‘शहरी नक्षली’ गौरी लंकेश

0
281

हत्या आणि त्यामागचे राजकारण…
गौरी, माओवाद व नक्षलवाद समर्थक असल्यामुळे कर्नाटकात त्यांना ‘शहरी नक्षली’ म्हणून ओळखले जात होते. याच नक्षल्यांनी, त्या फितूर झाल्या म्हणून त्यांची हत्या केली असण्याची दाट शक्यता आहे आणि पोलिसही त्या दिशेने तपास करीत आहेत.
५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही अत्यंत धक्कादायक, घृणित, निंदनीय घटना आहे, यात शंकाच नाही. परंतु, या घटनेवरून देशातील काही मीडियाने, बहुतेक पत्रकारांनी आणि कथित विचारवंतांनी जो नंगा नाच सुरू केला आहे, त्याने कुठल्याही विवेकी नागरिकाला चीड येणे स्वाभाविक आहे. गौरी लंकेश यांची हत्या झाल्याला अर्धा तासही होत नाही, तर ही कथित प्रगतिशील, लोकशाहीसमर्थक, मुक्त विचारांची ठेकेदार मंडळी लगेच फलक घेऊन रस्त्यावर उतरली आणि हा खून संघ/भाजपाने केला म्हणून त्यांच्यावर गलिच्छ आरोप करू लागली. ही तत्परता आश्‍चर्यचकित करणारी आहे. या हत्येला हिंदुत्वाचे समर्थक जबाबदार आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्याप्रमाणेच, यांच्यासारखीच ही हत्या आहे. स्वतंत्र विचाराचे तोंड बंद करण्यात आले, लोकशाहीचा खून आहे वगैरे आरोप होऊ लागले.
उत्तरप्रदेशात भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्यापासून ही मंडळी तशीही अस्वस्थच होती. अनेकांना तर रात्री झोपही येत नसावी. त्यातच, भाजपाने उत्तरप्रदेशसारख्या अत्यंत महत्त्वाच्या राज्याची धुरा योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपविल्यापासून तर ही मंडळी आता केवळ पागल व्हायचीच राहिली. ही अस्वस्थता, हा कसाबसा दाबून ठेवलेला पागलपणा, लंकेश यांच्या हत्येच्या निमित्ताने उफाळून आला आणि स्वत:ला सहिष्फणू, उदारमतवादी म्हणवून घेणार्‍यांचा एक किळसवाणा चेहरा सर्वांसमोर आला. नीचपणालाही काही मर्यादा असावी. यांना तर तीही मान्य नाही, असे दिसते.
सोशल मीडियावर प्रत्येकाला आपल्या मनातील भावनांचे कढ प्रत्यक्ष उतरविता येणे सहजशक्य झाल्यामुळे, या माध्यमाच्या द्वारे या लोकांनी आपली गरळ ओकणे सुरू केले. कशाचीही शहानिशा न करता, तर्काला हाताशीही न घेता, या लोकांनी या प्रकरणी संघ/भाजपा/हिंदुत्वाला गोवण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे या लोकांची वस्त्रहीनताच प्रकर्षाने दिसून आली. या सर्व गदारोळात, गौरी लंकेश यांची हत्या, त्या कोण होत्या, त्यांना समाजात असे जीवघेणे शत्रू कसे निर्माण झाले असावेत, ते कोण होते इत्यादी विषयांवरील चर्चा मागे पडली. कसेही करून, कुठल्याही निमित्ताने या देशातील हिंदूंना, त्यांच्या आस्थेला, त्यांच्या परंपरेला, त्यांच्या श्रद्धेला झोडपत सुटायचे, हीच आतापर्यंत या कथित सहिष्णू व उदारमतवादी, मानवतावादी विचारवंतांची कृत्ये राहिली आहेत. त्यात ही एक आणखी भर पडली, इतकेच.
या सहिष्णू, उदारमतवादी लोकांचा आरोप आहे की, जो कुणी संघाच्या विरुद्ध, भाजपाच्या विरुद्ध बोलतो, त्याला असेच गोळ्या घालून शांत केले जाते. याला काही पुरावा मागितला, तर ते बेशरमासारखे विचारतात की, मग कुणी केला असेल खून? तुम्हीच सांगा. काय पण युक्तिवाद आहे. प्रथम यांनीच तुम्हाला आरोपी ठरवायचे आणि त्याला तुम्ही विरोध केला, तर स्वत:ला निर्दोषही तुम्हीच ठरवायचे. इतकेच नाही, तर खरा गुन्हेगार कोण हे देखील त्यांना सांगायचे! अशी ही आपल्या येथील पत्रकारिता झाली आहे. आमच्या देशातील ही अशी कथित वैचारिक पातळी झाली आहे. कशाला ना बूड ना शेंडा! तोंडात येईल तसे बरळत जायचे.
