पाच हजार कोटीत कर्जमाफी करून दाखवावी

0
72

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना आव्हान
मुंबई, ८ सप्टेंबर 
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेड येथील दौर्‍यात राज्य सरकार केवळ ५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देणार असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत, राहुल गांधी यांना आपण ५ हजार कोटी रुपये देण्यास तयार आहे. यात त्यांनी राज्याची कर्जमाफी करून दाखवावी, असे थेट आव्हान दिले.
राहुल गांधी आणि त्यांच्या सहकार्‍यांना शेती काय आहे, हेच उमगले नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. कॉंग्रेसने १५ वर्षे राज्यात आणि १० वर्षे केंद्रात सरकार असताना शेतकर्‍यांची बिकट अवस्था करण्याचे महापाप केले आहे. त्यामुळेच आज असे दिवस शेतकर्‍यांना सहन करावे लागत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याची कर्जमाफी ऐतिहासिक राहणार असून, लवकरच ती शेतकर्‍यांपर्यंत पोहोचेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू असून ४ प्रकरणी खटले दाखल झाले आहेत. खटले ३० हजार पानांचे असल्यामुळे उशीर होत आहे. पण, ज्या-ज्या प्रकरणी चौकशी पूर्ण होईल, त्या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे राज्यातील महामार्ग आणि सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. यामुळे राज्याचे चित्र बदलणार असून यासाठी मुखमंत्र्यांनी गडकरी यांचे आभार मानले. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील विविध प्रकल्पाबाबत गडकरी यांच्याकडे एकूण १० हजार कोटी रुपयांची मागणी केली असून त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले.(तभा वृत्तसेवा)