यादव, शमीचे पुनरागमन

0
75

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
नवी दिल्ली, १० सप्टेंबर 
वेगवान गोलंदाज उमेश यादव व मोहम्मद शमी यांचे आगामी १७ सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणार्‍या पहिल्या तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. अलीकडेच श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिकेत खेळलेल्या १५ सदस्यीय संघातून शार्दुल ठाकूरला वगळण्यात आले. फिरकी गोलंदाज आर. अश्‍विन व रवींद्र जडेजा यांना पुन्हा एकदा विश्रांती देण्यात आली आहे.
अश्‍विन सध्या इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये वॉर्सेस्टरशायर संघाकडून खेळत असून त्याचा चार सामने खेळण्याचा करार आहे. सध्या तो  केवळ दोन सामने खेळला असून १२ ते १५ सप्टेंबरदरम्यान लिसेस्टरशायरविरुद्ध, तर २५ ते २८ सप्टेंबरदरम्यान डरहॅमविरुद्ध खेळणार आहे. युवराज सिंगला पुन्हा एकदा संधी देण्यातआली नाही. चार सामन्यात ६४ धावा गोळा करणार्‍या केदार जाधवने मात्र संघातील आपले स्थान कायम राखले. गत काही काळापासून केदारने आपल्या प्रदर्शनात सातत्य ठेवले. विशेष म्हणजे त्याने पार्ट टाईम फिरकी गोलंदाज म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केली, असे एका सूत्राने सांगितले.
भारत-ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना १७ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळला जाणार आहे. बोर्डाच्या रोटेशन पद्धतीनुसार पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून त्यामुळेच आर. अश्‍विन व रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे, असे निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद यांनी सांगितले. श्रीलंका दौर्‍यात भारतीय संघाचे प्रदर्शन उत्कृष्ट राहिले, अक्षर पटेल व युजवेंद्र चहलसारख्या खेळाडूंनी अतिशय सुंदर प्रदर्शन केले. आगामी दौर्‍याच्या दृष्टिने सध्या आमची संघबांधणी सुरू आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय क्रिकेट संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव व मोहम्मद शमी. (वृत्तसंस्था)