अब्दुल्लांचा कितवा सल्ला?

0
33

रविवारची पत्रे
खासदार, माजी केंद्रीय मंत्री, जम्मू-काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र/वडील… वगैरे वगैरे भूमिका पार पाडलेले फारुख अब्दुल्ला अजूनही काश्मीरप्रश्‍नावर सल्ला देण्याची वाट चालत आहेत. पाकशी मैत्री करा म्हणजे जादू होईल, अशी त्यांची कल्पना! आधीच्या किती सरकारांना त्यांनी असे सल्ले दिले आणि काय मिळविले राज्याच्या प्रगतीसाठी? १९४७ साली पाकची निर्मिती मैत्रीपूर्ण वातावरणात आणि त्यांच्या पिताजींच्या समोरच झाली, हे विसरले वाटते? वर, पाकला ५५ कोटींचा नजराणा दिला!
तीन पिढ्यांनी सर्व सत्ता भोगून, केंद्राच्या मदतीने सर्व ऐषबाजी सांभाळून, नेमके काय काम केले, हे ते कधी सांगणार आहेत? एक वाक्य मात्र ते खरे बोललेत… आपल्याच देशात आपले शत्रू बसले आहेत! पण, स्वतः सत्तेत असताना कळले नाही का त्यांना हे? सीमेवर सतत गोळीबार, दहशत, हल्ले करणार्‍या पाकिस्तानला सल्ला देण्याचा त्यांचा विचार दिसत नाही किंवा ते टाळत असतील. यांचे आणि पाकिस्तानशी मैत्री करा असा सल्ला देणार्‍या सर्वांचे निवासस्थान ताबडतोब ताबारेषेजवळ हलवावे, म्हणजे त्यांना वस्तुस्थितीची रोज नीट कल्पना येईल आणि मग काय सल्ले देतात ते पाहू या! यांना तेथे राजदूत म्हणून पाठविले तर?
करदात्यांच्या पैशातून आता अंतर्गत छुप्या शत्रूंना पोसणे ताबडतोब थांबविले पाहिजे. जम्मू-काश्मीरला दिल्या जाणार्‍या आर्थिक मदतीतून विकास दिसला पाहिजे, त्यासाठी शेख-फारुख-उमर यांनी नेमके काय काम केले, याचा तपशील जनतेसमोर मांडला पाहिजे. अधिक उशीर नको. १९४७ ते २०१६ असा ७० वर्षांचा हिशोब मांडलाच पाहिजे आता!
प्रमोद बापट
९८२३२७७४३९

पाकची दयनीय अवस्था!
चीनला जाऊन मोदींनी काय चावी मारली कळत नाही. २० दिवसांपूर्वी जो चीन भारताला धमकी देत होता, तोच आता ‘हिंदी चिनी भाई भाई’ची घोषणा देत आहे! याला म्हणतात मोदींचा मास्टर स्ट्रोक!! ‘ब्रिक्स’च्या घोषणापत्रात पाकमधील लष्करे तैयबा, जैशे महम्मद आणि हक्कानी नेटवर्क यांना आतंकवादी संघटना म्हणून जाहीर करण्यात आले. पाकचा मित्र असलेल्या चीनच्या भूमीवरून भारताने पाकिस्तानला शह दिला, याचा पाकला मोठा धक्का बसला. नाइलाजाने त्याला या संघटनांच्या कचेरीवर नांगर फिरवावा लागला आणि होय, आम्ही या दहशतवादी संघटनांचा निपा:त करण्यासाठी काहीही केलेले नाही, त्यामुळेच पाकिस्तान जगात एकाकी पडला, अशी कबुली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना द्यावी लागली. हा मोदींचा दुसरा मास्टर स्ट्रोक! वास्तविक, ‘ब्रिक्स’च्या बैठकीपूर्वी चीनने भारताला दहशतवादाचा प्रश्‍न काढू नका, असे बजावले होते. पण, मोदी कुणाच्या बापाचं ऐकतात का? त्यांनी ‘ब्रिक्स’ बैठकीत अशी काही चक्रे फिरवली की, बहुमतापुढे चीनला काही करता आले नाही आणि त्याला घोषणापत्रात पाकिस्तानमधील सहा संघटनांची नावे आतंकवादी म्हणून जाहीर करायला सहमती देणे भाग पडले! याचा सरळ परिणाम पाकिस्तानवर झाला. पाक, चीनला आपला मित्रदेश मानत होता. पण, मोदींनी त्यालाही फितवून आपल्या बाजूला करून घेतले! म्हणून पाक थयथयाट करत आहे. पाकची दयनीय अवस्था झाली आहे. तसे पहिले तर रशिया अजूनही पाकचा दोस्त आहे, पण तो भारताचाही दोस्त आहे. पुढे कधीतरी अगदी युद्धाचीच वेळ आली तर रशिया, आतंकवादाने पोखरलेल्या