गौरी लंकेश या पत्रकारापेक्षा नक्षलवादाच्या समर्थक म्हणून अधिक प्रसिद्ध होत्या. त्यांच्या एकूण लिखाणावरून असे लक्षात येते की, जे काही भारतविरोधी किंवा हिंदुविरोधी असेल, त्यासाठी त्यांचा जीव तुटायचा. जेएनयुमधील कुख्यात भारतविरोधी विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार आणि उमर खालिद (अफजल गुरू व ‘भारत तेरे तुकडे करेंगे’ फेम), जिग्नेश मेवानी, शेहला रशीद हे गौरी यांना आई मानायचे. यावरून जे काही यायचे ते लक्षात आले असेलच. त्यामुळे गौरी यांची हत्या झाल्याबरोबर लगेचच सोशल मीडियावर ‘भगव्या लोकांनी हा खून केला’ असल्या वामपंथी आरोपांचा पाऊस पडू लागला. कुठलाही पुरावा नाही. कुठलाही तपास नाही. कॉंग्रेसच्या बहुतेक समर्थकांनी तसेच मीडियाच्या दलालांनी, या खुनाचा आळ संघ/भाजपावर घेतला. त्या माओवाद व नक्षलवाद समर्थक असल्यामुळे कर्नाटकात त्यांना ‘शहरी नक्षली’ म्हणून ओळखले जात होते. याच नक्षल्यांनी, त्यांची हत्या केली असण्याची दाट शक्यता आहे आणि पोलिसही त्या दिशेने तपास करीत आहेत.
गौरी यांचे वडील निर्भीड पत्रकार होते. त्यांनी त्यांच्या काळात कर्नाटकातील प्रभावशाली, शक्तिसंपन्न राजकारण्यांविरुद्ध मोठ्या हिमतीने लिहिले होते. परंतु, त्यांची मुलगी गौरी, त्यांच्यासारखी नव्हती. त्या हिंदुद्वेष्ट्या आणि नक्षलसमर्थक होत्या. यामुळे त्यांच्या कुटुंबात भयंकर वाद झालेत. त्या उघडपणे कम्युनिस्ट पक्षाच्या समर्थक होत्या आणि स्वत:ला सेक्युलर समजायच्या. परंतु, त्यांचे विचार व वागणे सेक्युलर शब्दाला शोभणारे नव्हते. त्यांचे लिखाण थेट नसायचे; उलट, हिंदू धर्माला शिव्या घालणारे, अपमानित करणारे बनावट कहाण्यांचे असायचे. हे त्यांनी मृत्युपूर्वी केलल्या आपल्या दोन टि्‌वटमध्ये मान्य केले आहे. हिंदू संस्कृतीला फसवी संबोधून, हिंदू देवदेवतांची टिंगल करणे त्यांची सवय होती. स्वत:च्या बेजबाबदार व तर्कहीन कृत्यांनी त्यांनी नेहमीच वाद व टीका ओढवून घेतली होती. २०१६ साली दोन अवमानना खटल्यात त्यांना सहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. परंतु, त्या सध्या जामिनावर मोकळ्या होत्या. गौरी यांची पृष्ठभूमी, नक्षलवादी व माओवाद्यांशी असलेल्या संबंधांमुळे वादग्रस्त होती. हे त्यांच्या भावानेच उघड केले होते. गौरी नेहमी नक्षल्यांच्या हक्कांसाठीच लढल्या. नक्षल्यांच्या कृत्यांचे नेहमीच समर्थन केले. २००५ साली कर्नाटकातील अनेकांच्या हत्यांना जबाबदार असलेल्या साकेत राजन या नक्षल्याच्या शिक्षेला गौरी यांनी कडाडून विरोध केला होता. कट्‌टर नक्षलवादी विक्रम गौडा, बी. जी. कृष्णमूर्ती, मंदगड्‌डे लता आणि प्रभा यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा होती. मरणाआधी त्यांनी जे टि्‌वट्‌स केलेत, त्यावरून असे लक्षात येते की, त्यांच्या स्वत:च्या कम्युनिस्ट मंडळीत अंतर्गत फूट पडली होती आणि त्या सांगत आहेत की, आपण आपल्याच लोकांना उघडे पाडायला नको. उलट आपल्या समान शत्रूवर आम्ही लक्ष केंद्रित करायला हवे. त्यांच्याच काही लोकांनी फसव्या पोस्ट टाकल्या आहेत. नक्षल्यांशी संबंध असलेली मंडळी नेहमीच भीतीखाली असतात, हे आपण लक्षात ठेवायला हवे.
काही अंतर्गत माहिती अशी आहे की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारच्या काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची त्या चौकशी करीत होत्या, ज्यामुळे त्यांच्या स्वत:च्याच लोकांमध्ये फूट पडली असावी. आश्‍चर्य म्हणजे अनेकांचे जीव घेणार्‍या ब्ल्यू व्हेल गेमच्या त्या समर्थक होत्या. यावरून त्यांची एकूण मानसिकता लक्षात यावी. या सर्व घटनांवरून असे लक्षात येते की, त्यांच्या सहकारी कम्युनिस्ट मंडळींसोबत त्यांचे गंभीर मतभेद झाले होते आणि कदाचित या मतभेदांनीच हे अनिष्ट वळण घेतले असावे. परंतु, हे सर्व बाजूला ठेवून, या लिबरल व सेक्युलर ठेकेदारांनी, समाजाची सहानुभूती मिळविण्यासाठी तसेच राजकीय फायद्यासाठी गौरी यांच्या हत्येला संघ/भाजपालाच जबाबदार धरणे सुरू केले. किती दुर्दैवाची गोष्ट आहे ही!
याच कर्नाटकात २०१५ पासून १२ संघ व भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्यात, यावर कुणीच काही बोलत नाहीत. कुणाच्याच डोळ्यात अश्रू नाहीत. का? जर दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या हत्येमागे एक विशिष्ट विचारसरणी आहे, तर मग या १२ संघ कार्यकर्त्यांच्या हत्येमागेही कुठलीही तरी विचारसरणी असली पाहिजे. बिहारमध्ये तीन पत्रकारांच्या हत्या झाल्या. पण, तेव्हा असला गदारोळ नाही उठला. स्वत:ला स्वतंत्र विचारांचे, उदारमतवादी म्हणवून घेणारेच खरे तर इतके असहिष्णू असतात की, यांना दुसर्‍यांचे मत सहनदेखील होत नाही. विरुद्ध विचारांच्या लोकांना ठार करणे, ही तर कम्युनिस्टांची परंपराच आहे. भारतातही हीच परंपरा त्यांनी जिवंत ठेवली आहे. फक्त नाइलाजाने लोकशाहीचा बुरखा पांघरून. आज या खोटारड्या लोकांना, देशभक्त लोकांनी सोशल मीडियावरून ज्या प्रकारे उत्तरे दिली आहेत, त्यांचे बुरखे ज्या प्रकारे टराटरा फाडले आहेत, त्याने ही मंडळी अक्षरश: हादरून गेल्याचे लक्षात येईल. दाभोळकर, कलबुर्गी यांची हत्या तर कॉंग्रेसशासित राज्यात झाली होती आणि तरीही अद्याप त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. पण, कुणीही कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांचे राजीनामे मागितल्याचे ऐकिवात नाही. या मंडळींचे एक बरे असते, भाजपाशासित राज्यात हत्या झाली की, भाजपाचा मुख्यमंत्री जबाबदार आणि कॉंग्रेसशासित राज्यात हत्या झाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार! काय पण तर्कशास्त्र आहे! आता या मंडळींचा हा वैचारिक दहशतवाद चालणार नाही. त्यांचा ‘लांडग्याचा ढोंगीपणा’ सर्वत्र उघड झाला आहे. पण म्हणतात ना, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही, असेच काहीसे या पाखंड्यांचे होत आहे.
