हॅरी हौदिनी : ब्रिटिश हेर?

0
43

विश्‍वसंचार
१९०५ सालापासूनच रशियात झारशाहीविरुद्ध क्रांतीचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे तिथल्या समाजमनाचा कानोसा घेण्यात ब्रिटन आणि अमेरिका दोघांनाही स्वारस्य होतं. हौदिनीचं हे अंतरंग उघड झाल्यामुळे प्रतिस्पर्धी गटाने त्याचा काटा काढला असावा का? शक्य आहे. ते रहस्य अजून रहस्यच आहे. पण, हौदिनी खरोखरच हेरगिरीत गुंतलेला असेल, तर तर्क त्याच दिशेने चालवता येतो.

हेरगिरीचं विश्‍व मोठं विचित्र आहे. कोण, कुणासाठी नि केव्हा हेरगिरी करेल, याचा काहीच भरवसा नाही. समाजात प्रतिष्ठितपणे वावरणारे मोठमोठे शास्त्रज्ञ, लेखक, कलावंत हे एका देशात राहून दुसर्‌या देशासाठी किंवा स्वत:च्याच देशातील हेरखात्यासाठी कामकरीत होते, असं अनेकदा उघडकीस आलं आहे.
१९४२ साली जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर नाविकतळावर हवाईहल्ला चढवून ते बंदर उद्ध्वस्त करून टाकलं. नंतर असं उघडकीस आलं की, पर्ल हार्बर नाविक अड्‌ड्यानजीक राहणार्‍या एका जपानी शास्त्रज्ञाने त्या तळाविषयीची बारीकसारीक माहिती जपानी हेरखात्याला पुरवली होती. हा जपानी माणूस स्थानिक जनतेत इतका मिळून-मिसळून गेला होता की, हेरगिरीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आल्यावर स्थानिक लोकांचा विश्‍वासच बसेना.
विल्यम शेक्सपिअर हा त्याच्या काळातला एक श्रेष्ठ नाटककार होता. त्या काळी राणी एलिझाबेथ पहिली, ही इंग्लंडच्या गादीवर होती. इंग्लंड हळूहळू भरभराटीस येत होते. जगभर सर्वत्र इंग्रजांच्या राजकीय आणि व्यापारी यशाची कमान चढती होती आणि अशा त्या कालखंडात राणीला हेरखात्यासाठी अगदी सुयोग्य असा माणूस मिळाला. त्याचं नाव सर फ्रान्सिस वॉल्सिंगहॅम. वरकरणी तो राणीच्या दरबारातल्या इतर अनेक उमरावांसारखाच एक उमराव होता, पण ब्रिटनच्या आधुनिक हेरखात्याचा जनक असा त्याचा सार्थ गौरव केला जातो. खुद्द इंग्लंडमध्ये आणि इंग्लंडच्या प्रतिस्पर्धी असलेल्या देशांमध्ये त्याने आपल्याला अनुकूल असे लोक निर्माण केले. हेरगिरी म्हणजे प्रत्येक वेळी वेष पालटून, लपून-छपून, कुणाचा तरी काटा काढून, काहीतरी नाट्यमय, सनसनाटी कृत्य करून आपल्या मालकांपर्यंत काहीतरी गुप्त रहस्य पोहोचविणं असंच असतं, असं नव्हे. खरी हेरगिरी ही चित्रपट किंवा कादंबर्‍यांसारखी थरारक क्वचितच असते. आपल्याला समजलेली माहिती आपल्या सूत्रधारापर्यंत पोहोचविणं, हीच खरं म्हणजे प्राथमिक स्वरूपाची हेरगिरी असते आणि एकदा तुम्ही प्रतिस्पर्धी गोटात आपल्याला अनुकूल लोक निर्माण केलेत की, त्यांच्यामार्फत माहिती तुमच्यापर्यंत आपोआपच येऊन धडकायला लागते. मग त्या माहितीचा उपयोग आपला राजा, आपलं सरकार, आपला देश यांच्या हितासाठी करून झटपट निर्णय घेणं हे कामहेरप्रमुखाचं असतं. फ्रान्सिस वॉल्सिंगहॅमने हेरखात्याच्या कार्याचं हे सगळं यंत्र अतिशय कुशलतेने उभं केलं आणि अतिशय कार्यक्षमतेने ते चालतं ठेवलं, ही त्याची कर्तबगारी. असं म्हटलं जातं की, न्यूयॉर्क-वॉशिंग्टनवरच्या ९/११ च्या आत्मघाती हल्ल्याची माहिती अमेरिकन हेरखात्याला त्यांच्या माहिती सूत्रांकडून वेळेवर मिळाली होती. पण, निर्णय घेऊन झटपट कृती करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनी कुचराई केली. आपल्याकडेही २६/११ च्या हल्ल्याची माहिती प्राथमिक सूत्रांकडून वेळेवर आलेली होती, म्हणतात. पण, निर्णय घेऊन झटपट कृती करणारी मंडळी पार्टी साजरी करीत होती म्हणे, खरं-खोटं परमेश्‍वर जाणे!
