रेल्वेमधील लूट ४८ तासांत थांबवा : पीयूष गोयल

0
140

नवी दिल्ली, १० सप्टेंबर 
रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना किंमतीपेक्षा जास्त भावाने खाद्य-वस्तू विकणे व टीप किंवा इतर कोणत्याही स्वरूपात अतिरिक्त पैसे घेऊन लूट करण्याचे प्रकार ४८ तासांत थांबवावे, असा इशारा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिला आहे.
सुरेश प्रभू यांच्याकडून रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी येताच रेल्वमंत्री पियुष गोयल चांगलेच कामाला लागले आहेत. सूत्रे हाती येताच गोयल यांनी पहिला दणका रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांकडून घेतल्या जाणार्‍या टीप आणि अतिरिक्त पैसे घेणार्‍या कर्मचार्‍यांना दिला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान, टीप स्वरूपात किंवा इतर कोणत्याही स्वरूपात अतिरिक्त पैसे घेण्याचा प्रकार येत्या ४८ तासात बंद करा, असे फर्मान गोयल यांनी रेल्वे कर्मचार्‍यांना सोडले आहे. जे कर्मचारी या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा सक्त इशाराही गोयल यानी दिला आहे.
दरम्यान, रेल्वेमंत्री आणि रेल्वे मंत्रालयाकडून आलेल्या आदेशानंतर आयआरसीटीसी ही खडबडून जागे झाले आहे. त्यांनी आपल्या कॅटरिंग कॉन्ट्रॅक्टर्सना तशा सूचना दिल्या असून, आदेशांचे पालन करण्यास सांगितले आहे. जे कर्मचारी रेल्वे मंत्रालयाच्या या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. येत्या सोमवारपासून, रेल्वे कॅटरिंग इन्स्पेक्टर्स रेल्वेत प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जाऊ नयेत म्हणून बारीक लक्ष ठेऊन असतील. (वृत्तसंस्था)