वामपंथी विचारांच्या कुणाची हत्या झाली की, लगेच भाजपा व संघाला जबाबदार धरायचे, हे कळण्यापलीकडे आहे. ज्या व्यक्तीची हत्या झाली, तिचे समाजात अन्य कुठल्या तरी कारणांवरून वैरत्व निर्माण होऊ शकते, कौटुंबिक वाद असू शकतात, संपत्तीचा घोळ असू शकतो. परंतु, हे काहीही विचारात घ्यायचे नाही आणि या देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून असहिष्णुता वाढली आहे, अशी बोंब ठोकत, सर्व घटनांना मोदींना जबाबदार धरायचे, हा बावळटपणा आहे. ही वामपंथी मंडळी, त्यांचा देशविघातक विचार, त्यांची सत्ताकेंद्रे २०१४ पासून वेगाने मरणपंथाला लागली आहेत. या र्‍हासाची नेमकी कारणे काय, याचा शोध खरेतर या मंडळींनी घ्यायला हवा. पण, यांना त्याच्यात रस नाही. कसेही करून या देशातील हिंदू समाजाला छिन्नविच्छिन्न करण्यात मशगूल असलेली ही मंडळी, जेव्हा कुणी या समाजाला एकात्म, समरस, संघटित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यावर गिधाडांसारखी तुटून पडतात. प्रत्येक गोष्टीतून संघावर ही जी खालच्या पातळीवरची खोटी टीका होते, ती याच कारणामुळे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या मंडळींचे दुर्दैव आणि या देशाचे सुदैव म्हणूनच, या असल्या संकटातून प्रत्येक वेळी संघ अधिक उजळून निघाला आहे. संघावर केलेले अनर्गल आरोप कालांतराने खोटे सिद्ध झाले म्हणून या लोकांनी कधीही माफी मागितलेली नाही. लोकांची मने कलुषित करायची आणि त्यातून आपला स्वार्थ साधायचा, हेच यांना ठाऊक! त्यासाठी भारताचे संविधान, त्यातील तरतुदी सोयीनुसार वापरायच्या. आज स्थिती अशी आली आहे की, समाजातील काही मूठभर लोक सोडले तर यांच्या आरडाओरडीला कुणी भीकही घालेनासे झाले आहे. राष्ट्रभक्त मंडळी तर यांच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. त्यांचे समाजाला संघटित करून बलशाली करण्याचे कार्य शांतपणे अविचल सुरूच असते. दुर्लक्ष केल्याने तमोगुण आपोआप नाहीसे होतात, असे म्हणतात. तीच गत आता या मंडळींची होत आहे. दिवा विझण्यापूर्वी जसा तो त्वेषाने फडफडतो, तशी ही यांची फडफड आहे, असेच आपण समजले पाहिजे.
कोण होत्या गौरी लंकेश?
१९६२ साली जन्मलेल्या गौरी या कवी व पत्रकार ए. पी. लंकेश यांच्या कन्या होत. कविता व इंद्रजित ही त्यांची भावंडे. ए. पी. लंकेश यांनी कन्नड भाषेत ‘लंकेश पत्रिके’ नावाचे नियतकालिक सुरू केले होते.
परंतु, गौरी यांनी आपली पत्रकारितेची कारकीर्द टाईम्स ऑफ इंडियापासून सुरू केली. नंतर त्या आपले पती चिदानंद राजघट्‌टा यांच्यासमवेत दिल्लीला आल्या. गौरी या स्त्रीवादी, स्वतंत्र विचारांच्या, मानवतावादी, लोकशाहीवादी, सेक्युलर असल्यामुळे काही वर्षांतच त्यांचा चिदानंद यांच्याशी घटस्फोट झाला. नंतर त्या बंगळुरूला परत आल्या. तिथे त्या नऊ वर्षे सण्डे साप्ताहिकाच्या (डाव्या विचारांचे नियतकालिक) वार्ताहर होत्या. २००० साली वडिलांच्या मृत्यूच्या वेळी त्या तेलुगू टीव्ही वाहिनी इनाडूमध्ये दिल्ली येथे कार्यरत होत्या.
वडिलांच्या मृत्यूनंतर गौरी व त्यांचा भाऊ इंद्रजित यांनी, लंकेश पत्रिकेचे प्रकाशक मणी यांची भेट घेतली व आता हे प्रकाशन बंद करण्याची इच्छा बोलून दाखविली. मणी यांनी त्यांना या विचारापासून परावृत्त केले. त्यानंतर गौरी लंकेश पत्रिकेच्या संपादक झाल्या आणि भाऊ इंद्रजित, या नियतकालिकेच्या प्रकाशनाची जबाबदारी पाहू लागला.
