त्यांना दारू हवी आहे…!

0
59

चौफेर
दारूच्या दुष्प्रभावाला, दारुड्या नवर्‍याच्या जाचाला, त्यांच्याद्वारे घातल्या जाणार्‍या धिंगाण्याला कंटाळलेल्या महिलांनी एकत्र येऊन मागणी केली, तर गावातले दारूचे दुकान बंद करण्याचा कायदा मंजूर होऊन आता तशी बरीच वर्षे झाली आहेत. त्यानंतर कित्येक गावांमधील दारूची दुकाने पन्नास टक्के महिलांच्या मताधिकाराने बंद झाल्याचीही उदाहरणे आहेत. मुजोर दारू दुकानदारांना यानिमित्ताने महिलांची ताकद कळली. पण, परवा काय झाले कुणास ठाऊक, सारी चक्रं उलटी फिरली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वहाणगावातील महिलांनी आपल्या गावातलं दारूचं बंद झालेलं दुकान पुन्हा सुरू व्हावं म्हणून आग्रह धरला. तसा ठराव मंजूर केला. आश्‍चर्य आहे ना? महिलांचा आग्रह? तेही दारूचे दुकान सुरू करण्यासाठी? हो! तसे घडले खरे! नंतर कळले की, चंद्रपूर जिल्ह्यातली घोषित दारूबंदी प्रभावीपणे अंमलात येत नसल्याने आणि बंदी असतानाही दारू सर्रास विकली जात असल्याने ती अधिकृतपणेच सुरू करून टाका एकदाची, अशा उपरोधातून या ठरावाची कल्पना उदयाला आली. खरंच तसं घडलं असेल तर ती अजूनच वाईट बाब ठरावी. कोण जबाबदार आहे या परिस्थितीला? चांगल्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या दारूबंदीचा फज्जा उडवायला, बंदीमुळे ज्यांचा धंदा प्रभावित झाला ती तमाम व्यापारीवृत्तीची मंडळी विरोधाचा झेंडा उभारून सरसावली असेल, तर ते स्वाभाविक तरी ठरेल एकवेळ. पण पोलिसांचे काय? त्यांना चरायला कुरण मिळावे म्हणून लागू झाली होती का इथली दारूबंदी? इथे तर बंदी काय लागू झाली अन् पोलिसांचीच चांदी झाली! अवैध मार्गाने, नको त्या पद्धतीने, खरी-खोटी अशा सर्व प्रकारची दारू, बंदीनंतर मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असेल, तर हे अपयश कुणाचे आहे? व्यसनमुक्तीच्या एका चांगल्या सामाजिक उद्देशाने दारूबंदीचा आग्रह धरणार्‍या मंत्र्यांचे? की त्या अंमलबजावणीत खोडा घालणार्‍या यंत्रणेचे? वहाणगावच्या पंचक्रोशीतील महिलांनी परवा मंजूर केलेला ठराव, ही त्या अपयशी यंत्रणेच्या थोबाडीत मारलेली चपराक आहे!
नुसती हाय-वेवरच्या दारू विक्रीवर बंदी घातली कोर्टाने, तर केवढी तारांबळ उडाली लोकांची. महामार्गापासून पाचशे मीटरच्या परिघात तर जणू अवकळा पसरली. त्या कक्षेबाहेरच्या दारू दुकानदारांना मात्र सुगीचे दिवस आलेत मग. आवरता येईना एवढी गर्दी जमू लागली त्या दुकानांसमोर. अगदी, नियंत्रण ठेवायला पोलिस उभे करावे लागावेत इतकी! दारूच्या दुकानासमोर लोक छान शिस्तीत रांगा लावून उभे आहेत. मजूर काय नि साहेब काय, कुठलाच भेद नाही. बडे बडे अधिकारीही कशाचीही पर्वा न करता, लाज न बाळगता आपला नंबर लागण्याची वाट बघताहेत. काऊंटरवर पोहोचले की गुमान पैसे मोजायचे अन् बॉटल घेऊन घराकडे निघायचे. दररोज सायंकाळी हे दृश्य अनुभवले आहे हायवे परिसरातील लोकांनी. काय अस्वस्थता सुरू झाली कोर्टाच्या या निर्णयाने. हाय-वेवरची बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरू व्हावीत म्हणून मतभेद अन् स्पर्धा विसरून एकत्र आले सारे. लॉबी तयार झाली. झालेला निर्णय फिरवण्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्याचे षडयंत्र रचले गेले. दुकाने बंद झाल्याने रोजगार कसा बुडाला अन् तिथे काम करणारी पोरं कशी उघड्यावर आली, त्यांच्यावर कशी उपासमारीची वेळ आली आहे, याचे किस्से रंगवून सांगू लागले व्यापारी. कधी नव्हे एवढी कणव अचानक दाटून आली त्यांच्या मनात, त्या पोरांसाठी. गरिबांवरील दयेच्या आडून यांच्या धंद्याच्या बाता होऊ लागल्या सरकारदरबारी…
चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूबंदीनंतर तरी वेगळे काय घडते आहे? कालपर्यंत ज्यांना राब राब राबवून घेत स्वत:चा व्यवसाय उभा केला, ती पोरं दारूबंदीमुळे बेरोजगार झाल्याचा कांगावा हेच व्यापारी करताहेत. मग बंदीनंतरही दारूचा अवैध व्यापार कसा वाढला, दारूअभावी लोकांचे कसे हाल होताहेत, बंदी कशी अपयशी ठरली, बंदी असूनही शाळकरी पोरांचा वापर करून दारू कशी सर्रास विकली जात आहे, याच्या भडक कथा सांगण्यात हीच जमात पुढे आहे.
