काश्मीर : ज्योतिषीय विश्‍लेषण

0
67

भविष्य
काश्मीरचा प्रश्‍न ‘‘न गाली से सुलझेगा न गोलीसे – वो सुलझेगा गले लगानेसे’’ हा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातून १५ ऑगस्ट रोजी दिला. त्यावर सर्व वृत्तपत्रातून विशेष लेख लिहिण्यात आले. काहींनी अच्छे दिन कुठे आले? नोटबंदी, जीएसटी अयशस्वी झाले त्याशिवाय नेहमीप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा हा शब्द तर हमखास वापरल्या गेलाच. तरुण भारतमधील संपादकीय हे नेहमीच चिंतनीय असतात. मंगळवार २२.८.२०१७ रोजीचे ‘देशासाठी अच्छे दिन’ या संपादकीय लेखात या सर्व विषयांचा निष्पक्षपणे आढावा घेण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काश्मीर प्रश्‍नावरसुद्धा विस्तृत चर्चा केली आहे.
काश्मीर इतिहास : प्राचीन काळी ‘भारत वर्ष’ हा शब्दप्रयोग सध्याचे पाकिस्तान, अरब देश, कंधार, ब्रह्मदेश, नेपाळ, इस्रायल इ. संपूर्ण दक्षिण आशिया खंडाचा समावेश असलेला अखंडित भारत देश यासाठी वापरला जात होता. पुराणांमध्ये काश्मीरचे वेगवेगळ्या प्रदेशासाठी कोर (अक्रोड पिकविणारा), काश्मीर (कस्तुरी), दराद अशा नावाने संबोधण्यात आले आहे.
एकेकाळी काश्मीर (कश्यप-नीर) हिमालय पर्वतातील ‘स्वधर्म मैत्री’ आणि आध्यात्मिक विकासाचे केंद्र होते. काश्मीरमध्ये शैव पंथाचे अनुसरण हजारो वर्षांपासून सुरू होते. काश्मीर ही शैव संप्रदायाची आस्तिक-अद्वैतवादी वैदांतिक शाखा आहे.
या आध्यात्मिक शाखेचा विकास इ. स. आठव्या शताब्दीमध्ये झाला. पं. अभिनव गुप्ता यांनी नवव्या शतकात ‘तंत्रालोक’ या ग्रंथाची रचना केली. ‘वसुधैव कुटुंबकम’ या आध्यात्मिक विचारधारेनुसार काश्मीरमध्ये इस्लाम, बौद्ध, ख्रिस्त आदी धार्मिक विचारधारेच्या लोकांनी येऊन वास्तव्य केले. अनेक वर्षांपर्यंत वेदान्तवादी पावन भूमीवर सर्व धर्माचे लोक आपापल्या धर्माप्रमाणे सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रात विकसित झाले.
काश्मीरचा भाग भारत राष्ट्राचे एक अभिन्न अंग म्हणून हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. काश्मीरची संस्कृती संपूर्ण वेदान्तवादी आहे. सुमारे सात दशकांपूर्वी तालिबानी, वहाबी इ. धार्मिक कट्टरवादी संघटनांनी विघटनवाद आणि दहशतवादास जन्म दिला. काही मूर्ख लोक या अनिष्टकारी विघटनवादी विचारांना ‘आजादी’ असे म्हणतात. परंतु ‘आजादी’ म्हणजे एक राष्ट्राला स्वराज्य मिळविण्यासाठी केलेली लढाई असते. काश्मीर भारताचे एक अभिन्न अंग आहे. काही काश्मिरी भारतापासून काश्मीरला ‘आजाद’ करण्याची लढाई आहे असे म्हणतात. यास चोराच्या उलट्या बोंबा असे म्हणावे लागेल. अविभाजित काश्मीरला पूर्ण रूपाने सामाजिक-सांस्कृतिक भारतामध्ये विलय होणे हे न्यायसंगत आणि तर्कसंगत आहे. काही मूठभर लोकांनी इस्लामिक कट्टरवादामुळे काश्मीरवर हक्क सांगणे धर्मांधतेचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. या लोकांना दंड देणे, हेच मानव जातीचे कल्याणासाठी एकमात्र साधन आहे.
ज्योतिषीय विश्‍लेषण
ज्योतिषामधील ‘मेदिनीय’ विभागात राष्ट्रीय भविष्य वर्तविण्याची सूत्रे दिली आहेत. यासाठी त्या देशाच्या स्थापनेच्या कुंडलीवरून राष्ट्राचे भविष्य विचारात घेतले जाते. भारताच्या स्वातंत्र्याची कुंडली आणि प्रजासत्ताक दिनाची कुंडली या दोन कुंडल्यापैकी कोणती कुंडली विचारात घ्यावी हा प्रश्‍न निर्माण होतो. त्याचे उत्तर असे की-
१) भारताची स्वातंत्र्यदिनाची (१५.८.१९४७) कुंडली भारतावरील परकीय आक्रमणे, भारत-पाक युद्धे, भारत- चीन युद्ध, बांगलादेश निर्मिती, परराष्ट्र, परकीयांची घुसखोरी अशा प्रकारच्या भारताच्या स्वातंत्र्यास धोका निर्माण करणार्‍या घटनांसाठी विचारात घेतली पाहिजे.