२००१ च्या आरंभी गौरी आणि इंद्रजित यांच्यात, नियतकालिकेच्या धोरणासंदर्भात मतभेद सुरू झाले. हे मतभेद फेब्रुवारी २००५ मध्ये चव्हाट्यावर आले. कारण, पोलिसांवरील नक्षल्यांच्या एका हल्ल्याचे समर्थन करणारा रिपोर्ट गौरी यांनी संमत करून पत्रिकेत प्रकाशित केला. १३ फेब्रुवारीला इंद्रजितने (जो या पत्रिकेचा मालक व प्रकाशक होता) हा रिपोर्ट नक्षल्यांच्या समर्थनार्थ असल्याचे कारण देऊन काढून टाकला. १४ फेब्रुवारीला इंद्रजितने पोलिसांकडे, पत्रिकेच्या कार्यालयातील कॉम्प्युटर, प्रिंटर आणि स्कॅनर गौरीने चोरले म्हणून तक्रार केली. इंद्रजितने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून आपल्याला मारण्याची धमकी दिली म्हणून गौरी यांनी प्रतितक्रार दाखल केली. १५ फेब्रुवारीला इंद्रजितने पत्रपरिषद आयोजित करून, या पत्रिकेतून गौरी नक्षलवादाचा प्रचार करते म्हणून आरोप केला. गौरी यांनी स्वत:ची पत्रपरिषद घेऊन स्वत:वरील आरोप फेटाळले आणि माझा भाऊ इंद्रजित माझ्या सामाजिक कार्याला विरोध करतो, असा आरोप केला. त्यानंतर त्यांनी स्वत:चे ‘गौरी लंकेश पत्रिके’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.
गौरी हिंदुत्वाच्या कट्‌टर विरोधक होत्या. २००३ साली, बाबा बुदानगिरी येथे स्थित गुरू दत्तात्रेय बाबा बुदान दर्ग्याच्या हिंदूकरणाला, हा संघाचा डाव आहे म्हणून कडाडून विरोध केला होता. लिंगायत समाजाला अल्पसंख्यक धर्म म्हणून मान्यता मिळावी, यासाठी त्या झगडत होत्या. (त्या स्वत: लिंगायत होत्या) बसवण्णा यांचे अनुयायी हिंदू नाहीत, असे त्या म्हणायच्या.
कॉंग्रेसच्या काही भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध त्यांनी काही लेख लिहिले असले, तरी नोव्हेंबर २०१४ मध्ये कॉंग्रेसच्या सरकारने त्यांना, हिंसा सोडून शरण यावे म्हणून नक्षल्यांचे समुपदेशन करण्यासाठी स्थापित एका सरकारी समितीचे सदस्य नियुक्त केले. परंतु, भाजपाच्या एका शिष्टमंडळाने, गौरी या नक्षलसमर्थक आहेत, असा आरोप करीत, त्यांना या समितीतून काढून टाकण्याची मागणी केली होती. परंतु, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ती मागणी फेटाळली.
२३ जानेवारी २००८ रोजी गौरी लंकेश यांनी त्यांच्या साप्ताहिकात, भाजपा नेते व खासदार प्रल्हाद जोशी, उमेश दुशी, शिवानंद भट व व्यंकटेश मेस्त्री यांच्या विरोधात लेख लिहिला. या भाजपा नेत्यांनी एका सोनाराला १ लाख रुपयांनी फसविल्याचा आरोप, या लेखात करण्यात आला. खोटे आरोप करून आपली बदनामी करण्यात आली म्हणून, जोशी व दुशी यांनी गौरी यांच्याविरोधात दोन स्वतंत्र अवमानना खटले दाखल केले. त्यावर पुरावे देण्याऐवजी गौरी यांनी बोंब ठोकली की, मी डाव्या विचारसरणीची असल्याने या भाजपा नेत्यांनी माझ्याविरुद्ध हा खटला दाखल केला. हा खटला रद्द करावा म्हणून गौरी उच्च न्यायालयात गेल्या, परंतु न्यायालयाने खटला रद्द करणे तर सोडाच, उलट खालच्या न्यायालयाने हा खटला सहा महिन्यांच्या आत निकाली काढावा म्हणून निर्देश दिले. २७ नोव्हेंबर २०१६ रोजी, कुठल्याही सक्षम पुराव्याअभावी हे आरोप केल्याचे मान्य करीत न्यायालयाने गौरी यांना दोषी ठरविले व सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. याच न्यायालयाने गौरी यांना अटकपूर्व जामीनही मंजूर केल्यामुळे त्या सध्या बाहेर होत्या. असा हा या बाईंचा जीवनप्रवास आहे.
– श्रीनिवास वैद्य / ८४४६० १७८३८