पूर्वजांचे स्मरण

0
327

वर्षाच्या तीनशे साठ दिवसांपैकी हे दिवस पितरांच्या आठवणीसाठी राखीव आहेत असं आपली परंपरा सांगते. म्हणून ‘या दिवसांत कोणतंही शुभ कार्य करू नका’ असा घोष सगळीकडे ऐकू येत असतो. पण, वैदिक काळापासून चालत आलेली ही पितर संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून न घेताच या दिवसांना ‘कडू’चं लेबल लावलं गेलंय असं स्पष्ट जाणवतं.

गणेशाच्या दूर जाणार्‍या ‘रुणझुणत्या नूपुरांचा’ निनाद विरत असतानाच सगळीकडे ‘पितृपक्ष,’ ‘कडू दिवस,’ ‘श्राद्धपक्ष’चा घोष ऐकू येऊ लागतो. ‘अरे! आता पंधरा दिवस काहीही शुभ काम करू नका बरं, पितृपक्ष सुरू होतोय, जे काही करायचं ते सर्वपित्रीनंतर!’ असं प्रत्येकजण दुसर्‍याला बजावताना दिसतं. गणपतीचे दहा दिवस जितक्या उत्साहात आणि आनंदात जातात तितकेच हे पंधरा दिवस मरगळ भरले असतात. वर्षाच्या तीनशे साठ दिवसांपैकी हे दिवस पितरांच्या आठवणीसाठी राखीव आहेत असं आपली परंपरा सांगते. म्हणून ‘या दिवसांत कोणतंही शुभ कार्य करू नका’ असा घोष सगळीकडे ऐकू येत असतो. पण, वैदिक काळापासून चालत आलेली ही पितर संकल्पना नेमकी काय आहे हे जाणून न घेताच या दिवसांना ‘कडू’चं लेबल लावलं गेलंय असं स्पष्ट जाणवतं.
मनुष्य जातीचे पूर्वज अथवा मूळपुरुष अर्थात जे पुण्यशील मृत लोक तिसर्‍या स्वर्गात असतात त्यांना पितर असे म्हणतात (ऋग्वेद १०.१५,८). तसंच ज्यांनी पुराणमार्गांचं अनुसरण केलं म्हणजे पुराणांनी विस्तारानं नमूद केलेल्या जीवनशैलीचं जीवन जगले त्या सार्‍यांना पितर म्हणतात. अलीकडे मृत झालेले लोक ज्या मार्गांनी आपल्या पूर्वज ऋषींना भेटावयास जातात, ते मार्ग प्रशस्त करणारे पूर्व ऋषी त्यांनाही पितर म्हणतात (ऋ. १०.१४,२ व ७ इ.). विष्णूच्या तिसर्‍या पाउलाशी या पितरांचा संबंध आहे (ऋ. १०.१५,३). ऋग्वेदांतील दोन सूक्तं यांच्या स्तुत्यर्थ खर्च झाली आहेत (ऋ. १०.१५; १०.५४). वैदिक लोकांनी या पितरांची एकूण सहा कुलंदेखील निश्‍चित केली आहेत, जसं नवग्व, वैरूप, अंगिरस, अथर्व, भृगु, वसिष्ठ (ऋ. १०.१४,४-६; १०.१५,८) ज्यापैकी अंगिरसादि चार कुलं म्हणजेच अथर्ववेद रचणारी व ऋग्वेदाचं दुसरं व सातवं मंडळ रचणारी ऋषिकुलं आहेत. या सर्वकुलांपैकी अंगिरसाचा यमाशी विशेष संबंध असल्याचंही त्यात नमूद केलेलं आहे (ऋ. १०.१४,३ व ५).
