उत्थानासाठी भारतीय संस्कृतीशी अनुरूप शिक्षण आवश्यक

0
70

-• डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
-• पुनरुत्थान विद्यापीठातर्फे भारतीय शिक्षा ग्रंथमालेचे लोकार्पण
नवी दिल्ली, ९ सप्टेंबर 
भारतीय संस्कृतीला अनुरूप असे शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत भारताच्या उत्थानाची कल्पनाच करता येणार नाही, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज शनिवारी येथे केले. फिनलॅण्डची शिक्षणपद्धती भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धतीशी मिळतीजुळती असल्याचेही ते म्हणाले.
पुनरुत्थान विद्यापीठातर्फे भारतीय शिक्षण पद्धतीवर तयार करण्यात आलेल्या भारतीय शिक्षा ग्रंथमालेच्या लोकार्पण समारंभात डॉ. भागवत बोलत होते. श्यामाप्रसाद मुखर्जी सिव्हिक सेंटरच्या केदारनाथ साहानी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा. से. समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे होत्या. यावेळी व्यासपीठावर शिवलिंग शिवाचार्य महाराज, हरिभाऊ वझे, के. नरहरजी, धर्मनारायण अवस्थी, ब्रह्मदेव शर्मा, दीनानाथ बत्रा, शंतनू शेंडे आणि पुनरुत्थान विद्यापीठाच्या कुलगुरू इंदुमती काटदरे उपस्थित होते.
‘भारतीय शिक्षा : संकल्पना और स्वरुप’, ‘भारतीय शिक्षा का समग्र विकास प्रतिमान’, ‘भारतीय शिक्षा के व्यावहारिक आयाम’, ‘पश्‍चिमीकरणसे शिक्षा की मुक्ती’ आणि ‘भारतीय शिक्षा : संकटों का निराकरण’ या पाच ग्रंथांचे लोकार्पण केल्यानंतर डॉ. भागवत आपल्या उद्‌बोधनात म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची आवश्यकता आहे, या मुद्यावर सर्वांचे एकमत आहे. मात्र हे परिवर्तन कसे आणायचे याबाबत संभ्रम आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न चालले असले तरी हे प्रयत्न अधिक संघटित आणि शास्त्रशुद्धपणे करण्याची गरज आहे.
सदोष शिक्षण पद्धतीमुळे समाजजीवनात विकृती आली, ही वस्तुस्थिती आहे. मात्र याचा दोष फक्त औपचारिक शिक्षण देणार्‍या शाळांवर टाकून चालणार नाही. कारण शाळेत विद्यार्थी काही तासच राहातो. त्याचा जास्तीतजास्त वेळ घरी आणि समाजात असतो. त्यामुळे शाळांसोबतच घरातून आणि समाजातून विद्यार्थ्यांवर संस्कार होण्याची गरज आहे. या दृष्टीने पालकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, त्याबरोबर माध्यमांनीही यात आपले अपेक्षित योगदान दिले पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले.
समाजाच्या सर्वच क्षेत्रात वेगाने पतन होत आहे, त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. त्यामुळे यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधावे लागतील, त्यात सुधारणा कराव्या लागतील, असे स्पष्ट करीत डॉ. भागवत म्हणाले की, आपल्या देशात स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोरसारखे महान व्यक्तिमत्त्व निर्माण झालेत. मेकॅलोप्रणित शिक्षणपद्धतीचा कोणताही परिणाम त्यांनी आपल्यावर होऊ दिला नाही. शाळेतील वातावरणाचा आपल्या देशातील लोकांवर परिणाम झाला असता, तर एवढा मोठा स्वातंत्र्यलढा आपल्या देशात उभा होऊच शकला नसता.
