क्षणभरही बेसावध राहता कामा नये

0
66

कटाक्ष
हिंदी-चिनी भाई भाई असा नारा देत चीनने १९६२ साली भारतावर आक्रमण करून पाठीत खंजीर खुुपसला होता. त्यामुळे भारताने चीनवर कधीही विश्‍वास ठेवू नये. चीनशी कुठलाही व्यवहार करताना, समझोता करताना, करार करताना सतर्क राहणे आवश्यक आहे. डोकलामच्या मुद्यावरून चीनसोबत जो तणाव निर्माण झाला होता, तो सामंजस्याने कमी करण्यात आणि वाद मिटविण्यात भारताला यश मिळाले असले तरी, चीन कधी कोणती कुरापत करेल याचा काही नेम नाही. भारतीय लष्कराचे प्रमुुख जनरल बिपीन रावत यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले आणि त्यामुळे चीनचा पुन्हा तीळपापड झाला. भारताला एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानशी लढाई करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रावत म्हणाले होते. चीनच्या दौर्‍यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत राहावेत या दृष्टीने जी चर्चा केली, तिला रावत यांनी छेद देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चीनने केला होता. चीन काहीही म्हणत असला तरी भारताने कायम सतर्क राहिले पाहिजे, हेच खरे!
डोकलामचा वाद सोडविण्यात आला असला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा यशस्वी झाला असला तरी, डोकलामच्या वादामुळे जे नुकसान झाले आहे, ते कधीही भरून निघणारे नाही. सीमावाद, व्यापार, आर्थिक कॉरिडॉर, सामुद्रिक हद्द आणि इतर बाबतीत चीनचे जे धोरण आहे, त्याचा दोन्ही देशांच्या संबंधांवर निश्‍चितच परिणाम झाला आहे. डोकलामचा वाद आज सुटला असला आणि सीमेवर शांतता प्रस्थापित झाली असली तरी, ही शांतता अस्थायी मानली पाहिजे. चीनचा विस्तारवादी आणि साम्राज्यवादी स्वभाव लक्षात घेता, त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेशबाबत आणि लद्दाखबाबत चीनने जी भूमिका यापूर्वी घेतली आहे, ती लक्षात घेता चीनचे वाकडे शेपूट सरळ झाले आहे असे मानण्याचे कारण नाही. सध्या जरी दिलासादायक स्थिती असली तरी, चीन केव्हा काय भूमिका घेईल आणि सीमेवर कधी तणाव निर्माण होईल, याची काहीही शाश्‍वती राहिलेली नाही. चीनमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेत भारताने दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करू नये यासाठी चीनने भरपूर प्रयत्न केलेत. पण, स्वत: चीननेच दहशतवादाच्या मुद्यावर भाष्य केले अन् भारताचा पहिला विजय झाला असे मानले गेले. त्यानंतर ब्रिक्स परिषदेत दहशतवादाविरुद्ध ठराव पारित करण्यात आला. हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय ठरला. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारच्या दौर्‍यावर असतानाच चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शविला. आधी पाकमधील दहशतवादी संघटनांची नावे घ्यायची आणि नंतर घूमजाव करीत पाकला अभयदान द्यायचे, हे फक्त चीनच करू शकतो. त्यामुळे भारताने सातत्याने सतर्क राहणे गरजेचे आहे.
डोकलामच्या संदर्भात काही वाद असेलही, पण तो वाद भूतान आणि आमच्यात आहे, त्याचा भारताशी काही संबंध नाही, अशी भूमिका चीनने एकदा नव्हे, अनेकदा घेतली आहे. मात्र, भूतानसोबत झालेल्या कराराचे पालन करीत भारताने कणखर भूमिका घेतली आणि शेवटी चीनला भारतासोबत समझोता करावा लागला. चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि पीपल्स लिबरेशन आर्मी यांनी भारताला उचकावण्याचे एक नव्हे, शंभर प्रयत्न केलेत. पण, त्यांचे सगळे प्रयत्न असफल ठरलेत. त्यामुळे ही असफलता त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांना जे अपयश आले, ते पचविण्याची क्षमता त्यांच्यात नाही. आपले सगळे प्रयत्न भारताने हाणून पाडले आणि शेवटी आपल्याला समझोता करण्यास भाग पाडले, ही बाब त्यांच्या पचनी पडणे शक्य नाही. त्यामुळे ते पुन्हा कधी पलटवार करतील, याचा काही नेम नाही. म्हणूनही भारताने अरुणाचल प्रदेश, लद्दाख आणि डोकलाम अशा तीनही ठिकाणी सतर्कता बाळगणे आवश्यक ठरते.
चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची राजवट आहे. साम्यवादी विचारसरणीचे सरकार अन्य विचार मान्य करायला तयार नसते हे चीनने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. साम्यवादी राजवट एका आघाडीवर जेव्हा माघार घेते, तेव्हा दुसर्‍या आघाडीवर नव्यानेे आक्रमक भूमिका घेते, हे वास्तव आहे. चीनच्या बाबतीत तर हे शंभर टक्के सत्य आहे. चीनला आशिया खंडात स्वत:चे वर्चस्व निर्माण करायचे आहे. त्यामुळे भारताची वाढलेली ताकद चीनला सहन होणे शक्य नाही. अशा परिस्थितीत भारताला सातत्याने सतावत राहणे, विविध आघाड्यांवर कुरापती काढून भारताला अस्थिर ठेवणे, भारतालगतच्या सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण करणे, भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या धमकावणे व दहशतीत ठेवणे हा चीनचा फार पूर्वीपासूनचा उद्योग आहे. हा उद्योग बंद पाडण्यासाठीही भारताने चीनच्या बाबतीत सतर्क राहणे ही आताची गरज आहे. चीनचा इरादा काही नेक नाही. चीनच्या मनात पाप आहे. चीनने तिबेट गिळंकृत केले आहे. आता भूतानवर चीनची नजर आहे. भारताच्या भूभागावरही चीनची वाईट नजर आहे. डोकलामच्या बाबतीत जर भारताने माघार घेतली असती आणि चीनने रस्ता बांधण्यास हरकत घेतली नसती तर कदाचित चीनची मुजोरी आणखी वाढली असती. डोकलामच्या बाबतीत भारताने जी कणखर भूमिका घेतली आणि भारतीय जवान डोकलाम येथे बाणेदारपणे उभे राहिले, त्यामुळेच इच्छा नसतानाही चीनला भारतासोबत समझोता करावा लागला. पण, चीनशी टक्कर दिली तर चीनलाही माघार घ्यावी लागते, हे भारतीय सैन्याने आणि भारत सरकारनेही दाखवून दिले आहे. भारताच्या आधी आपला मित्र देश जपाननेही चीनच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतली आहे. डोकलामच्या बाबतीत भारताच्या मुत्सद्देगिरीचा जो विजय झाला आहे, तो भारतासाठी मैलाचा दगड ठरला आहे. भारताने निर्णायक भूमिका घेतली नसती तर भारताला अनेक आघाड्यांवर अपयशाचा सामना करावा लागला असता. पण, भारताने चीनच्या मुजोरीला वेसण घालत पहिल्यांदाच एवढे आक्रमक उत्तर दिल्याने दक्षिण चीन सागरात आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना खीळ बसली, हे निश्‍चित. असे असले तरी चीनचा एकूण स्वभाव लक्षात घेता भारताने क्षणभरही बेसावध राहता कामा नये.
डोकलामच्या मुद्यावर भारताने चीनपुढे जे आव्हान उभे केले होते, तसे आव्हान यापूर्वी प्रतिस्पर्धी देशाकडून कधी उभे करण्यात आले नव्हते. भारताने पहिल्यांदाच एवढी आक्रमक भूमिका घेतली याचे कारण आमचे मजबूत सैन्यबळ हे आहेच, पण प्रमुख कारण आहे भारत सरकारची राजकीय इच्छाशक्ती. केंद्रात सत्तेत असलेले सरकार जोपर्यंत सैन्यदलाला मानसिक बळ देत नाही, आपल्या सैन्यशक्तीवर विश्‍वास दाखवत नाही, प्रतिस्पर्धी देशाबाबत ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत समोरच्याला माघार घ्यायला लावता येणे शक्य होत नाही. पण, आता केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने धाडस दाखविले, चीनच्या धमकीला भीक घातली नाही आणि सैन्याला रसद पुरविली, त्यामुळेच चीनला माघार घ्यावी लागली. ही माघार चीनच्या जिव्हारी लागली आहे. भारताकडून एवढा टोकाचा अन् चिवट विरोध होईल, याची कल्पना चीनने कधी केलीच नव्हती. त्यामुळे डोकलामच्या बाबतीत समझोता करावा लागणे ही बाब चीन फार काळ सहन करेल असे वाटत नाही. ही बाब लक्षात घेऊन भारताने चीनला लागून असलेल्या सीमांवर सतर्क राहण्यातच आपले हित आहे. आज जरी भारत आणि चीन यांनी तोडगा काढून सीमेवर शांतता प्रस्थापित केली असली तरी, डोकलाम वादाने चीनची विस्तारवादी भूमिका पुन्हा एकदा जगापुुढे आली आहे. भारताला चीनसोबत कधीही युद्ध नको होते. पण, चीनने जी आडमुठी भूमिका घेतली होती, त्यापुढे नमायचेही नव्हते. भारताने आपल्या भूमिकेवर ठाम राहताना नेहमीच सामंजस्यपूर्ण वर्तणूक ठेवली. चीनचा आडमुठेपणा युद्ध न करताही संपुष्टात आणण्याचे जे कौशल्य भारताने दाखविले, त्याचा परिणाम अन्य शेजारी देशांवरही झाला आहे. शांततामय मार्गानेही आडमुठेपणा संपुष्टात आणता येतो, हे भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. पण, भारताच्या या भूमिकेमुळे चीन आतून चवताळलेलाच आहे. चीनचे हे आतले चवताळलेपण कधी बाहेर येईल, हे सांगता यायचे नाही. त्यामुळे भारताने क्षणोक्षणी प्रत्येक आघाडीवर सतर्क राहणेच हितावह ठरेल!
गजानन निमदेव