पाकिस्तानपेक्षा बलशाली भारताच्या बाजूने उभा राहील, यात शंका नाही. म्हणजे पाकला रशियाचाही भरोसा राहिला नाय. आता एकच मार्ग उरला आहे तो म्हणजे भारतद्वेष सोडून देऊन विकासाचा मार्ग अवलंबवणे. पण ते शक्य दिसत नाही. त्याचबरोबर ठोस पावले उचलून दहशतवादाला लगाम घालणे आणि आपल्या भूमीवरील दहशतवादी संघटना समूळ नष्ट करणे अत्यावश्यक आहे. आता तर दहशतवादी आणि दगडकेक करणार्‍यांना पैसे पुरविणार्‍यांना अटक करून त्यांची काळी कृत्ये एनआयएने समोर आणली आहेत. थोडक्यात काय, तर पाकिस्तानचा सर्वनाश अटळ आहे!
अरविंद दि. तापकिरे
९८१९७९४४९९

शिक्षण विभागातील दुर्दैव
भारत सरकारच्या मानव विकास मंत्रालयाने २००९ ला शिक्षणाचा अधिकार कायदा देशात लागू केला आहे. या कायद्यानुसार ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याबाबत चांगली तरतूद केली आहे. या बालकांना शिकवण्यासाठी शिक्षण अध्यापन पदविका डी.टी.एड. असणे गरजेचे आहे. तसेच विषयासंबंधी व अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी बालमानशास्त्रासारख्या विषयाचा अभ्यास असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यातील एक दुर्दैव म्हणजे राज्यात सात हजार तीनशे चोवीस शिक्षकांकडे शिक्षण व्यावसायिक पात्रता नाही. म्हणजेच सात हजारांच्या वर अप्रशिक्षित शिक्षक आहेत. अशी परिस्थिती २०१२ पासून राज्यात आहे. २००९ ला आरटीई (राईट टू एज्युकेशन) राज्यातही लागू झाले आहे. तेव्हा राज्यातील अप्रशिक्षित शिक्षकांची भरती करून शासन एकप्रकारे आरटीईची पायमल्ली करीत आहे असे वाटते.
महाराष्ट्र शासनाने आता अप्रशिक्षित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी दिला आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यातील ६८५ शिक्षकांकडेही शिक्षण व्यावसायिक पात्रता नसल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकरणी विद्या प्राधिकरणला आता जाग आली असून, ३१ मार्च २०१९ पर्यंत अप्रशिक्षित शिक्षकांनी डी.टी.एड. पदविका न घेतल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात डी.एड. धारकांची लाखोंच्या संख्येने बेकार फौज तयार आहे. नवीन भरती कधी होईल यांची ते आतुरतेने वाट पाहात आहेत. राज्यातील जास्तीत जास्त डी.टी.एड. धारकांना रोजगार द्यायचाच असेल आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचवायची असेल तर आणि त्यात आमूलाग्र बदल करावासा वाटत असेल तर १०० टक्के अंगणवाड्यांमध्ये डी.टी.एड. पात्रता धारकांची नियुक्ती करणे गरजेचे वाटते. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना जे बालशिक्षण द्यायला पाहिजे ते दिले जात नाही. अंगणवाडीताई आणि त्यांची मदतनीस लहान मुलांची (वय वर्षे ३ ते ६) केवळ दोन तास राखणी करताना दिसतात. त्यांच्यापुढे त्या बालकांच्या भविष्यातील शिक्षणाची आखणी दिसत नाही. ही अंगणवाडीची अवस्था आजची नाही यालाही अनेक दशकं झाली आहेत. परंतु त्यात कोणत्याच सरकारने सुधारणा केली नाही. खरं तर पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी या बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे, परंतु तसे झाले नाही. हे अंगणवाडीतील बालकांचे फार मोठे दुर्दैवच आहे. म्हणून शिक्षण विभागात कार्य करणारे केवळ राखणारे नव्हे, तर विद्यार्थ्यांचे भविष्य आखणारे हवेत.
