कार्यकर्त्यांनी केले गडकरींचे जंगी स्वागत

0
98

– वाढदिवशी होते तशी प्रचंड गर्दी झाली होती वाड्यावर!
तभा वृत्तसेवा
नागपूर, ९ सप्टेंबर
नितीन गडकरी म्हणजे सळसळत्या उत्साहाचे मूर्तीमंत उदाहरण. एक जिंदादिल अन दिलदार व्यक्तिमत्त्व. धाडसी निर्णय आणि जलदगतीने निर्णय घेणारा एक दमदार नेता अशी ओळख त्यांनी स्वकर्तृत्वाने निर्माण केली आहे. अशा या दूरदर्शी नेत्याकडे केंद्रीय जलसंपदा हे अतिरिक्त खाते आल्याने आणि या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नागपुरात आल्याने आनंदी झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी नितीन गडकरी यांचे जंगी स्वागत केले. २७ मे या त्यांच्या वाढदिवशी गडकरी वाड्यावर असते, तशी प्रचंड गर्दी काल, शनिवारी वाड्याने अनुभवली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री असल्याने पंतप्रधानांनी त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला. त्यानंतर ते लगेच कामाला लागले आणि मुंबई येथे सिंचन प्रकल्पाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक आटोपून आणि धाडसी निर्णय घेऊन ते प्रथमत: नागपुरात पोहोचले. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ आज भाजपा मध्य नागपूर शाखेतर्फे गडकरी यांचे बॅण्ड, ढोल-ताशे तसेच फटाके व गुलालाची उधळण करुन हजारो कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले.
नितीन गडकरी यांचा वाढदिवस ज्याप्रमाणे दरवर्षी साजरा होतो, त्याचप्रमाणे घरापुढे होर्डिंग्ज, फटाक्यांची आतषबाजी, बॅण्ड वादन, ढोल-ताशे, गुलाल, उत्साही कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी त्यानंतर गर्दीतून वाट काढणारे गडकरी आणि लगेच वाड्यातील सभागृहात त्यांचा उत्स्फूर्त सत्कार, आलेल्या कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारणे आणि त्यानंतर त्या सर्वांच्या चहापानाची सोय हा सर्व प्रकार आजही होता आणि या तयारीमुळे महालवासीयांना आज गडकरींचा वाढदिवस आहे की काय असा प्रश्‍न पडला होता.
या स्वागतानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मध्य नागपूर भाजपाचे अध्यक्ष बंडू राऊत, माजी महापौर प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, बाळू बांते, माजी महापौर अर्चना डेहनकर, रश्मी फडणवीस, उपमहापौर दीपराज पार्डीकर आदींनी गडकरींचा सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी यांनी, पंतप्रधानांनी माझ्यावर विश्‍वास टाकला आणि कार्यकर्त्यांनी प्रेम दिले, या दोन्ही बाबी विदर्भ तसेच महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण आहेत. सध्या राज्यात पाण्याचे संकट आहे. आणि विदर्भातील गोसीखुर्द प्रकल्प देखील रखडला आहे. त्यामुळे तातडीची गरज लक्षात घेता, सर्वप्रथम या विषयावरील आढावा बैठक घेतली आणि राज्यातील २६ प्रकल्पांसाठी २५ हजार कोटी रुपये खात्यामार्फत देण्याचे जाहीर केले. याशिवाय पुरामुळे अनेकदा नुकसान होते, हा प्रकार टाळण्यासाठी नदी जोड प्रकल्पासाठी ८० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. प्रकल्पाच्या पूर्णतेसोबतच नदी, नाल्यांचे खोलीकरण अशी कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यातून विद्यमान जलसंकट सोडविण्यास मदत होईल, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला.
केंद्रीय जलसंपदा खाते विदर्भाच्या वाट्याला येणे ही मोठी संधी आहे. या संधीचे सोने करण्याची तयारी सुरू केली असून डिसेंबर २०१८ पर्यंत गोसीखुर्द धरणाचे काम पूर्ण करण्यात येईल व त्यामुळे १० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल व विदर्भातील पिण्याच्या पाण्याची समस्या देखील सुटेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
सध्या तोतलाडोह धरणात पाणी नाही. त्यामुळे शहरातील सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते कोराडी व खापरखेडा प्रकल्पांना पुरविण्यावर देखील कार्यवाही सुरू आहे. येत्या काळात कन्हानवर बॅरेजेस बांधून ते पाणी जामघाटमार्गे तोतलाडोहपर्यंत आणण्यासाठी पाईपलाईन टाकण्याची सोय करण्यात येणार आहे. यासाठी येत्या काळात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात राज्यातील २६ प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. त्यातून ८० लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येईल तसेच, राज्यातील सिंचन क्षेत्र ४० टक्केपर्यंत वाढविणे शक्य असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
पाच प्रकल्पांना त्वरित प्रारंभ
जलसंधारणाच्या प्रक्रियेत येत्या काळात दमणगंगा आणि पारतापी असे एकूण ५० हजार कोटी रुपयांच्या पाच प्रमुख प्रकल्पांच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले.