साहित्य संमेलन हिवरा आश्रम येथे

0
69

– प्रथमच ग्रामपंचायत क्षेत्रात होणार संमेलन
– दिल्लीने ऐनवेळी मागे घेतला प्रस्ताव
– बुलढाणा जिल्ह्यातही पहिल्यांदाच संमेलन
नागपूर, १० सप्टेंबर 
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासंबंधी, रविवारी विदर्भ साहित्य संघात झालेल्या बैठकीत बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रम या संस्थेचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. संमेलनाचे स्थळ म्हणून प्रथमच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्थानाची निवड करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही पहिल्यांदाच संमेलन होते आहे.
दोन दिवसांपूर्वीपर्यंत दिल्ली साहित्य परिषदेचा प्रस्ताव मान्य होऊन यंदा साहित्यिकांना दिल्लीवारी घडेल, अशी चर्चा होती. मात्र, महामंडळाच्या स्थळ निवड समितीने संमेलनाच्या आयोजनासाठी सर्वार्थाने परिपूर्ण अशा हिवरा आश्रमाची निवड केल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली.तत्पूर्वी, दिल्ली साहित्य परिषदेच्या प्रस्तावाला मान्य करून दिल्लीत संमेलन घेण्याचा निर्णय जवळपास झाला होता, मात्र, त्यांनी त्यांचा प्रस्ताव मागे घेतला, असे सांगून डॉ. जोशी म्हणाले की, या निर्णयानंतर महामंडळाकडे बडोदा आणि हिवरा आश्रम असे दोनच पर्याय शिल्लक राहिले होते. त्यापैकी, निवड समितीच्या निकषांमध्ये बसणार्‍या हिवरा आश्रमाचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यासोबतच, बडोदा अजूनही संमेलनाच्या दृष्टीने पुरेसे तयार नसल्याचेही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. हिवरा आश्रमातील विवेकानंद आश्रमाचा परिसर अतिशय विशाल असून त्यांच्याकडे २ हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते आणि कार्यक्रमांच्या आयोजनाचा अनुभव आहे. मेहकरपासून १५ किमी आणि साहित्यिक ना. घ. देशपांडे यांच्या वास्तव्याने पावन असे हे स्थळ असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल ऊर्फ भाईजी मालपानी यांनी संमेलनाच्या आयोजनाची तयारी दाखविली असून सामाजिक सेवा देणार्‍या संस्थेच्या परिसरात यंदा संमेलन होणार असल्याने या आयोजनाला विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यंदा संमेलन दिल्लीतच होणार या कल्पनाविश्‍वात रमलेल्या साहित्यिकांना ‘अभी दिल्ली दूर है’ असे म्हणायची वेळ आली आहे.
स्थळ निवड समितीच्या बैठकीत ७ सदस्यांपैकी ६ जणांची उपस्थिती होती. त्यापैकी ५ जणांनी हिवर्‍याच्या बाजूने तर एका सदस्याने विरोधात मतदान केले. यानंतर, महामंडळाची बैठक झाली आणि त्यात स्थळ निवड समितीचा अहवाल सादर करण्यात आला. मात्र, एकमत न झाल्याने मतदान घेण्यात आले. या बैठकीला १९ पैकी १६ सदस्य उपस्थित होते आणि त्यापैकी ९ सदस्यांनी हिवरा आश्रम, तर ५ सदस्यांनी बडोद्याकरिता मतदान केले. हिवरा आश्रम हे स्थळ विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने संमेलनाध्यक्षपदासाठी विदर्भातील उमेदवारांची दावेदारी मजबूत झाली आहे. मुंबई मराठी साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघ अशा तीन घटकसंस्थांमध्ये फिरते असलेले महामंडळाचे कार्यालय विदर्भाकडे असेपर्यंत एकदा तरी संमेलन या भागात होईल का, या चर्चेला आता विराम मिळाला आहे.

१० डिसेंबरला संमेलनाध्यक्षांची घोषणा
विदर्भ साहित्य संघात झालेल्या पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद  जोशी यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला. संमेलनाध्यक्षपदासाठी महामंडळाकडे घटक, समाविष्ट किंवा संलग्न संस्थेच्या मार्फतच अर्ज करता येणार असून ते १४ ऑक्टोबरपूर्वी दाखल होणे अपेक्षित आहे. उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याची अंतिम तिथी सोमवार २३ ऑक्टोबर असून याच दिवशी सायंकाळी ७ नंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. मतदारांकडे मंगळवार ३१ ऑक्टोबरपर्यंत मतपत्रिका रवाना करण्यात येणार असून त्या पुन्हा निर्वाचन अधिकार्‍यांकडे शनिवार ९ डिसेंबरपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मतमोजणी आणि निकालाची घोषणा रविवार १० डिसेंबर रोजी करण्यात येईल, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली.