सोशली अनफेअर…

0
78

अग्रलेख
आता शीर्षक जरा आपल्या बापाच्या भाषेत आहे. काय आहे की, अशा महत्त्वाच्या विषयावर जरा जास्तच गंभीर होऊन बोलायचे असेल तर ‘विंग्रजी’चा आधार घेण्याची आपली मराठी माणसाची पद्धत आहे, रीत आहे, परंपरा आहे. तसे संस्कार आहेत… मराठी माणूस साधारण उत्तेजित झाला की हिंदीत बोलतो अन् त्याहीपेक्षा जास्तच असाधारण उत्तेजना येणे, ज्याला की म्हणता येईल एक्साईट होणे, तर तो तसा झाला की इंग्रजीत बोलतो. त्यामुळे आता आपण हे साहेबी भाषेतले हेडिंग यानेकी शीर्षक वापरले आहे. त्याला कारणही तसेच आहे. घटनाच जरा पाश्‍चात्तीकरणातून आलेली आहे. या घटनेचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास पुन्हा एकदा आपल्याला आपल्या राष्ट्रभाषेचा आधार घ्यावा लागेल. याला, ‘आ बैल मुझे मार’ असे म्हणावे लागेल. समाजमाध्यमांमुळे माणसं फार म्हणजे फारच दूरवर पोहोचू लागली आहेत. म्हणजे घराशेजारी कोण राहतं अन् त्याची समस्या काय, हे कळत नाही. त्या भानगडीतही आपण पडत नाही, पण उत्तर अमेरिकेतल्या पश्‍चिम परगण्यातील ट्वीनिटी लेक परिसरात राहणार्‍या सिसिलिया नामक तरुणीचे दु:ख आमच्यापर्यंत पोहोचत असते आणि आपण त्यावर अस्वस्थ वगैरे होतो. कशा कशावर आम्ही प्रतिक्रिया देत असतो. व्हॉट्‌स ऍप आणि फेसबुकमुळे तर लोक अनेक विषयांत प्रकांड वगैरे की काय म्हणतात तसे विद्वान झालेले आहेत. त्यांना अनेक विषयांतले सखोल असे संदर्भ त्यांच्या अर्थ स्पष्टीकरणासह आयते मिळू लागले आहेत. सगळे कसे आपोआप होत असल्याने नॉलेज कसे मुठ्ठी में आलेले आहे. आता हे ज्ञान आहे की माहिती, हे आपले आपण ठरवायचे. या सोयीमुळे मोह अनावर होतो. आधी तो हातातल्या मोबाईलमधून खांद्यावर बसतो अन् मग तिथून थेट डोक्यात शिरतो. आता उत्तर मुंबईतील एका तरुणालाही हा मोह काही आवरता आला नाही. मोह अनावर झाला की ‘अ’ची मग बाराखडीच सुरू होते. मोह आवरला नाही, मग तो अनावर झाला आणि मग अगतिक झाला, त्याचे परिणाम समोर दिसू लागताच त्याच्या तोंडाचा ‘आ’ वासला. सांगता येत नाही अन् सहनही होत नाही, अशी अवस्था झाली अन् मग त्याला मूक आकांत मांडावा लागला… आता वाचक म्हणतील की नमनालाच घडाभर तेल जाळता आहात. नेमके झाले काय ते सांगा… तर झाले असे की या तरुणाचे संबंध एका विदेशी तरुणीशी आलेत. म्हणजे ‘संबंध’ आले म्हटल्यावर बरोबर लगेच भुवया उंच करण्याची काहीच गरज नाही. जे काय संबंध आले त्याला शुद्ध भाषेत संपर्क असे म्हणतात. त्याचा हा संपर्क ऑनलाईन आला. ऑनलाईन संबंध किंवा संपर्काची लाईन नेहमीच चुकत असते, भरकटत असते. त्याची समाजमाध्यमांवर एका विदेशी तरुणीशी ओळख झाली. प्रत्यक्ष जीवनात म्हणजे वास्तवात माणसं अशी अडेसिव्ह नसतात, म्हणजे पटकन् एकजीव होत नाहीत. एकजीव होणे तर फारच दूरची बाब, त्यांचं पटतही नाही. ‘पटत नाही अजिबात’ या सदरात सख्ख्या भावांचाच सर्वाधिक समावेश होत असतो. असे असताना सोशल मीडियावर एका क्षणात जन्मजन्मांतरीचे नाते निर्माण होत असते. सकाळी ओळख- अर्थात फेसबुकवर. तासाभरात घट्ट मैत्री. दोन-चार पोस्ट अन् मेसेज झाले की साक्षात्कार होत असतो की आपले नातेही हे मैत्रीच्याही पलीकडचे आहे. दुपारी तर असेही लक्षात आलेले असते की, आपण आता एकमेकांशिवाय जगणेही कठीण आहे. सायंकाळच्या आधी ते लग्न करायचे किंवा तसेच एकत्र राहायचे असे ठरवितात. सायंकाळी ते एकत्र आलेले असतात अन् मग दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांचा ब्रेकअपही झालेला असतो. लहानपणी एक इंग्रजी कविता प्राथमिक शाळेत शिकलो आपण सारेच. सालोमन ब्रंडी, बॉर्न ऑन मंडे… टुक इल ऑन सॅटरडे अन् डाईड ऑन संडे… दॅट वॉज दी एंड ऑफ सालोमन