खरे साहस…

0
52

कल्पवृक्ष
आज विवेकानंद दिग्विजय दिन. या दिवसाने देशाच्या इतिहासाला वळण दिले. अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत त्यांनी विजय मिळविला, तो हा दिवस. या दिवसाचे स्मरण विलक्षण प्रेरणादायी आहे.
ही परिषद काय होती, हे कळल्याशिवाय विवेकानंदांचे कर्तृत्व समजणे कठीण आहे. कुणातरी धर्मावर एखादा आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित, असा तो पोरखेळ नव्हता. कोलंबस अमेरिकेत उतरला त्या घटनेला १८९३ साली चारशे वर्षे पूर्ण झाली होती. संपूर्ण अमेरिकेतच हा महोत्सव साजरा केला जात होता. या निमित्ताने विभिन्न विषयांवरच्या २१ आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर हे कार्यक्रम सुरू होते. सर्वधर्म परिषद या महोत्सवाचाच एक भाग होती. ३० ऑक्टोबर १८९० ला चार्ल्स कॅरोल बॉनी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म परिषदेची आखणी करण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली होती. बॉनी अमेरिकेतील एक मान्यताप्राप्त विचारवंत होते. या समितीने जगातील सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या सल्लागार समित्यांचे गठन केले. जगातील अक्षरश: शेकडो पंथ, संप्रदाय, धर्मपीठे, धर्म यांची माहिती गोळा करण्यात आली. दहा हजार पत्रे पाठविण्यात आली होती. भारतातही एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्याची रीतसर निमंत्रणे गेली होती. चारही शंकराचार्यांना पत्रं गेली होती, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या परिषदेत सहभागी होणार्‍यांना आदरपूर्वक निमंत्रण, ओळखपत्र, प्रतिनिधित्व करणार असलेला पंथ, या सार्‍या गोष्टी पूर्वनियोजित होत्या. चेन्नईच्या ‘हिंदू’ वृत्तपत्रातील बातमीमुळे विवेकानंदांना परिषदेची माहिती कळली. त्यांच्या मित्रांनी पैसा गोळा केला, खेतरीच्या नरेशांनी काही मदत केली आणि विवेकानंद अमेरिकेच्या भूमीवर पोहोचले.
अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांना कळले की, परिषदेला अजून सव्वा महिना आहे. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की. त्यांच्याजवळ कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र नाही आणि विशेष म्हणजे नाव नोंदविण्याची मुदतही संपली आहे. जवळ तुटपुंजे पैसे, कडाक्याची थंडी, गरम कपड्यांचा अभाव, कुणाचीही ओळख नाही, अशा स्थितीत हा भगव्या कपड्यातला माणूस एकाकी स्थितीत उभा आहे. एका क्षणी तर आपण काय करून बसलो, असे त्यांना वाटले. अक्षरश: उपासमार सुरू होती. त्यांनी अलासिंगा यांना तार केली, ‘‘स्टार्व्हिंग, ऑल मनी स्पेंट.. सेंड मनी टु रीटर्न ऍटलिस्ट.’’ या तारेवरून ते कोणत्या स्थितीत होते, याची आपण कल्पना करू शकतो. पण, या परिस्थितीवर त्यांनी मात केली. ते हिंमत हारले नाहीत. आता उभे राहण्याकरिता दोनच गोष्टी त्यांच्याजवळ होत्या, एक म्हणजे आत्मविश्‍वास आणि दुसरी प्रचंड क्षमता. या ताकदीवर त्यांनी विजयश्री खेचून आणली. शिकागोपर्यंत रेल्वेने जाताना केट सॅनबॉर्न या वाङ्‌मयाच्या प्राध्यापिका त्यांच्या डब्यात समोरच बसल्या होत्या. या प्रवासात विवेकानंदांची त्यांच्याशी ओळख झाली व त्या फार प्रभावित झाल्या. विवेकानंद बोस्टनला गेले. तेथून ५० किलोमीटरवर मेटकाफ येथे सॅनबॉर्न राहात असत. त्या विवेकानंदांना घरी घेऊन गेल्या. त्यांनी प्रवासातल्या भेटीचे वर्णन लिहिले आहे. त्यात त्या लिहितात, ‘‘ …या प्रवासात मी त्यांना प्रथम पाहिले… चालत असताना त्यांची पावले कशी राजेशाही डौलात पडत होती. जणू काही सार्‍या जगावर फक्त त्यांचेच राज्य आहे… मी त्यांच्याशी संवाद साधला आणि मला एकापाठोपाठ धक्के बसू लागले. त्यांचे इंग्रजी माझ्यापेक्षा अधिक चांगले होते. प्राचीन आणि अर्वाचीन साहित्याशी त्यांचा परिचय होता. शेक्सपिअर, टेनिसन, डार्विन, मूलर अशा अनेकांची वचने त्यांच्या तोंडातून सहजपणे बाहेर पडत होती. बायबलमधील उतारे त्यांच्या जिभेवर होते. जगातील कुठलाही धर्म किंवा संप्रदाय घ्या, त्यांना माहिती होतीच. चकित करणारे वाचन, स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता… आणि विशेष म्हणजे सर्व धर्मांविषयी त्यांच्या मनात होता सारखाच आदर.’’ विवेकानंदांच्या देहबोलीत झळकणारा आत्मविश्‍वास आणि ज्ञानाच्या तेजाने त्या दीपून गेल्या होत्या. त्यांच्याकडेच विवेकानंदांची प्रा. राईट यांची ओळख झाली. ते हॉर्वर्ड विद्यापीठातील नामवंत प्राध्यापक होते. त्यांच्या मदतीनेच विवेकानंदांचे नाव परिषदेकरिता नोंदवले गेले. प्रा. राईट विवेकानंदांविषयी म्हणतात, ‘‘विवेकानंदांना प्रमाणपत्र मागणे म्हणजे, सूर्याला तुझ्याकडे प्रमाणपत्र आहे का, असे विचारण्यासारखे आहे! आपल्या विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांचे ज्ञान एका बाजूला आणि विवेकानंदांचे ज्ञान एका बाजूला, इतके ते ज्ञानी आहेत.’’ त्यानंतर जे घडले, त्याने इतिहास रचला गेला. विवेकानंदांनी शब्द उच्चारले, ‘‘माय सिस्टर्स ऍण्ड ब्रदर्स ऑफ अमेरिका’’… या परिषदेचे सूत्रसंचालन करणारे डॉ. बॅरोज लिहितात, ‘‘…फक्त सहा शब्द आणि जणू सर्वांच्या शरीरातून विजेचा प्रवाह जावा तसे सारे सभागृह थरारून गेले. कानठळ्या बसाव्यात असा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि तो दोन मिनिटे चालू होता. सारे सभागृह उभे झाले होते.’’ दुसर्‍या दिवशी अमेरिकेतील सर्व वृत्तपत्रांत त्यांना पहिल्या पानावर स्थान मिळाले. त्या दिवशी हा माणूस जगाला माहीत झाला. एक लक्षात ठेवले पाहिजे, ‘बंधूंनो आणि भगिनींनो’ असे शब्द उच्चारणारे ते पहिले नव्हते. त्या शब्दांमुळे प्रभाव पडला, हे म्हणणे फारच बाळबोध आहे. ते फक्त शब्द नव्हते. त्यांच्या करुणामय हृदयात समस्त मानव जातीविषयी असलेल्या प्रेमाची, अद्वैताची ती अनुभूती होती. एखादा माणूस समस्त क्षमतांचा सर्वोच्च विकास करून, आपल्या प्रचंड व्यक्तिमत्त्वाने जगाला गवसणी घालतो आणि आपल्या कार्याने नवे जग उभे करतो, याचे विवेकानंद एक अद्भुत उदाहरण आहे. तरुण साहसी असतात. म्हणूनच तरुणांनी एकदातरी त्यांचा अभ्यास करण्याचे साहस केले पाहिजे.
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११