शिवाय पितरांचं कनिष्ठ, मध्यम, वरिष्ठ असंही एक वर्गीकरण केलेलं आढळून येतं. तसंच फार पूर्वीचे आणि अलीकडचे अशा प्रकारचीही त्यांची वर्गवारी केलेली दिसते. हे सर्व पितर त्यांच्या वंशजांनां म्हणजे आपल्याला माहीत असणं शक्य नाही तरी अग्नीला ते सर्व माहीत असतात (ऋ. १०.१५,१ व २ इ.) असाही एक संदर्भ ऋग्वेदात दिलेला आहे. अंतरिक्ष, पृथ्वी व आकाश ही पितराचं वसतीस्थान आहे, असाही एक उल्लेख अथर्ववेदांत येतो. (अथर्व वेद १८.२,४९). देवतापूजन करताना यज्ञोपवीत म्हणजे जानवे सव्य = डाव्या खांद्यावरून उजवीकडे उतरलेलं तर पितरांच्या वेळी अपसव्य म्हणजे उजव्या खांद्यावरून डावीकडे उतरलेलं असावं. देवांना जसं अर्घ्य देताना मधल्या बोटावरून पाणी सोडलं जातं तसंच पितरांना तर्पण देताना अंगठ्यावरून. देवतांना हविर्द्रव्य अर्पण करताना स्वाहा म्हणतात तर पितरांना देताना ‘स्वधा’ म्हणतात.
हे वर्णन वाचल्यानंतर ‘पितर’ म्हणजे काही तरी अशुभ, भीती उत्पन्न करणारे किंवा कार्य सिद्धीस न नेणारे असे लोक असतील असं तरी वाटत नाही. उलट त्यांनी पुण्यकर्म केलं आहे असंच म्हटलेलं आहे. ही मंडळी चांगली होती म्हणून तर त्यांच्या स्मरणाकरताचा हा पितृपंधरवडा राखून ठेवलेला आहे.
त्यांचं जीवन, त्यांचे पराक्रम, त्यांची बुद्धी (इंटेलिजन्स), त्यांची मेधा (ऍनालिटिकल केपेबलिटी), त्यांची प्रतिभा (टॅलेंट), त्यांची प्रज्ञा (विस्डम), त्यांची तेजस्विता, त्यांचं व्यवहारचातुर्य यांचं स्मरण करण्याचे दिवस आहेत. कारण आज विकासाच्या ज्या टप्प्यावर आपण आहोत त्या मागे आपल्या सार्‍या पूर्वजांचं योगदान आहे. त्याचं श्रेय त्यांना देण्यासाठीचे हे दिवस.
अंधश्रद्धा म्हणून नाही तर तर्काच्या कसोटीवर या परंपरेचा कस लावला तर असं दिसतं की, पित्यानं कोणत्याही महिन्याच्या शुक्ल किंवा कृष्ण पक्षाच्या ज्या तिथीला देह ठेवला त्या तिथीला वडील, आई सवाष्ण गेली असता अविधवा नवमी, सर्वपितरी अमावास्येला मृत आई-वडील, मृत आजी-आजोबा आणि पणजी-पणजोबा या तीन पिढ्यांना आणि परिवारातील इतर मृत स्त्री पुरुषांना पिंडदान आणि त्यांच्या आधीच्या बेचाळीस पिढ्यांना सामूहिक तर्पण देऊन त्यांच्याविषयी आपला आदरभाव व्यक्त करण्यात येतो. याचा नेमका अर्थ या श्राद्धविधीतून आपण आपली वंशावळ म्हणजे आजच्या भाषेत ‘पेडिग्री’ निश्‍चित करत असतो.
