विविधज्ञानविस्ताराला १५० वर्षे झाली!

0
42

इतिहास
एप्रिल १८५० साली सुरू झालेले ‘ज्ञानप्रसारक’ हे मासिक उणेपुरे १७ वर्षे चालून १८६७ साली बंद पडले अन् त्याच वर्षी ‘विविधज्ञानविस्तार’ सुरू झाले, हा योगायोगच ठरावा. विविधज्ञानविस्ताराला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. एखाद्या मराठी नियतकालिकाचे १५० वर्षे जगणे ही मराठी नियतकालिकाच्या इतिहासातील मोठी गोष्ट आहे. १८९७ साल प्लेगचे वर्ष असल्याने या वर्षाचा अपवाद वगळता ‘विस्तार’ निघतच राहिले.
प्रारंभी डेमी साईज असलेल्या या मासिकाचे मुखपृष्ठ पिवळ्या, तपकिरी किंवा निळ्या पातळ कागदाचे होते. सध्याची ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ विविधज्ञानविस्तारात ऑगस्ट १९१३ पासून छापली जात असे ती १९२५ पर्यंत. त्या वेळी मात्र ‘विस्तार’चा आकार बदलून तो जी क्राऊन साईज झाला होता. नक्षीदार महिरपी गोलाकारात इंग्रजी ‘श्री विविधज्ञानविस्तार A Monthly Magazine of Marathi Literature for Ladies and Gentlemen’ ही टॅगलाईन विस्ताराच्या अंकावर असे. या मासिकाचे प्रकाशक रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक व गोविंद गंगाधर फडके हे होते, तर अंक गणपत कृष्णाजी यांच्या छापखान्यात छापला जात असे. इ. स. १८६७ पासून ते १८७४ पर्यंत विस्ताराचे अंक जुलै ते जून निघत. पुढे ते १८७५ पासून जानेवारी ते डिसेंबर असे निघू लागले. या मासिकाच्या प्रसिद्धिपत्रकावर रा. भि. गुंजीकर व त्यांचे सहयोगी रा. नी. मोघे यांच्या सह्या आहेत. १८६७ ते १८७४ पर्यंत रा. भि. गुंजीकर हे विस्ताराचे संपादक होते. पुढे १८७४ ते १८९८ हरी महादेव पंडित व पुरुषोत्तम गोविंद नाडकर्णी हे संपादक झाले. १८९८ ते १९२३ रामकृष्ण रघुनाथ मोरमकर, १९२३ ते १९३४ अनंत आत्माराम मोरमकर; अखेरीस १९३४ ते १९३७ या चार वर्षांत रामचंद्र काशिनाथ टिपणीस यांनी संपादकांची जबाबदारी सांभाळली होती. विस्ताराचे प्रारंभीचे धोरण स्पष्ट करताना, ‘‘सांप्रत अशा पुस्तकांची आपल्या लोकांस, आणि विशेष करून स्त्रियांस किती आवश्यकता आहे हे सिद्ध करण्यास जितका आनंद होतो तितकाच मुंबई इलाख्यासारख्या विस्तीर्ण व भरगच्च वस्तीच्या प्रदेशात, विद्यावृद्धीमुळे सालीना सरकार व रयत ह्यांच्या संबंधाने सुमारे सतरा लक्ष रुपये खर्च होऊन सरासरी सत्तर हजार विद्यार्थ्यांस विद्यामृत प्राप्त होत असता, त्यांच्याच कल्याणार्थ व विश्रांतीस्तव असे एखादेही मासिक पुस्तक नसल्याने विषादही प्राप्त होतो. पहा! आज दोन वर्षांमागे हेच पुस्तक. भगीरथ प्रयत्न करून एका त्या वेळच्या कुबेरवत धनाढ्याच्या साहाय्याने प्रसिद्धीस चौखंडी गाजलेला असा प्रचंड विद्वान आपल्या नित्याच्या संशययुक्त वचनाने त्या धनाढ्याच्या औदार्याआड आला आणि प्रकाशनास समय लागला.’’ असे संपादकांनी म्हटले आहे. या पत्रात प्रसिद्धीसाठी उशीर जरी लागला असला, तरी त्या उशिरामुळे मराठी नियतकालिकाच्या वाङ्मयीन, साहित्यिक व वैचारिक इतिहासात त्यामुळे मोलाचीच भर पडलेली आहे.
