स्वाती महाडिक रिपोर्टिंग सर…

0
63

-• लष्करात लेफ्टनंट पदावर झाल्या रुजू
-• वर्षभर घेतले खडतर प्रशिक्षण
चेन्नई, ९ सप्टेंबर 
उत्तर काश्मीरच्या कुपवाडा येथे अतिरेक्यांचा हल्ला परतावून लावताना वीरमरण पत्करणारे महाराष्ट्राच्या सातारा येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी स्वाती महाडिक आज शनिवारी भारतीय लष्करात लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी महाडिक यांचे कुटुंबही उपस्थित होते.
संतोष महाडिक अतिरेक्यांशी लढताना शहीद झाल्याचे वृत्त कानावर पडताच स्वाती यांना मोठा धक्का बसला होता. पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांनी स्वत:ला सावरले आणि देशसेवेचा पक्का निर्धार मनाशी करताना भारतीय लष्करातच सहभागी व्हायचे ठरविले. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी तत्कालुन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी खास त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल केली होती. स्टॉफ सिलेक्शनची परीक्षा उत्तीण केल्यानंतर स्वाती यांनी ११ महिन्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण यशस्वी रीत्या पूर्ण केले. आज सकाळी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत आयोजित शानदार दीक्षांत समारंभात त्यांनी लेफ्टनंट म्हणून शपथ घेतली आणि भारतीय लष्करात प्रवेश केला. त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यातील देहू रोड येथे होणार आहे.
महाराष्ट्राचे वीरपुत्र संतोष महाडिक यांना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी कुपवाड्यात अतिरेक्यांशी लढा देताना वीरमरण आले होते. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी त्यांनी दोन ते तीन अतिरेक्यांचा खातमा केला होता. या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलेदेखील लष्करातच जातील, असा निर्धार केला होता.
चेन्नईत खडतर प्रशिक्षण
देशसेवेची संधी मिळावी यासाठी स्वाती महाडिक यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यांच्या निर्धाराला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांनी चेन्नईत एक वर्षाचे अतिशय खडतर प्रशिक्षण घेतले. चेन्नईत मिलिट्री ट्रेनिंग अकादमीत स्वाती यांच्यासोबतचे सर्व उमेदवार त्यांच्यापेक्षा किमान १० वर्षांनी लहान होते. देशसेवेच्या उद्देशाने झपाटलेल्या स्वाती महाडिक प्रशिक्षणार्थी उमेदवारांमध्येही अव्वल राहिल्या. ट्रेनिंग अकादमीत झालेल्या सोहळ्यात त्यांना बेस्ट कॅडेटचे पदक प्रदान करण्यात आले. (वृत्तसंस्था)