राम रहीमच्या ‘एमएसजी’मध्ये  ३ कोटी गुंतवणार्‍याची आत्महत्या

0
50

रोहतक, १० सप्टेंबर
२० वर्षाची शिक्षा झाल्यानंतर सध्या कैदेत असलेल्या बलात्कारी बाबा राम रहीमच्या ‘एमएसजी रिसॉर्ट’मध्ये ३ कोटी रुपये गुंतविणार्‍या व्यक्तीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.हरियाणाच्या चरखी दादरी जिल्ह्यातील बलकारा गावातील रहिवासी सोमबीर कुमार याने गावाजवळील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. सोमबीरचे गेली सात वर्षे डेरा सच्चा सौदाशी घनिष्ठ संबंध होते. त्याने आपली वडिलोपार्जित ३२ एकर शेती विकून राम रहीमच्या ‘एमएसजी रिसॉर्ट’मध्ये ३ कोटी रुपये गुंतवले होते. त्यासाठी सोमबीरला एमएसजीच्या नफ्यातील १० टक्के नफा मिळत असे. डेराच्या ४५ सदस्य असलेल्या समितीचा तो सन्माननीय सदस्य होता. त्याची ३ मुले आणि २ मुली डेर्‍याच्या आवारात राहत होती. मुले सुरक्षा रक्षक होते तर, मुली राम रहीमच्या खासगी सुरक्षा रक्षक होत्या. राम रहीमला अटक होऊन शिक्षा झाल्यापासून गावकरी सोमबीरची टिंगल करत असत. त्याच्या मुलींच्या चारित्र्याबद्दल संशय व्यक्त करत असत.
संपूर्ण गावभर राम रहीमची चेष्टा आणि हेटाळणीच चालत असे. हे सारे असह्य होऊन सोमबीरने अखेर आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दुपारपासून तो बेपत्ता होता. त्याचा मुलगा ललित कुमारने आपले वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दिली होती. त्याने गावकर्‍यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती. अखेर शुक्रवारी शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह सापडला. (वृत्तसंस्था)