नावाप्रमाणे विविधज्ञानविस्तारात अनेक विषयांवर लेखन झालेले आढळते. विख्यात पुरुषांची चरित्रे, नाटके, कविता, लेख, इतिहास, संशोधन, स्त्रियांना उपयोगी पडणारे लेखन, शास्त्रीय, मनोरंजन, भाषांतरे, विज्ञानविषयक, आरोग्यविषयक, नीतिवादावरील विचार, पुस्तक परीक्षणे यांतून विद्यार्थी, लहान मुले आणि मोठी माणसे या सर्वांना वाचनकक्षेत सामावून घेण्याचे धोरण विविधज्ञानविस्ताराने आखले होते. सामाजिक विषयावर त्वरित व समयोचित टिपणी, त्यावर विचारमंंथन, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकमत, स्त्री शिक्षण, बालविवाह, धर्मोन्नतीचा राष्ट्रोन्नतीशी संबंध, औद्योगिक स्थिती, ग्रंथालयाचा प्रसार व त्याचे महत्त्व, मराठीच्या इतिहासाची साधने, शिवकालीन राज्यघटनेतील मूलतत्त्वे, ऐतिहासिक गोष्टींना पुराव्याने संशोधन करून त्यास ठळक जागा देणे, मुंबई राज्याचे वर्णन, पृथ्वीची उत्पत्ती, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व्यापार, कायदा, ज्योतिषशास्त्र, गणितशास्त्र, नक्षत्रविज्ञान, इंग्रजी राज्यामुळे देशाला झालेले फायदे व तोटे इत्यादी विषयांचा ऊहापोह विस्तारात झालेला आढळतो. भाषा व व्याकरण, नूतन पुस्तकांची परीक्षा अशा प्रकारचे विविध विषयांची उपस्थिती १८९८ पर्यंत विविधज्ञानविस्तारात आढळते. त्यानंतर संपादनाची सूत्रे रावसाहेब मोरमकरांकडे आली. महाराष्ट्र साहित्यपत्रिकेचा समावेश विविधज्ञानविस्तारात झाला व पुढे धोरणातही फरक पडत गेला. विस्तारातून इतर विषयांच्या बरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषदेची घटना व तात्त्विक बैठक यावर बराच विचार केला गेला.
विविधज्ञानविस्तारातील विविध विषयांचा अवाका पाहता, या मासिकाला कोणताही विषय वर्ज्य नव्हता असे दिसते. इतक्या सार्‍या विषयांवर विविधांगांनी लिहिण्यासाठी विस्तारकर्त्यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ लेखकांची फळीच उभी केली होती. यात हरी माधव पंडित, म. वा. चितळे, खं. भि. बेलसरे, सदाशिव रिसबुड, रा. रा. भागवत. काशिताई कानिटकर, शाहीर राम जोशी, गो. बा. कानिटकर, महादेव मोरेश्वर कुंटे, आरोग्यविषयक लेखन करणारे डॉ. सखाराम, ज्योतिषशास्त्र, आरोग्यशास्त्र, भाषाविज्ञान, नक्षत्रशास्त्र या विषयावर स्वत: रा. भि. गुंजीकर, वा. दा. ओक, ज. ब. पंडित, इतिहाससंशोधक नी. ज. कीर्तने, भाषाशास्त्र व व्याकरणविषयक लेखन करण्यात वा. गो. आपटे, चि. वि. वैद्य यांचे साहाय्य घेतले. खाडिलकर, कोल्हटकर, अ. मा. जोशी, निळकंठ जनार्दन कीर्तने. वा. म. जोशी, ना. कृ. वैद्य, ग. स. भाटे, आ. स. बर्वे, रं. कृ. चिचलीकर, कमलाबाई किबे, ग. भा. गानू, गं. दे. खानोलकर, ना. वा. टिळक, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, नी. ब. भवाळकर, कवी यशवंत, न. चिं. केळकर, वा. ना. देशपांडे, न. र. फाटक, पां. वा. काणे, पं. घुलेशास्त्री व पं. सातवळेकर, के. व्ही. लक्ष्मणराव अशा कितीतरी विज्ञान लेखकांनी विस्तारात लेखन केले. ही यादी अधिक लांबविता येईल.
वरील ठळक अशा लेखकांच्या यादीवरून लक्षात येते की, विविधज्ञानविस्तारात सर्वसमावेशक असा व्यापक साहित्यविचार करण्यात आला होता. नवे नवे वाङ्मयप्रकार, संशोधन, विविध ज्ञानशास्त्रे, ऐतिहासिकता, ललित वाङ्मय या विषयांचे चिंतन विस्तृत रीत्या झालेले आपल्याला विस्तारातून पाहायला मिळते. महाराष्ट्राचा सांस्कृतिक पटच आपल्यासमोर उभा राहतो.