बरं, लोकांचीही मानसिकता जगावेगळीच आहे. यांना गावात कुणी दारू पिऊन धिंगाणा घातलेलाही नको. दारू पिऊन नवर्‍यानं बायकोला हाणलेलीही नको अन् या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी बंदीचा प्रयोग केला, तर त्याचे काही प्रमाणातील दुष्परिणामही वाट्याला आलेले नकोत! अन् तरीही समाज सुधारलेला मात्र हवाय् प्रत्येकालाच.
इंटरनेटमुळे चांगलं-वाईट सगळंच हाताच्या बोटांच्या टोकांवर उपलब्ध झालं आहे. त्याचा उपयोग चांगल्याप्रमाणेच वाईटासाठीही तेवढाच होतो, हेही ठाऊक आहे सर्वांनाच. सारंकाही आपल्या नियंत्रणाबाहेर चाललं असल्याची जाणीवही मन विषण्ण करून जाते कित्येकदा. पण, तरीही ‘आपल्या’ घरातली पोरं त्या वाटेनं जाऊ नये, अशी सुप्त इच्छा असतेच की प्रत्येकाच्या मनात. तेच हुंड्याचं, वेश्यालयांचं अन् तेच दारूचं. पूर्वीच्या तुलनेत आज आपल्या समाजात हुंड्याचे प्रमाण दखल घ्यावी इतके कमी झाले आहे. कायद्याच्या धाकासोबतच वर्षानुवर्षांच्या जनजागृतीचाही तो परिणाम आहे. व्यसनांच्या बाबतीतही स्थिती वेगळी कशी असेल? पंजाबातली तरुणाई आजघडीला पुरती ड्रग्जच्या कह्यात गेली असल्याचे उमजायलाही ‘उडता पंजाब’ पडद्यावर यावा लागला. तेव्हा कुठे समस्येचे गांभीर्य कळले तमाम सुजाण नागरिकांना. चित्रपट बघितल्यावर खाड्‌कन डोळे उघडले सर्वांचे. मग सुरू झाली फुकाची चर्चा.
एकीकडे व्यसनमुक्तीचे गोडवेही गायचे नि दुसरीकडे दारूबंदीला विरोधही करायचा, हे कसे चालेल? मुळात हे दायित्व समाजाचे आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. सरकारी यंत्रणेची काम करण्याची स्वत:ची तर्‍हा असते. ती दारूचे परवानेही वाटते आणि व्यसनमुक्तीचे कार्यक्रमही चालवते. महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करतानाचा अनुभव सर्वांना ठाऊक आहे. गुटख्याचे कारखाने बंद करणे ही राज्य सरकारच्या अखत्यारीबाहेरील बाब होती. पण, त्यावर या राज्यात बंदी आणणे सरकारच्या हाती होते. तेवढे सरकारने केले. आता पुढची जबाबदारी समाजाची होती. ज्यांचे धंदे गुटख्याच्या भरवशावर चालले होते, त्यांनी या बंदीचे समर्थन करण्याचा प्रश्‍नच नव्हता. पण, समाजही ठामपणे पाठीशी उभा राहिला नाही. उलट तोच ही बंदी अपयशी ठरल्याचे तुणतुणे वाजवीत राहिला. म्हणूनच आज जागोजागी उभ्या असलेल्या पानटपर्‍यांवरून गुटखाबंदीच्या कायद्याची लक्तरे टांगलेली दिसताहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूबंदीचेही काहीसे तसेच होते आहे. काहींना ती बंदी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने अंमलात आली म्हणून यशस्वी झालेली नको आहे, तर काहींच्या धंद्यावरच आच आली म्हणून त्यांचा बंदीविरुद्ध रोष आहे. ते तर बंदीमुळे या जिल्ह्याची रया कशी लयाला गेली आणि सारा परिसर दारूच्या धंद्यांअभावी भकास कसा झाला, हेच पटवून सांगण्यात व्यग्र आहेत. दारूचे सरळ सरळ समर्थन करता येत नाही म्हणून बंदीच्या अपयशाचा पाढा वाचण्यात दिवस घालवताहेत. जगाच्या पाठीवर कुठेतरी दारूबंदी यशस्वी ठरली का, गांधीजींनी तरी आयुष्यात कधी कुठे दारूबंदीची मागणी केली होती, असे नानाविध प्रश्‍न त्यांच्या सुपीक डोक्यात आकारास येऊ लागले आहेत. त्या प्रश्‍नांच्या आडून आपल्या नापाक इराद्यांना आकार देण्याचे निलाजरे प्रयत्न चाललेत सर्वदूर. समाजहिताला मूठमाती देत, दारूवरची ही बंदी यशस्वी होऊ नये यासाठी धडपडणारे लोक, ही संधी साधून खाबुगिरीत रमलेली भ्रष्ट पोलिस यंत्रणा अन् कशाशीच काही घेणेदेणे नसल्यागत दुरून तमाशा बघणारी समाजव्यवस्था… यामुळेच वहाणगावच्या महिलांवर, बंदी अंमलात आणू शकत नसाल तर दारू विक्री सुरू करा, असं म्हणण्याची वेळ आली आहे… धगधगते असले तरी वास्तव हेच आहे…!
सुनील कुहीकर
९८८१७१७८३३.