प्रल्हाद सिडाम
९४२१८४६७३४

स्त्रियांनो, तुमची डिग्निटी तुमच्या हातात!
डेरा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहिम सिंग ऊर्फ बाबा रामरहिम या भोंदुबाबाच्या शिष्या असलेल्या दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला प्रत्येकी १० वर्षे अशी एकूण २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. स्वत:च्याच निरागस श्रद्धाळू स्त्री शिष्यांना भ्रष्टविण्याचे घृणित कृत्य हे अत्यंत ओंगळ, पाशवी स्वरूपाचे असून, त्यासाठी या श्‍वापदाला कठोरातील कठोर शिक्षाही कमीच ठरेल, असे रोहतक (हरयाणा) कोर्टाने म्हटले आहे.
स्वयंघोषित बुवा बाबा रामपाल याच्याविरुद्ध चंदीगड कोर्टात खटला सुरू आहे. देशद्रोह आणि सदोष मनुष्यवध या गुन्ह्यांत तो दोषी आढळला आहे. तोसुद्धा तुरुंगात आहे. असे अनेक ढोंगी बगळे सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. पण, अजूनही बरेच जण मोकळे आहेत आणि त्यांची कृत्ये राजरोसपणे सुरूच आहेत.
रामरहिम, आसाराम आणि बाबा रामपाल यांच्यासारखे निर्ढावलेले नरपशु भोळ्याभाबड्या आणि संसारिक समस्यांचे समाधान इतरत्र शोधू पाहणार्‍या निरागस अंधश्रद्ध महिलांना त्यांच्या विवशतेचा गैरफायदा घेऊन, स्वत:च्या जाळ्यात ओढून, त्यांना मोठी स्वप्नं दाखवून, शील भ्रष्ट करण्याचा अभद्र उद्योग अखंड आणि निर्धास्तपणे करत असतात. अशा हैवानांपासून सत्शील, साध्याभोळ्या महिलांना सावध करण्याकरिता गेल्या पिढीतील प्रथितयश साहित्यिक, नावाजलेले नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘बुवा तेथे बाया’ हे विनोदगर्भ, प्रहसनात्मक, परिणामकारक नाटक लिहिले. त्याचे ठिकठिकाणी अनेक प्रयोग झाले. त्यातील प्रमुख पात्र आणि खलनायक लखोबा लोखंडे याने वेळोवेळी आपले नाव बदलून गावोगावच्या स्त्रियांना भुरळ पाडून अनेकींशी संसार थाटले. अशा बुवांपासून दूर राहण्याचा सावधानीचा इशारा आपल्या संतमंडळींनीही दिला आहे. वारकरी पंथाचे संतश्रेष्ठ तुकोबाराय अपत्यप्राप्तीसाठी नवस सायास करणार्‍या पायलीच्या पन्नास बाबांचे उंबरठे झिजविणार्‍या बायकांना उद्देशून म्हणतात, ‘‘नवसे कन्या-पुत्र होती, तरी का करणे लागे पती?’’ इतके होऊनही आमच्या भाबड्या नारीजनांना बुवांकडे नेणार्‍या रस्त्यातील खड्डे दिसत नाहीत. श्रद्धाळू निरागस बायका हेच या बोके संन्यासींचे भांडवल. एकदा का त्या शहाण्या झाल्या की, या समाजकंटकांचा धंदाच बुडेल. तेव्हा सुखी संसाराची स्वप्नं पाहणार्‍या माझ्या माताभगिनींनो! तुमच्या समोर या ढोंगी बगळ्यांमुळे अनेकींचे संसार उद्ध्वस्त झालेले असताना तुम्ही स्वत:ला का या खाईत लोटता? इत:पर एकही भगिनी या दु:ख पर्यवसानी नाटकातील पात्र बनू नये म्हणून प्रतिष्ठित सुशिक्षित पोक्त स्त्रियांनी अथक प्रयत्न केले पाहिजेत. एक मंच (प्लॅटफॉर्म) उभा करून देशभरातील बुवांचे आश्रम पोलिसांच्या मदतीने शोधून उद्ध्वस्त केले पाहिजेत. तरच समाजाच्या नैतिक आरोग्याला लागलेली ही कीड नष्ट होईल.
