संस्कृत भाषा व संस्कृतीचा चालता बोलता ज्ञानकोश

0
51

मानवंदना
प्रज्ञाभारती डॉ. श्री. भा. वर्णेकर जन्मशताब्दी महोत्सव समिती, नागपूर व अभ्यंकर नगर नागरिक मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त वतीने आज नागपूरच्या सायंटिफिक सभागृहात डॉ. वर्णेकर यांना मानवंदना देण्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त…
‘विदर्भविषयः खलु सारस्वतीजन्मभूः|’ असे विदर्भप्रदेशाचे वर्णन कवी राजशेखर याने केले आहे. महाकवी डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर (प्रज्ञाभारती) यांनी अर्वाचीन काळात ही उक्ती सार्थक केली. इतकेच नव्हे, तर जगन्नाथ पंडितानंतर संस्कृत काव्यपरंपरा संपली, किंवा संस्कृत ही एक मृतभाषा आहे, असले घोर गैरसमज त्यांनी आपल्या समर्थकृतीतून दूर केले. ‘अर्वाचीन संस्कृत साहित्य’ या आपल्या डी. लिट्.च्या प्रबंधातून डॉ. वर्णेकरांनी संस्कृत भाषेच्या साहित्यसरितेची अमृतधारा आजही अक्षुण्ण असल्याचा साक्षात्कारच घडविला! मग स्वर्गीय बाबासाहेब आपटे यांच्या प्रेरणेतून प्रबंधातील सिद्धान्त प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी जवाहर-तरंगिणी, विनायकवैजयन्ती, कालिदासरहस्यम्, श्री रामकृष्णपरमहंसीयम्, वात्सल्यरसायनम् ही पाच शतककाव्ये, शिवराज्योदयम् हे महाकाव्य, सात गीतिकाव्ये, असंख्य स्फुट कविता, नाटके, लेख, कोश इत्यादी संस्कृतसाहित्य प्रवाहित केले. आज यातील अनेक भाग विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. केन्द्र सरकारच्या साहित्य अकादमीचे सन्माननीय सदस्य असणार्‍या डॉ. वर्णेकरांनी केलेल्या संस्कृत भाषेच्या अभूतपूर्व सेवेसाठी इतर अनेक पुरस्कारांसोबत राष्ट्रपती पुरस्कारदेखील प्राप्त केला होता. संस्कृत भाषेविषयीचे कोणत्याही उपक्रमात आजही त्यांचे नाव पुढे येत असते.
दादांचा जन्म ३१ जुलै १९१८ रोजी (तिथी आषाढ कृष्ण-९) नागपूर येथे एका सामान्य कुटुंबात झाला. चित्रकला व ज्योतिःशास्त्राचे जाणकार असणारे त्यांचे वडील भास्करराव हे व्यवसायाने वास्तूंचे नकाशे काढणारे व बांधकाम करणारे छोटेसे ठेकेदार होते. सुदैवाने अगदी लहानपणीच श्रीधरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार प्राप्त झाले. १९३० मधील महात्मा गांधींच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे बाल श्रीधरची शाळा सुटली. पण, मुलाच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून भास्कररावांनी त्याला शेजारच्या पंडित हनुमंतशास्त्री केवलेंचे घरी शिकायला पाठविले. तेथे अमरकोश, व्याकरण इत्यादी अध्ययन पूर्ण करून श्रीधरने प्रा. वर्‍हाडपांडे यांचेकडून अभिजात संस्कृतसाहित्याचे धडे घेतले. या दरम्यान त्याने कालिदास, भवभूती, भारवी, राजशेखर या कवींच्या बहुतेक रचना तसेच रामायण, महाभारतातील बराचसा भाग कंठस्थ केला. या व्यासंगाने बाळ श्रीधरला संस्कृत भाषेतून कविता करण्याचा छंद जडला तो कायमचाच!
दुर्दैवाने वयाच्या केवळ पंधराव्या वर्षीच आई सौ. अन्नपूर्णा व पाठोपाठ वडील भास्करराव यांच्या दुःखद निधनाचा आघात सर्व भावंडांना सहन करावा लागला. त्यामुळे विद्यार्जनासोबत अर्थार्जन साधण्यासाठी श्रीधररावांनी नागपूरच्या अंधविद्यालयात शिक्षकाचे काम करीत इतर शिकवण्यादेखील केल्या. या सर्व धडपडीतून संस्कृत भाषाविषयात स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्राप्त करीत श्रीधरराव, नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजात प्राध्यापक झाले. तेथे अठरा वर्षे अध्यापन करीत नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर संस्कृत भाषाविभागातील रीडरचे पद त्यांनी प्राप्त केले. पुढे तेथील विभागप्रमुखपद भूषवीत सुमारे त्रेचाळीस वर्षांच्या अध्यापनसेवेतून डॉ. श्री. भा. वर्णेकर १९७९ साली निवृत्त झाले.१९६७ ते ७० च्या दरम्यान प्रा. वर्णेकर नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होते. तसेच महाराष्ट्र सरकारच्या संस्कृत भाषेच्या स्थायी समितीचे ते सन्माननीय सदस्य राहिले. संस्कृत भाषा प्रचारिणी सभेच्या स्थापनेपासून ते सक्रिय सदस्य व सुमारे सहा वर्षे ‘भवितव्यम्’ या संस्कृत साप्ताहिकाचे संपादक होते. स्व. बाबासाहेब आपटेंच्या प्रेरणेने प्रा. वर्णेकरांनी १९६० ते ७२ च्या तपोवधीत नियमपूर्वक केवळ संस्कृत भाषेतून सार्वजनिक व्याख्याने दिली. त्यांची व्याख्याने मधुर, रसाळ, सुबोध व धाराप्रवाही असत. यातून अनेकांना संस्कृत भाषाध्ययनाची प्रेरणा मिळत असे. आम्हा मुलांनाही आपल्या आवडत्या लौकिक क्षेत्रासोबत संस्कृत भाषेचे अध्ययन करण्याचा उपदेश त्यांनी केला.राष्ट्रशक्ती या मराठी साप्ताहिकाचे संपादन करीत दैनिक तरुण भारतचा साहित्य विभागही त्यांनी चार-पाच वर्षे संभाळला. ‘सुबोध ज्ञानेश्‍वरी’ ही ज्ञानेश्‍वरीची आधुनिक मराठीतील समश्लोकी त्यांनी लिहिली. तसेच अभंग धम्मपद, भारतीय धर्म व तत्त्वज्ञान ही मराठी पुस्तके व भारतीय विद्या हे हिंदी पुस्तक त्यांनी लिहिले. फ्रेंच भाषा शिकून गीतेचा अनुवाद केला. वयाच्या पंचाहत्तर वर्षेपर्यंत केलेल्या संस्कृत साहित्याचा संग्रह ‘प्रज्ञाभारतीयम्’ या नावाने, अटलबिहारी वाजपेयींच्या हस्ते ४ जाने. १९९४ रोजी नागपुरात प्रकाशित करण्यात आला. स्वास्थ्य चांगले नसतानादेखील पूजनीय बाळासाहेब देवरस या समारंभास आवर्जून उपस्थित होते. तसेच संस्कृत वाड्‌मयकोशाचे लोकार्पण राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांचे हस्ते झाले होते. डॉ. वर्णेकरांची अनेक गीते, कविता विविध कार्यक्रमांत आजही गायल्या जातात. बहुतेक प्रत्येक विवाह निमंत्रणाचे उत्तर ते संस्कृत भाषेतील मंगलाष्टकातून देत असत. डॉ. वर्णेकरांच्या सर्व साहित्यकृतींचे सुवाच्च अक्षरांत लेखनाचे कार्य त्यांची पत्नी सौ. कमला निरंतर करीत असे. खर्‍या अर्थाने ती त्यांची सहधर्मचारिणी होती.
भोसला वेदशाळा व योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी अनेक वर्षे भूषविले. १९८३ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात आयोजित संस्कृत संमेलनात सरकारतर्फे भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले.अशा या विदर्भाच्या थोर संस्कृतपुत्राचे १० एप्रिल २००० रोजी एका अपघातात दुःखद निधन झाले. भौतिक शरीराने जरी ते आपल्यात नसले, तरी देववाणी संस्कृत भाषेच्या साहित्यरूपाने ते अमर आहेत. कालिदास पुरस्कार, डॉ. हेडगेवार प्रज्ञा पुरस्कारासारखे आठ मोठे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. ते आदर्श संघस्वयंसेवक, उत्तम पिता, श्रेष्ठ प्राध्यापक, दशसहस्रेषु वक्ता व चालताबोलता संस्कृत भाषा व संस्कृतीचा ज्ञानकोश होते! त्याच्या साहित्याचे अध्ययन हीच जन्मशताब्दीनिमित्त त्यांना श्रद्धांजली होय!
अरविंद मार्डीकर 
९८२२२११६५१