सर फ्रान्सिस वॉल्सिंगहॅमच्या खात्यात अशा गब्रूंना थारा नसल्यामुळे त्याची यंत्रणा अतिशय कार्यक्षम आणि तरबेज होती. समाजाच्या विविध क्षेत्रातले लोक त्याने आपल्या खात्याला जोडलेले होते. त्यातच विल्यम शेक्सपिअरही होता. शेक्सपिअर हा नाटककार होता तसाच नटही होता. त्याची स्वत:ची नाटक कंपनीही होती. तो एवढा लोकप्रिय होता की, त्याच्या नाटकाचे खेळ पाहायला खुद्द राणी एलिझाबेथसुद्धा जात असे!
शेक्सपिअर हा वॉल्सिंगहॅमचा हस्तक आहे, हे कदाचित कधीच उघडकीस आलं नसतं, पण ते उघड झालं ख्रिस्तोफर मार्लोच्या खुनामुळे. ख्रिस्तोफर मार्लो हा शेक्सपिअरचा समकालीन आणि एक प्रतिभावंत असा लेखक होता. मार्लो आणि शेक्सपिअर चांगले मित्र होते. दोघांनी एकत्रितपणे काही नाटकं लिहिली होती. काही साहित्य समीक्षकांचं तर असं म्हणणं आहे की, आज जी शेक्सपिअरची म्हणून ओळखली जातात ती सगळी नाटकं सर म्हणजे मार्लोचीच आहेत. शेक्सपिअरने ती फक्त रंगमंचावर आणली. यातून चित्र उभं राहतं ते असं की, मार्लो हा वॉल्सिंगहॅमचा खरा हस्तक असला पाहिजे आणि शेक्सपिअर हा मार्लोचा हस्तक असावा. आपली नाटकं आपल्याच नावाने ओळखली जाणं मार्लोला गैरसोयीचं असावं म्हणून त्याने आपला मित्र शेक्सपिअर याच्या नावावर लावली असावीत. पण वॉल्सिंगहॅमच्या खात्याचं कामएवढं बेमालूमकी, हे सगळे फक्त तर्क आहेत. पक्का पुरावा काहीच नाही आणि तर्क करण्यापुरती माहिती तरी का उपलब्ध झाली, तर मार्लोचा अचानक खून झाल्यामुळे. हा खूनही रहस्यमय आहे. एका गावठी गुत्त्यामध्ये मार्लो दारू पीत बसलेला असताना बेवड्या लोकांत आपापसात बाचाबाची झाली आणि कुणीतरी मार्लोला ठार मारलं.
आता, मार्लो इतका फालतू इसम नव्हता की, त्याने कोणत्याही हातभट्टीच्या अड्‌ड्यावर दारू ढोसत बसावं आणि अशा अड्‌ड्यावरच्या मारामार्‍याही माफक असतात. त्यात एकदम खून पडतात असं नाही. यावरून तर्क निघतो तो असा की, त्या अड्‌ड्यावर काहीतरी महत्त्वाची खबर (याला हेरांच्या भाषेत पीस ऑफ इंटेलिजन्स असं म्हटलं जातं) मिळणार होती. म्हणूनच मार्लो तिथे गेला असावा आणि प्रतिस्पर्धी गटांंकडून त्याचा निकाल लावण्यात आला असावा.
मार्लोच्या खुनाचं रहस्य अगदी आजही रहस्यच आहे. साहित्यरसिक मात्र, त्यामुळे फार हळहळले. काही वर्षांनी खुद्द फ्रान्सिस वॉल्सिंगहॅमही अचानक मरण पावला. तो फक्त साठच वर्षांचा होता. इंग्लंडच्या राजकीय वर्तुळात त्याचा मृत्यूही रहस्यमयच मानला जातो. हेरांचं जीवन हे असंच असतं. शत्रूच्या गोळ्या अगदी छातीत लागल्यावरही जिवंत राहणारे हिरो हेर हे फक्त चित्रपटातच असतात.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे प्रसिद्ध जादूगार हॅरी हौदिनी याच्याबद्दल नव्याने बाहेर आलेली माहिती. या माहितीवरून असं दिसतं की, हौदिनी हा स्कॉटलंड यार्ड आणि अमेरिकन गुप्तहेरखात्याला माहिती पुरवत होता. आपल्या जादूच्या प्रयोगांचे खेळ करीत हौदिनी जगभर फिरत असे. त्यानिमित्ताने देशोदेशीच्या बड्या बड्या धेंडांशी त्याचा फार जवळून संबंध येत असे. त्यांच्याबद्दलची माहिती हौदिनीने आपल्या धन्याला कळवायची, एवढंच त्याचं काम.