कोऽ हं? म्हणजे ‘मी कोण आहे?’, ‘माझी परंपरा काय आहे?’, ‘माझे संस्कार काय आहेत?’, ‘या समाजात माझ्या पूर्वजांचे काय योगदान होतं?’, ‘या समाजाप्रती माझं कर्तव्य काय आहे?’ या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं याच दिवसांत शोधायची असतात. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी व्यक्ती स्वत:च्या स्वतंत्र ओळखीसकट या समाजरचनेचा अविभाज्य घटक असतो. मानसशास्त्रात असं म्हणतात जे अनाथ असतात, ज्यांना त्यांच्या आई-वडिलांची पूर्वजांची काही माहिती नसते त्यांचं सगळं आयुष्य स्वत: ही ओळख शोधण्यात गुंतून जातं. ते आपलं सगळं जीवन एका अपूर्ण व्यक्तिमत्त्वासह कंठतात. याला इंग्रजीत ‘आयडेन्टीटी क्रायसिस’ म्हणतात. यातून एक विचित्र न्यूनगंड म्हणजे इनफीरियारिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो.
ज्या पूर्वजांनी आपल्याला वेद-उपनिषद् दिलेत, श्रुति-स्मृति-पुराणं आणि रामायण महाभारतादि ग्रंथ दिलेत, योगसूत्रापासून कामसूत्रापर्यंत आणि मूर्तिशास्त्रापासून नाट्यशास्त्रापर्यंत विद्या आणि कला दिल्यात, ज्यांनी संस्कृतसारखी शास्त्रशुद्ध भाषा, त्यातून निघणार्‍या अन्य २२ भाषा आणि तीन हजाराहून अधिक लोकभाषा दिल्यात, ‘कर्णभारम्’ ते ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ आणि ‘मृच्छकटिकम्’सारखी मनोरंजक नाटकं दिलीत, कादंबरी, पंचतंत्र, वेताळ पंचवीसी, सिंहासन बत्तीशीसारखे व्यवहारचातुर्याचे वस्तुपाठ दिलेत, ज्यांनी अष्टाध्यायीसारखा परिपूर्ण व्याकरण ग्रंथ दिला, शून्य आणि दशमान अंकपद्धती दिली, खगोलशास्त्र रसायनशास्त्र आणि आयुर्वेद दिला, ज्यांनी आम्हाला अहिंसा-सत्य-अस्तेय-ब्रह्मचर्य आणि सम्यक ज्ञानाची पंचसूत्री दिली, ज्यांनी आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्‍वत:’ (सर्व दिशांनी चांगले विचार आमच्यापर्यंत पोहोचो) ‘सर्वेपि सुखिन: सन्तु…….. कश्‍चित् दु:खभाग् भवेत्‌॥ (सर्व सुखी होवोत, सर्व निरोगी राहोत, सर्वांना सर्वत्र शुभच दिसो कोणीही दु:खाचा भागी होऊ नये)’ आणि ‘ॐ सहनाववतु…… मा विद्विषावहै| (आम्हा दोघा गुरू-शिष्यांचे रक्षण व्हावे, आम्हा दोघांचे एकत्रितपणे पोषण व्हावे = (ज्ञानाची) भूक भागवावी, दोघांनी एकत्रितपणे (शक्ती प्राप्त करून) पराक्रम गाजवावा आणि तेजस्वी व्हावे, आम्ही कधीही परस्परांचा विद्वेष करू नये (म्हणजेच स्नेहाने रहावे) आणि सर्वत्र शांती असावी’ अशा प्रार्थना दिल्यात, ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्यांनी शिक्षण आणि राज्यघटनेच्या मार्गानं सामाजिक समता स्थापित करण्याची दिशा दाखावली, ज्यांनी आम्हाला ‘आयडेन्टीटी क्रायसिस’पासून वाचवलं, त्या आपल्या सार्‍या पूर्वजांचं स्मरणांचं नूतनीकरण करण्याचा हा काळ. या सगळ्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणजे पितृपक्षातला श्राद्धविधी. यात अशुभत्वासाठी तिळमात्र जागा नाही हे निश्‍चित. अर्थात काळानुरूप यात आलेलं प्रदूषण आणि शोषण दूर करून या सगळ्या विधीला त्याचा पूर्वीचा अर्थ मिळवून देणं हेही आपल्याच हातात आहे. म्हणून हा लेख प्रपंच!
– डॉ. रमा गोळवलकर
९४२२११४६२०