अमित शाह लिहिणार शिवाजी महाराजांचा इतिहास

0
79

पुुणे, १० सप्टेंबर 
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास गुजराती भाषेमध्ये लिहिणार असल्याची माहिती भाजपाचे उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. अमित शाह लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकाशित ‘भारतीय जनता पार्टी : राजकारणात कशासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना विनय सहस्रबुद्धे यांनी शाह यांच्या आगामी पुस्तकाबद्दल माहिती दिली.
आजवर गुजरातमध्ये शिवाजी महाराज यांनी सूरत लुटली इतकीच त्यांची ओळख असल्याचे चित्र रंगवण्यात आले आहे. तसेच याबद्दल अनेक समज-गैरसमज देखील पसरले आहेत. महाराजांचा खरा इतिहास गुजरातमधील जनतेसमोर यावा यासाठी शाह हे मराठ्यांच्या इतिहासाचा गेली सहा महिने अभ्यास करीत आहेत. गुजरातेत शिवाजी महाराजांनी सूरत लुटल्याचे चित्र आहे, हे चित्र बदलण्यासाठी गुजराती भाषेत पुस्तक लिहिणार असल्याची माहिती सहस्रबुद्धे यांनी दिली.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी लिहिलेल्या ‘भाजपा : राजकारणात कशासाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते. (वृत्तसंस्था)