ब्रंडी… अर्थात आठवड्याचे वार इंग्रजीत शिकविण्यासाठी ही कविता असली तरीही सारेच कसे क्षणभंगूर असते, हेही त्यातून कळते. आता हा जो पंचवीस वर्षांचा तरुण आहे, त्याची त्या तरुणीशी (नेमकी तरुणीच की त्या नावाचे अकाऊंट?) ओळख झाली. घट्ट मैत्री झाली तासाभरातच. त्याने मग व्हिडीओ कॉलवर त्याच्या आयुष्यातल्या अत्यंत खासगी बाबीही तिच्यासोबत शेअर केल्या. आता त्या दिवशी त्याची  साप्ताहिक सुट्टी असावी. म्हणजे ऑफ असावा. त्यात हे मूड ऑन करणारे प्रकरण त्याच्या हाती लागले. आता ‘हाती’ म्हणजे अक्षरश: हातीच कारण मोबाईल हातात असतो. त्यामुळे सगळेच कसे हातात आलेले असते. डोक्यात वगैरे काहीही नसते. डोके चालवायचेच नसते. हातच चालवायचा असतो. दोनच तासात ते एकदम, ‘एक जान है हम’, ‘सनम तेरी कसम’, ‘प्यार तो होनाही था’ अशा वळणाने, ‘जब वुई मेट’पर्यंत पोहोचले. अर्थात हे जब वुई मेट, असे नव्हते, दोघांचाही सवाल हा होता की, ‘कब वुई मेट?’ इंटरनेटच्या मायाजालाने त्यांची मने तर एक झालीच होती. आपण एकमेकांसाठीच जन्मलोत आणि मोबाईल, इंटरनेट, समाजमाध्यमांचा शोध केवळ हे दोन जीव एकत्र यावेत, यासाठीच लागला, हेही त्यांना आता पुरते कळले होते. ते सारखे एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलत होते. म्हणजे तो कुठेही गेला अन् काहीही करत असला तरीही त्यांचे कॉलिंग सुरू होते. मग तो अंघोळीला गेला. तिला काही राहवत नसल्याने तिने तिथेही त्याला कॉल केला. त्याने अंघोळ करतानाही तो दृक-श्राव्य (आणि काव्यही) कॉल घेतला. ते बोलत राहिले. तिने त्याची अंघोळ चित्रित होत होती, ती सेव्ह करून घेतली. तो आपला एका पाश्‍चात्त्य तरुणीशी विवाह करण्याच्या स्वप्नात तरळत होता. काय आहे की इंग्रजी सिनेमे पाहताना रोम रोम पुलकित होत असतो. ते काय बोलतात ते कळत नाहीच, खूपदा ते एबीसीडी म्हणतात, असेच वाटत असते. ते काय बोलतात त्याहीपेक्षा काय करतात, याकडेच आमचे लक्ष असते. विंग्रजी म्हणजे दुसरे काहीच नाते नसते. बाई अन् माणूस भेटले की काहीतरी शृंगारिक असेच होणार, असेच आम्हाला वाटत असते. कारण तसाच अनुभवही असतो. ते इंग्रजीत काही वेळ ‘च्यॉंव, च्यॉंव’ करतात. असे वाटते की ते भयानक भांडत आहेत अन् एकाएकी ते जवळ येतात अन् लिपलॉक होते. मग पुढचे आम्ही डोळे फाडून पाहतो. आता न्यायालयानेच सांगितले आहे की, पोर्न पाहणे हा खासगी अधिकार आहे. तुम्ही लोकांच्या बेडरूममध्ये शिरू शकत नाही. वेळ पडली तर धर्मनिरपेक्षतेच्या नावाने तुम्ही लोकांच्या देवघरात, मंदिरात शिरू शकता, मात्र बेडरूममध्ये त्यांची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते… त्यामुळे इंग्रजी तरुणी म्हणजे सो हॉट असे या तरुणाला वाटलेच असावे. मात्र, नंतर वेगळ्याच कारणाने त्याची कानशीलं गरम झाली. तिने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. खरेतर इतके लव्हेबल बोलण्याचे ते बिल असावे. तो नाही म्हणाला. तिने मग त्याला धमकी दिली की, तुझा अंघोळ करतानाचा व्हिडीओ मी व्हायरल करीन. सध्या वेगळ्या अर्थाने हा व्हायरल फिवर सगळीकडेच चढला आहे. ती मागत असलेली रक्कम तो देऊ शकत नसल्याने अखेर तिने त्याचा सचैल स्नान करत असतानाचा अनावृत्त व्हिडीओ व्हायरल केलाच… आता प्रकरण पोलिसात गेले आहे. आता पुरुष झाला म्हणून काय झाले? त्यालाही काही लाज-लज्जा आहे की नाही? बरे तो केवळ अंघोळ करतानाचा व्हिडीओ नाहीना राजेहो! त्या वेळी तो ‘ती’च्याशी बोलत होता ना. ते बोलणे अन् ‘रिऍक्शन्स’ही आल्या असतील ना त्यात… बघा सोशल मिडीयामुळे तुमचे खासगी आयुष्यही कसे व्हायरल होते आणि पुरुषांचाही कसा विनयभंग होतो ते… यालाच म्हणायचे, सोशली अनफेअर…