रा. ना. कुळकर्णी
०७१२-२२९०७२७

‘मर्मबंधातली ठेव’
बरेच दिवसानंतर एक अतिशय सुंदर कार्यक्रम पहायला आणि ऐकायला मिळाला. कारण सध्या दूरदर्शनवर समोर बसून पाहण्यासारखा एकही कार्यक्रम नसतो. त्यामुळे रखरखीत वाळवंटात हिरवळ दिसावी असे वाटले. या कार्यक्रमाचा हा श्रीगणेशा असावा आणि या नाट्यगीतांचे सादरीकरण ‘भैरवी’मध्ये व्हावे अशी इच्छा आहे. कारण हा प्रवास खूपच लांबचा आहे. म्हणजे मंदारमाला संगीत नाटकांपर्यंत आहेच आहे. म्हणून या कार्यक्रमाची इथेच सांगता न करता पुढे असाच प्रवास चालू ठेवावा असे वाटते. त्या दिवशी त्या कार्यक्रमांत एकापेक्षा एक अशी सरस गाणी, पदे ऐकायला मिळाली आणि बाजी मारली ती मुग्धा वैशंपायन या महान कलाकाराने. हे नाव वाचल्याबरोबर दोन वेण्या घातलेली, फ्रॉक घातलेली आठ-दहा वर्षांची मुग्धा आठवली. ‘सारेगम’ लिटिल चॅम्पस्‌ची आठवण आली, त्या वेळी पल्लवी जोशीदेखील कार्यक्रमांत होती; पण मुग्धाची प्रगती पाहून खूप आश्‍चर्य वाटले. नाट्यपदाच्या सर्व हरकती; सर्व फिरकीच्या ताना, नाट्यपदाच्या चौकटीत भरलेली सर्व कुशल कारागिरी तिने अगदी अत्यंत सहज रीत्या सादर केली. त्याबद्दल तिचे मनापासून अभिनंदन. जसे एखादे स्वच्छंद फुलपाखरू बगिच्यात भिरभिरत असते, तशा तिच्या ताना आणि वेगवेगळ्या हरकती होत्या. म्हणून वाटते की, हा कार्यक्रम मर्मबंधातली भाग एक, दोन, तीन असे सादर करावे, अशी सूचना करावीशी वाटते. कारण कांदे-पोहे आणि कोंबडीने संगीताचा, अभिजात संगीताचा नायनाट केला आहे. हे थांबले पाहिजे आणि उत्तमोत्तम संगीत कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांना आनंद द्यावा.