विविधज्ञानविस्ताराच्या या भल्या मोठ्या परिघाच्या पार्श्वभूमीवर मराठी नियतकालिकांची आजची स्थिती फारशी काही भूषणावह आहे असे म्हणता येत नाही. काळ आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा जरी विचार केला तरी सर्वच काळात साहित्य, वाङ्मय, संशोधन, विविध शास्त्रे, विद्या, विज्ञान यात परिवर्तन होतच असते. या सार्‍यांचा समावेश आजच्या मराठी नियतकालिकांत असायला हवा, ही वर्तमानाची गरज आहे. आजच्या मराठी नियतकालिकांत सर्वसमावेशकता हरवत चालल्याचे चित्र समोर येते. बहुधा प्रत्येक नियतकालिकाचा साचा सारखाच झालेला आढळतो. कविता, कथा, समीक्षा, नाटक, व्यक्तिचित्रे, ललित या डबक्यात पोहताना ती दिसतात, किंवा एका विशिष्ट विषयाला समर्पित तरी ती बहुधा झालेली असतात. अपवाद म्हणून एखाद्या दुसर्‍या विषयाचा लेख असलाच तर तेवढाच. आज मराठी नियतकालिकांचे क्लोन (Clone) झाल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वच मराठी नियतकालिकांत सारखेपणा आढळत असेल, तर मासिकाची वर्गणी भरावीच का, असा प्रश्‍न वाचकांपुढे निर्माण झाला तर त्याला दोष देता येणार नाही.
‘हिवाळा ९१’ च्या ‘भाषा आणि जीवन’ या अंकात डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी भाषा आणि जीवनचे तत्कालीन संपादक डॉ. अशोक केळकर यांना एक पत्र लिहिले होते. डॉ. कुलकर्णी लिहितात, ‘‘तुम्ही (डॉ. केळकर) एक महत्त्वाचे भाषिक वाङ्मयीन कार्य करीत आहात, पण ते करताना पत्रिकेस गटपत्रिका/ कुटुंबपत्रिका वा प्रातिनिधिक लेखसंग्रह असे स्वरूप येणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायला हवी. नाहीतर पत्रिकेचा ताजेपणा व सर्वसमावेशकता बाधित होईल.’’ असे लिहून त्यांनी काही मासिकांचा उल्लेखही केला. डॉ. कुलकर्णी यांचे हे निरीक्षण मराठी नियतकालिकांविषयीचे गटबाजीचे राजकारण करणार्‍यांना चिंतन करावयास लावणारे ठरावे.
वाङ्मय म्हणजे एक स्वतंत्र बेट आहे आणि अशा बेटांचा समूह मिळून एक वेगळे राष्ट्र बनले आहे. अशा ऐटीत राहण्यातच वाङ्मयवाले व वाङ्मयीन नियतकालिकवाले आजपर्यंत आपले वर्तन आखत आले आहेत. वाङ्मय ही आपली संस्कृती आहे, असे लोकांना वाटत नाही ते यामुळेच. लोक वाङ्मयापासून दूर जात आहेत, की वाङ्मय लोकांपासून दूर जात आहे? विविधज्ञानविस्तार ७० वर्षे चालले. अस्मितादर्शसारखे एखादेच मासिक ५० वर्षांचा पल्ला गाठू शकते. (संस्थेची मुखपत्रे यांस अपवाद) गटागटात विखुरलेली आजची मराठी नियतकालिके व त्यांचे लेखक-संपादकाची एकहाती सत्ता यामुळे मराठी नियतकालिकांची अवस्था दुर्बळ झाली आहे. जोपर्यंत सर्वसमावेशक विषय व लेखक यांचा अंतर्भाव व गटनिरपेक्षता नियतकालिकांमध्ये आढळत नाही तोपर्यंत मराठी नियतकालिकांच्या स्थितीवर चर्चा होणारच आहे आणि ती फारशी आशादायक असणार नाही.
सत्याच्या मार्गावरचा प्रवास खडतर असतो. सत्याचा शोध घेणं मोठं कठीण काम आहे. सत्याच्या मार्गावर चालत असताना माणूस जशा शिकता शिकता घडत असतो तसाच या प्रक्रियेत सामाजिक सत्यही बदलत असते. समाजाच्या तत्कालीन सत्याकडे व तथ्यांकडे पाठ फिरवून जर वाङ्मयवाले व वाङ्मयीन नियतकालिकवाले आत्ममग्न राहात असतील, तर मग वाङ्मयवाले व मराठी नियतकालिकवाले यांच्या भविष्यावर प्रश्‍नचिन्हच उमटत राहील!
विलास चिंतामण देशपांडे
९९६००३११४८