२) भारताच्या प्रजासत्ताक दिनाची (२६ जानेवारी १९५०) कुंडली देशांतर्गत घटनांसाठी सांसदीय, शासकीय मुद्यांचे अनुषंगाने तसेच देशातील मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचारात घ्यावयास पाहिजे.
भारतीय स्वतंत्रता आणि भारतीय गणतंत्र कुंडलीमध्ये काही प्रमुख ग्रह वेगवेगळ्या प्रकारची शुभाशुभ फळे देतात. एक ग्रह स्वतंत्रता कुंडलीत शुभ फलदायक आहे तर गणतंत्र कुंडलीत अशुभ फलदायक आहे. अशा परिस्थितीत कोणत्या प्रश्‍नासाठी गणतंत्र कुंडली नियंत्रित करेल? आणि कोणत्या प्रश्‍नासाठी स्वतंत्रता कुंडलीतील ग्रहयोग नियंत्रित करतील याचा साकल्याने विचार करणे आवश्यक आहे. स्वतंत्रता कुंडलीत गुरू शत्रू राशीत (तुला राशी-निर्बल) षष्ठ भावात स्थित आहे. त्याची केंद्र सरकारचे कर्मस्थान (दशम) आणि लग्नभावावर दृष्टी आहे. शनि आणि शुक्र शुभ फलदायक आहे. हर्षल/मंगळ द्वितीय स्थानात (राष्ट्रीय कोष) स्थित असून, त्याची नैसर्गिक आपत्ती स्थानावर (अष्टमस्थान) दृष्टी आहे. भारताच्या राज्यकर्त्यांनी, भारताची स्वतंत्रता आणि अखंडता एवं परराष्ट्र संबंध शुभ ठेवण्यासाठी दैत्य गुरू-शुक्रग्रह, न्यायप्रिय परिश्रमी ग्रह शनी आणि युद्धप्रिय सेनानायक मंगळ या तीन ग्रहांना प्रसन्न केले पाहिजे. भारताचे परराष्ट्र धोरण आणि युद्धनीती हे मंगळ, शुक्र आणि शनि या तीन ग्रहांचे स्वभावानुरूप असले पाहिजे. हे तीनही ग्रह आक्रमक तसेच सैन्य प्रगतीप्रिय आहेत. भारताला अस्त्र, शस्त्रनिर्माण, आयात-निर्यात याबाबत गंभीर चिंतन करणे आवश्यक आहे. या क्षेत्रातील प्रगतीमुळेच भारताची अखंडता कायम राहू शकते. या क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यास अशुभ फळे मिळतील. शांती, संधीवार्ता, शत्रू राष्ट्राला क्षमा करणे इ. बाबी गुरू, चंद्र आणि बुधाचे प्रिय विभाग आहेत. जुलै ते सप्टेंबर २०१७ मध्ये चंद्र/गुरू अंतर्दशेत संधीवार्ताचे वातावरण राहील. ऑक्टोबर २०१७ मधील ग्रह गोचरी महायुद्धाचे संकेत देतात. भारताची अखंडता कायम राखण्यासाठी ऑक्टोबर २०१७ मधील सैन्य कारवाई भारताला विजय मिळवून देईल. १५ ऑगस्ट २०१७ रोजी पंतप्रधानांच्या भाषणातील काश्मिरी जनतेशी संवाद साधणे म्हणजे उत्तम कूटनीतीचे भाष्य आहे. त्याच वेळी विलगवाद्यांना काबूत आणण्यासाठी कठोर कारवाई करण्यास भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आहे. इकडे चीनसोबत, ‘डोकलाम’ प्रश्‍न संधीवार्ता म्हणून सोडविला जाईल असे म्हणत असतानाच उपलष्करप्रमुखांना युद्धासाठी शस्त्रखरेदी करण्यासाठी पूर्ण अधिकार दिले आहेत. यावरून अनुकूल ग्रहस्थिती येताच युद्धाला तोंड देण्याची संपूर्ण तयारी भारताच्या राज्यकर्त्यांनी केली आहे असे दिसते.
मात्र युद्ध जिंकण्यासाठी भारताने आखलेल्या ध्येय-धोरणास विरोधासाठी विरोध ही भूमिका विरोधी पक्षांनी सोडून द्यावी. लष्कराचे मनोबल खचेल अशा प्रकारचे वक्तव्य करणे विरोधी पक्षाने टाळावे. सर्वसामान्य जनतेने महागाईची कळ सोसण्याची तयारी ठेवावी. युद्ध न होता कूटनीतीमध्ये भारताला काश्मीरप्रश्‍न सोडविता आला पाहिजे हीच प्रभूचरणी प्रार्थना.
दिनकर दामोदर देशपांडे
९८९०७६५४७९