जयश्री केळकर
नागपूर

अंधश्रद्धा नेई रसातळा
नक्की साल माहीत नाही, पण सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी असेल प्र. के. अत्रे यांचे ‘बुवा तेथे बाया’ हे नाटक खूपच गाजले होते. नाटकाच्या नावावरून लक्षात येते की, लेखकाने बायकांनाच दोषी ठरवले आहे. त्या काळाशी सुसंगत असलेले ते नाटक, तो विषय आजही तितकाच सुसंगत आहे. आणि तेव्हापेक्षाही आता जास्त प्रमाणात बुवाबाजीला आणि अंधश्रद्धेला नुसता ऊत आला आहे. एकीकडे स्व. दाभोळकरांसारखे लोक अंध़श्रद्धेविरुद्ध जनजागृती करीत होते. त्यांना त्या बदल्यात त्यांना काय मिळत आहे तर मरण! आणि दुसरीकडे जनता दुप्पट जोमाने बुवाबाजीला शरण जात आहे. म्हणूनच समाजात रामरहिम निर्माण होत आहेत आणि सामान्यांचे डोळे पांढरे होतील इतकी अफाट संपत्ती जमवत आहेत. यासाठी त्यांच्या गुन्ह्यांसाठी त्यांना शिक्षा होईलच पण दोषी काय ते केवळ एकटेच आहेत? उलट त्यांच्यापेक्षा जास्त दोषी आपण आपला समाज, आपली अंधश्रद्धाळू, अविवेकी जनता आहे. अरे, सेवेच्या नावाखाली पिताजीकी माफी काय, महिलांनी घातलेली आंघोळ काय आणि त्या बाबाची शारीरिक भूक क्षमवण काय सर्व काही अचंबित करणारं, मन सुन्न करणारं आहे. लोक आपल्या बायका-मुली त्यांच्याकडे पाठवतातच कशा आणि या भोंदू बाबांच्या कृपेमुळे रोग-आजार बरे होतातच कसे? आणि मुले तर काय या बाबांच्या कृपेमुळेच (?) जन्माला येतात. खरोखरच काय झालंय सर्वांना? कसल्या पट्ट्या बांधून घेतल्या आहेत यांनी आपल्या डोळ्यांवर? कधी उघडणार यांचे डोळे? आणि जीवाच्या भीतीने अन्याय तरी किती सहन करणार? ‘पुरुष’ नाटकात नायिका अंबूने खलनायकाला दिलेली शिक्षाच या तथाकथित बाबा लोकांना देणे योग्य आहे. अथवा शिवाजी महाराजांनी पाटलाला दिलेली उजवा हात आणि डावा पाय तोडण्याची शिक्षा देऊन तुरुंगात खितपत ठेवा यांना. न्यायपालिकेने न्यायदान लवकरात लवकर करून या रामरहिम, आसाराम व रामपालसारख्यांचा नि:पात करायला हवा.
डॉ. अपेक्षा तारे
९४२३१५१४७६

पाठ्यक्रमात राष्ट्रीय दृष्टिकोन हवा
आजच्या सर्वच अभ्यासक्रमांच्या पाठ्यपुस्तकात उपलब्ध लेखनामुळे विद्यार्थी, पालक, समाज यांच्यामध्ये सकारात्मकता कमी प्रमाणात पाहायला निर्माण मिळते. त्याकरिता पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके राष्ट्रीय ज्ञान परंपरेशी संबंधित असायला हवीत. आज आमचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला जातो. तो थांबविला पाहिजे. स्वातंत्र्य आंदोलनाबाबतही अतिशय मर्यादित आणि तेच ते सांगितले जाते. व्यक्ती, समाज, सृष्टी, निसर्ग व पर्यावरण, भारतीय संस्कृती, आर्थिक, सामाजिक व्यवहार, खरा इतिहास, धर्मपालन करणारे सर्वस्पर्शी अभ्यासक्रम, पाठ्यक्रम एकत्वाची भावना निर्माण करणारे असायला हवेत. भारतीय दृष्टिकोनानुसार पाठ्यक्रम निर्माण केले गेले, तर त्याचा विद्यार्थी व शिक्षकांच्या अंतर्मनावर परिणाम योग्य दिशेने होऊन विद्यार्थ्यांचे दिव्यमन तयार होऊ शकते. त्यामुळे संशोधनाला अधिक चालना मिळेल. आज आमचा देश संशोधनाच्या बाबतीत जगात बराच मागे आहे. म्हणून प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर स्तरापर्यंत सर्व विषयांच्या पाठ्यक्रमात भारतीय दृष्टिकोन असणारे पाठ्यक्रम तयार करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तकांचे समीक्षण करून पूरक पाठ्यक्रम तयार करण्यासाठी व्यापक चळवळ भारतीय शिक्षण मंडळाच्या शैक्षिक प्रकोष्ठाद्वारे होणे गरजेचे आहे. ती काळाची गरज आहे. प्रत्येक विषयात भारतीय ज्ञान-परंपरा यावर अनुसंधान करून प्रत्येक विषयात भारतीय सामुग्रीचा सुव्यवस्थित समावेश करून पाठ्यक्रम निर्माण केले पाहिजे. ते राष्ट्रीय दृष्टिकोनातून फायदेशीर राहील असे वाटते.
प्रा. मधुकर चुटे
९४२०५६६४०४