आपल्यावर पाश्‍चात्त्यांचा, अमेरिका आणि इंग्लंड यांचा प्रभाव असला तरी त्या या देशातील शिक्षण फारसे दर्जेदार नाही, याकडे लक्ष वेधत डॉ. भागवत म्हणाले की, सवार्र्त चांगली शिक्षणपद्धती फिनलॅण्डमधील आहे. आम्ही आमच्या विद्याथ्यार्र्ंना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने नाही, तर जीवनातील स्पर्धेत टिकण्याच्या दृष्टीने तयार करीत असतो, असे तेथील शिक्षक सांगत असतात. या ठिकाणी लहान मुलांना वर्गात कोंडून नाही, तर मुक्त वातावरणात व्यावहारिक शिक्षण दिले जाते. समाजाची आणि निसर्गाची ओळख करून दिली जाते. चौथी ते आठवीपर्यंत अर्धे शिक्षण मुक्त वातावरणात, तर अर्धे शिक्षण वर्गातून दिले जाते. आठवीनंतर मात्र औपचारिक शिक्षणावर भर दिला जातो. त्यातही मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. अन्य देशातून येणार्‍या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या त्यांच्या मातृभाषेतच शिकवले जाते. विशेष म्हणजे अशा प्रकारचे शिक्षण देणारे शिक्षक तयार करणारे विद्यापीठ त्या देशात आहे. फिनलॅण्डची शिक्षणपद्धती आपल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीशी मिळतीजुळती आहे, याकडे डॉ. भागवत यांनी लक्ष वेधले.
त्यामुळे आज आम्हाला शिक्षण व्यवस्थेतील दोष शोधून काढण्यासोबतच आत्मपरीक्षणाचीही गरज आहे. आज आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचे आहे, कोणत्या मार्गाने जायचे आहे, ते ठरवावे लागेल, असे स्पष्ट करीत डॉ. भागवत म्हणाले की, आज भारतीय मूल्यांच्या आधारे शिक्षण देण्याची गरज आहे. यासाठी विरोध करणार्‍या तथाकथित बुद्धिवंताना आधी आम्हाला शिक्षित करावे लागेल. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील मनन आणि चिंतनासोबत आम्हाला नवनवे प्रयोगही करावे लागतील. शिक्षण क्षेत्रातील बदलाबाबत आज लोकार्पण करण्यात आलेल्या ग्रंथात संशोधन करून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ही माहिती आमच्या विचारांना नवी दिशा देणारी आहे, तसेच आपल्या मातीला आणि संस्कृतीला अनुरूप असे बदल शिक्षणक्षेत्रात घडवण्यासाठी पूरक ठरणारी आहे, असे गौरवोद्‌गार डॉ. भागवत यांनी काढले.
इंदुमती काटदरे यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. ईश्रदयाल यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह सुरेशजी सोनी आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शैक्षणिक धोरणावरच देशाचा विकास : प्रमिलाताई मेढे
कोणत्याही देशाचा विकास, वैभव आणि प्रतिष्ठा त्या देशाच्या शैक्षणिक धोरणावर अवलंबून असते, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. शिक्षणाच्या भारतीयकरणाबद्दल आम्ही विचार करीत आहोत, काही प्रयोग करीत आहे, ही अतिशय समाधानाची बाब आहे, याकडे लक्ष वेधत प्रमिलाताई म्हणाल्या की, सरकार सर्व काही करू शकत नाही. काही बाबतीत जनतेनेच पुढकार घेण्याची गरज असते. जनतेने एकदा ठरवले की काहीही होऊ शकते, अशक्य ते शक्य होऊन जाते, हे सांगताना त्यांनी बंगालच्या फाळणीचे उदाहरण दिले. इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, पण तेथील जनतेच्या तीव्र विरोधामुळे फाळणीचा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला, असे त्या म्हणाल्या.
प्रत्येक देशात विकासाचा बीजबिंदू असतो. आपल्या देशातील विकासाचे बीज आपल्या जीवनपद्धतीत, संस्कृतीत आहे, असे स्पष्ट करत त्या म्हणाल्या की, मानव बनवण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण आणि मानव म्हणजे ज्याला मन आहे तो. मानव जन्म घेऊन ईश्‍वरीय गुणांची प्राप्ती करण्यासाठी आपली वाटचाल आम्ही सहजपणे करू शकतो, अशा शिक्षणाची आज गरज आहे. ज्ञान आणि शिक्षण याचा व्यावहारिक उपयोग आम्हाला करता पाहिजे, शिक्षणाचा असा उपयोग आम्हाला करता आला नाही, तर ते शिक्षण निरर्थक आहे, असे प्रमिलाताई मेढे यांनी पोपटाच्या उदाहरणावरून स्पष्ट केले. (तभा वृत्तसेवा)