लेफ्टनंट स्वाती व निधीला सॅल्यूट!

0
84

अग्रलेख
कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती आणि नायक मुकेशकुमार दुबे यांच्या पत्नी निधी, परवा लष्करात लेफ्टनंट झाल्या आणि ऊर अभिमानाने भरून आला. या बातमीने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले असतील, अशीच ही घटना आहे. देशसेवेसाठी शहीद झालेल्या या दोन लष्करी जवानांच्या पत्नींनी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकीत लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि लष्करानेही सर्व अटी बाजूला सारून या दोन वीरपत्नींना लष्करात सामील करून घेतले. लष्करात लेफ्टनंट दर्जाच्या अधिकार्‍याच्या प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा २० ते २५ वर्षे एवढी आहे. पण, लष्कराने ही अट दूर सारून ३२ वर्षीय स्वातीला लेफ्टनंट पदाच्या प्रशिक्षणासाठी चेन्नई येथील लष्कराच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत प्रवेश दिला. यासाठी लष्कराचे जेवढे अभिनंदन करावे, तेवढे कमीच आहे. पतीच्या निधनानंतर सावरल्यावर स्वाती म्हणाल्या होत्या, ‘आता त्यांचा सहवास मला लाभणार नाही. पण, तो सतत मिळावा, मी त्यांच्या जवळच असावी यासाठी मी स्वत:च्या मनात डोकावून पाहिले आणि मला आशेचा किरण दिसला. ज्या युनिफॉर्ममध्ये मी त्यांना पाहात होते, तो युनिफॉर्म परिधान करून त्यांचा सहवास मिळविता येऊ शकतो, हे माझे मन सांगून गेले. मी निर्धार केला, लष्करात भरती होण्याचा. वय अधिक होते, पण लष्कराने मदतीचा हात दिला. त्यांचे मनापासून आभार.’ एखादा निर्धार व्यक्तीला किती उंचीवर नेऊ शकतो याचा आदर्शच स्वातीने घालून दिला. ‘माझे पती संतोष हे दहशतवादाला मुळापासून उखडून फेकण्याच्या मोहिमेवर होते. पण, नियतीने घात केला. मला त्या दहशतवाद्यांचा बदला घ्यायचा आहे आणि संतोषसारखीच देशाची सेवा करायची आहे. माझी मुलंही मोठी होऊन लष्करात भरती झाल्यास मला आनंदच होईल. मुलांना योग्य प्रशिक्षण मिळावे म्हणून मुलीला डेहराडून आली मुलाला पचगणीच्या शाळेत दाखल केले आहे.’ ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्या आज लेफ्टनंट झाल्या आहेत. त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. कर्नल संतोष महाडिक यांनी सातार्‍याच्या सैनिकी प्रशिक्षण स्कूलमध्ये सहाव्या वर्गापासूनच नाव घातले आणि मग त्यांनी मागे वळूनच पाहिले नाही. केवळ शिक्षण, प्रशिक्षणातच नव्हे, तर साहसी क्रीडांमध्येही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले. लष्कराच्या फुटबॉल चमूचे ते गोलकीपर होते, अतिशय उत्तम घोडेस्वार, पॅराग्लायडिंगमध्ये ते अव्वल होते. ते अतिशय उत्तम जलतरणपटू होते. भारताचा क्रिकेटपटू महेन्द्रसिंह धोनी याला ऑगस्ट २०१५ मध्ये पॅराग्लायडिंगचे प्रशिक्षण देणार्‍या प्रशिक्षकांमध्ये त्यांचा समावेश होता. अतिशय उत्तम नेमबाज आणि कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी आघाडीवरच ते राहात असत. पॅराशूट रेजिमेंटसाठी खास गठित केलेल्या २१ पॅरा स्पेशल फोर्सेसचे ते अधिकारी होते. ४१ राष्ट्रीय रायफल्स या दहशतवादविरोधी बटालियनचे ते कमांडिंग ऑफिसर होते. कुपवाडासारख्या अतिशय खडतर अशा पर्वत आणि जंगलराजींनी घेरलेल्या भागात मोहीम राबविताना कुपवाडात मोठी चकमक उडाली. जम्मू-काश्मीरच्या मानीगढ या पर्वत व जंगलांनी वेढलेल्या भागात ११ नोव्हेंबर २०१५ पासून अतिरेक्यांना हुडकून काढण्याची जबाबदारी महाडिक यांच्या चमूवर होती. ही कारवाई आठवडाभर सुरू होती. अखेर तो १७ नोव्हेंबरचा काळा दिवस उगवला. अतिरेक्यांशी लढताना आघाडीवर राहून त्यांनी अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले. पण, या धुमश्‍चक्रीत अतिरेक्यांनच्या गोळ्यांनी ते गंभीर जखमी झाले. अशाही स्थितीत ते लढतच राहिले. त्यांना जखमी अवस्थेत दुर्गमुल्ला येथील लष्करी इस्पितळात हेलिकॉप्टरने नेण्यात आले. रक्त खूप गेले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याची शर्थ केली. पण, अखेर देशाच्या सरहद्दीचे रक्षण करताना हा वीर जवान शहीद झाला. महाडिक यांच्या बटालियनवर शोककळा पसरली. संतोषचे सातार्‍यातील लष्करी शाळेतील वर्गमित्र कर्नल प्रशांत पाटील हे संतोषच्या शहादतनंतर आपल्या अनुभवांना आणि भावभावनांना वाट मोकळी करून देत म्हणाले, संतोष महाडिक यांचा जन्मच यासाठी झाला असावा. संतोष नेहमी म्हणायचे, ‘‘मला शत्रूंशी लढताना वीरमरण आले तर तो माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असेल.’’ त्यांचा, लष्कराचा तिसरा सर्वोच्च समजल्या जाणार्‍या शौर्यचक्र पुरस्काराने मरणोत्तर सन्मान प्रदान करण्यात आला. संतोष महाडिक हे जेव्हा सुटीवर घरी यायचे, तेव्हा ते आपले अनुभव स्वातीला सांगायचे. तसेही स्वातीला लग्न झाल्यापासून संतोष यांच्या शौर्याबद्दल, कामाबद्दल बरीच माहिती झालीच होती. ते घरी यायचे तेव्हा कुटुंबासोबत रमून जायचे. शनिवारी परेड संपल्यानंतर स्वाती यांना लेफ्टनंट म्हणून कमिशन मिळाले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबेना. हे संतोष यांच्या आठवणीचेही होते आणि नव्या युनिफॉर्मचेही होते. हा सोहळा पाहण्यासाठी आलेली त्यांची १२ वर्षांची मुलगी कार्तिकी, ७ वर्षांचा स्वराज, वडील बबनराव शेडगेे आणि सासू कालिंदीबाई यांनी स्वातीला सावरले. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना पुण्यातील आर्मी आर्डनन्स कॉर्प्सस् येथे पहिली पोस्टिंग मिळाली आहे. नायक मुकेशकुमार दुबे यांनाही २००८ साली वीरमरण आले होते. त्यांची पत्नी निधी दुबे यांनीही आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकीत प्रशिक्षण घेतले व त्यांनासुद्धा लेफ्टनंट पद प्रदान करण्यात आले. आमचा देश हा रणरागिणींचा देश आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई असोत की, अहल्यादेवी होळकर. पतीविरह हा किती दु:खदायी असतो, हे त्या पत्नीनांच विचारा, ज्यांचे पती ऐन युवावस्थेत देशासाठी शहीद झाले आहेत. पण, स्वाती आणि निधीने देशातील वीरपत्नींसाठी एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. नुकतीच एक शुभ बातमी आली आहे. लष्कराच्या पोलिस दलात ८०० महिलांना प्रशिक्षित करण्याची ती बातमी आहे. रविवारी आणखी एक चांगली घटना घडली. आमच्या सहा महिला नाविक चमूने विश्‍वसागरी परिक्रमेचा आरंभ केला. नव्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना हिरवी झेंडी फडकावून यश चिंतीले. पंतप्रधान नरेंद्र मेादी यांनी ट्विट करून या चमूला शुभेच्छा दिला. आज लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये महिलांनी आपले कर्तृत्व गाजविले आहे. महिलांना अगदी वैमानिक होण्याची दालने खुली करून देण्यात आली आहेत. महिलांसाठी लष्कराने संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधींचा महिलांनी, युवतींनी लाभ घेतला पाहिजे आणि देशासाठी सेवा दिली पाहिजे. स्वाती आणि निधी या वीरपत्नींनी आपल्या निर्धाराचा परिचय दिला आहे. आज संपूर्ण देश त्यांना सलाम करीत आहे. ‘तरुण भारत’तर्फे या दोन्ही वीरपत्नींना सॅल्यूट!