैसा मिळाला म्हणजे आपोआपच दर्जा वाढतो, ही कल्पना आता कालबाह्य होत आहे.)पूर्वी शाळांमध्ये ‘साधी राहणी व उच्च विचारसरणी’ असा सुविचार लिहिलेला असे. सुधा मूर्तींच्या लेखामुळे पुन्हा त्याची आठवण झाली. हे तत्त्व आज गंभीर संकटात सापडले आहे. टीव्ही, ई-शॉपिंग व मॉल संस्कृतीमुळे सर्वांनाच उच्च दर्जाचे राहणीमान ठेवण्याची हाव निर्माण झाली आहे. महागडे डिझायनर कपडे, ब्रॅण्डेड शूज्, मॅचिंग घड्याळं, स्मार्ट फोन, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनर या जीवनशैलीच्या हव्यासातून अनेक मुली शोषणाच्या बळी ठरत असल्याची उदाहरणे महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. मुलांच्या अशा मागण्या पूर्ण करताना मध्यमवर्गीय पालकही त्रस्त आहेत. त्यांना समजावणे पालकांच्या हाताबाहेर होत आहे. वेष्टन आकर्षक हवे, आतल्या वस्तूचा दर्जा कसाही असो, हा मार्केटिंग नियम जीवनालाही लागू होत आहे. सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्हींचाही वरदहस्त असलेल्या सुधा मूर्तींनी साधेपणाचे मूल्य जपून जीवनाला एका उंचीवर नेले आहे. आजच्या स्थितीत त्यांचे उदाहरण डोळ्यांत अंजन घालणारे आहे.भपक्याला आज फारच महत्त्व प्राप्त होत आहे. बाह्य रूपावरून व त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंवरून माणसाची किंमत ठरवली जाते. जाहिराती या विचारांनाच खतपाणी घालतात. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, चांगली संधी प्राप्त करायची असेल, प्रेम हवे असेल, कुणाला खुश करायचे असेल, तर विशिष्ट ब्रॅण्डचे कपडे वापरा, सेण्ट वापरा, विशिष्ट बूट घाला, असे वारंवार मनावर बिंबवले जाते. तुम्ही कोणता पानमसाला खाता, कोणता सोडा(?) पिता, यावर तुमची उंची ठरते. माणसं स्टार पाहून हॉटेलमध्ये जातात, कसल्यातरी विचित्र महागड्या पदार्थांची ऑर्डर देतात आणि चव नसलेल्या पदार्थांचे भले मोठे बिल देऊन बाहेर पडतात. बिलावरचा आकडा आणि मिळालेला आनंद यांचा किती मेळ बसतो, हा शोध घेण्याचा विषय आहे. साधेपणा हे एक मूल्य आहे. त्यात जीवनाची सहजता आणि स्वाभाविकता आहे. माणसाला भव्यतेचे व दिव्यतेचे आकर्षण असावेच. पण, साधेपणा त्यात कुठेही आडवा येत नाही. गुणवत्ता, उच्च विचारसरणी यामुळेच जीवनाचा दर्जा, मूल्य वाढते. माणसाचे समाजातील स्थान व प्रतिष्ठा त्यावरूनच ठरविण्याची संस्कृती विकसित झाली पाहिजे. विवेकानंद एकदा अमेरिकेत म्हणाले होते, ‘‘तुमच्या देशात कपडे शिवणारे शिंपी माणूस घडवतात. आमच्या देशात चारित्र्यामुळे माणूस घडतो.’’ विवेकानंदांचे शब्द सार्थ ठरविणारा आपला देश आज आहे का? की, आपणही अमेरिकेच्या मार्गानेच जात आहोत? आपण जसे नाही तसे दाखविण्याची यातायात कशाकरिता? खोट्या सामाजिक प्रतिष्ठेकरिता माणूस म्हणून असलेले आपले मूल्य आपण घालवून बसणार काय? उधळपट्‌टी करणार्‍या, संपत्तीचा दुरुपयोग करणार्‍या, जाहिरातबाजीच्या तालावर जगणार्‍या जीवनशैलीचा त्याग म्हणजे साधेपणा. माणूस म्हणून स्वत:ला सहजपणे, निरागसपणे, फुलांसारखे नैसर्गिकपणे विकसित करणे म्हणजे साधेपणा. आत एक, बाहेर एक, यातून उभी होणारी जीवनाची गुंतागुंत टाळणे म्हणजे साधेपणा. ‘सिम्प्लिसिटी इज द इसेन्स ऑफ युनिव्हर्सलिटी,’ असे म. गांधी म्हणत. म्हणूनच विलक्षण साधेपणाने ते जीवन जगू शकले. साधेपणातच खरा आनंद असतो आणि त्यामुळेच जगण्याचीही उंची वाढते. बी सिम्पल.
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११