हौदिनीचं मूळ नाव एरिक वेस. तो हंगेरियन ज्यू होता. त्याच्या आई-वडिलांनंी हंगेरीहून अमेरिकेत विस्कॉन्सिन राज्यात स्थलांतर केल्यावर सन १८७४ मध्ये एरिकचा जन्म झाला. अगदी तरुण वयातच एरिक जादूचे प्रयोग करू लागला आणि त्याने लोकांना अक्षरशः वेड लावलं. हॅरी हौदिन नावाचा प्रख्यात फ्रेंच जादूगार होऊन गेला होता. एरिक वेसने त्याच्या स्मरणार्थ हॅरी हौदिनी हेच टोपणनाव धारण केले.
सन १९०६ ते १९२६ ही २० वर्षे संपूर्ण जगात जादूगार हौदिनी हे नाव अक्षरशः दुमदुमत होतं. हौदिनीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही बंधनातून सहजपणे सुटणं. अनेक भक्कम तिजोर्या हौदिनीने अगदी पैज लावून उघडून दाखवल्या! अनेकदा अनेक ठिकाणी हौदिनीला पायापासून डोक्यापर्यंत साखळदंड, बेड्या यांनी जखडून अतिशय कडेकोट बंदोबस्ताच्या कोठड्यांमध्ये ठेवण्यात आलं, पण प्रत्येकवेळी अगदी सर्वांच्या डोळ्यादेखत हौदिनी त्या सर्व बंधनांमधून सुटून बाहेर आला. सर आर्थर कॉनन डॉयल म्हणजे शेरलॉक होम्स या अजरामर व्यक्तिरेखेचा निर्माता-लेखक. हौदिनीने त्याच्यासमोर आपला प्रयोग पाहिल्यावर असं मत व्यक्त केलं की, हौदिनीने आपलं शरीर अणुमात्र करण्याची विद्या मिळवली असली पाहिजे. तो आपलं शरीर सूक्ष्म करून बंधनातून सुटतो आणि मग शरीर पुन्हा स्थूल करतो.
सर आर्थरसारख्या जगद्विख्यात लेखकाने असं मत व्यक्त केल्यामुळे हौदिनी आणखीनच प्रसिद्ध झाला. आपली ही विद्या नेमकी काय आहे आणि आपण ती कुठे शिकलो, हे मात्र त्याने कधीही कुणालाही सांगितलं नाही. पण लोकप्रियतेच्या ऐन शिखरावर असताना १९२६ साली हौदिनी एकाएकी मरण पावला. तो अवघा ५२ वर्षांचा होता. त्याच्या अचानक मृत्यूचं कोणतंही कारण डॉक्टरांना सांगता आलं नाही. हौदिनीचं चरित्र सांगणारी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत.
विल्यम कलुश आणि लॅरी सॉलोमन या संशोधकांना असं आढळून आलं आहे की, अमेरिकन गुप्तहेर खातं आणि ब्रिटिश पोलीस गुप्तवार्ता खातं म्हणजेच स्कॉटलंड यार्ड यांनी हौदिनीच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्याला आपल्यासाठी काम करायला लावलं होतं. विशेषतः रशियामधल्या बातम्या काढण्यासाठी. ब्रिटन आणि रशिया यांच्यातलं वैर फार जुनं आहे. १९०५ सालापासूनच रशियात झारशाहीविरुद्ध क्रांतीचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे तिथल्या समाजमनाचा कानोसा घेण्यात ब्रिटन आणि अमेरिका दोघांनाही स्वारस्य होतं. हौदिनीचं हे अंतरंग उघड झाल्यामुळे प्रतिस्पर्धी गटाने त्याचा काटा काढला असावा का? शक्य आहे. ते रहस्य अजून रहस्यच आहे. पण, हौदिनी खरोखरच हेरगिरीत गुंतलेला असेल, तर तर्क त्याच दिशेने चालवता येतो.
– मल्हार कृष्ण गोखले