महापौरांना अधिकाधिक अधिकार देण्याचा प्रयत्न करू

0
65

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्‍वासन
औरंगाबाद, ९ सप्टेंबर 
अनेकदा महापौरांना त्यांच्या अधिकारांची पूर्ण माहिती नसते. आपल्याला नेमके कोणते अधिकार आहेत आणि त्याचा वापर कसा करावा, याची माहिती असायला हवी. मात्र, आम्ही महाराष्ट्रातील महापौरांना अधिकाअधिक अधिकार देण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी केले. औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय महापौर परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शहर बदलायचे असेल तर फक्त लोकप्रिय निर्णय घेऊन चालणार नाही. त्यासाठी जनतेला सोबत घेऊन काम करायला हवे. या परिषदेत अनेकांनी महापौरांना जादा अधिकार मिळावेत, अशी आग्रही मागणी केली होती. या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. महापौरांच्या अधिकारावर चर्चा झाली पाहिजे. त्यासोबत देशाचा विकास करण्यासाठी काय करायला हवं, याचाही विचार करावा असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पालिकेतील ‘ड’ वर्ग आणि ‘क’ वर्ग याची निवडणूक थेट घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकासाच्या पथावर घेऊन जात असताना आपल्या समोर अनेक समस्या आहेत. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. मात्र, शहरे ज्या वेगाने वाढत आहेत, त्या गतीने विकास होत नाही. हे साध्य करायचे असेल तर, नियोजन असणे महत्त्वाचे आहे. निश्‍चित योजना तयार असेल आणि ती साध्य करण्याची इच्छाशक्ती असेल तर पैशाची कमी येणार नाही, असे आश्‍वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. (वृत्तसंस्था)