पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कुणी…

0
51

कोसळलेले झाड जगविण्याचा पक्षिमित्रांच्या अथक संघर्षाची कहाणी
संजय रामगिरवार
चंद्रपूर, ११ सप्टेंबर
रस्त्याच्या कडेला रक्तस्त्राव होत असह्य वेदनांनी मरणासन्न पडलेला एखादा माणूस पाहिला तर तुम्ही काय कराल? किमान त्याच्या तोंडी पाणी तर घालालच ना… मग एखादा वृक्ष उन्मळून पडला असेल अन् त्याची मूळं हात पसरून आभाळाची करुणा भाकत असतील तर त्याची कण्हने तुम्हाला ऐकूच येणार नाही, मरणाच्या दारात त्या वृक्षाला तडफडत सोडून तुम्ही समोर निघून जाल… पण, एक सर्जनशील डॉक्टर, हळवा पर्यावरणवादी पक्षीमित्राला असे एक झाड दिसले… ‘पाखड’चा तो डेरेदार वृक्ष. रानातल्या पाखरांचा आसराच. व्हेंटीलेटरवरच असल्यागत तो वृक्ष जगविण्यासाठी एका डॉक्टरने केलेल्या अथक संघर्षाची ही कहाणी आहे…
मी उन्मळून पडलेल्या झाडांच्या मुळांसारखा
झाड पेलवत नाही, जमीन सोडवत नाही…
अशी अवस्था झाडांचीच होते असे नाही, ती माणसांचीही होते. झाडे माणसांना सावली देतात, पाखरांना आश्रय देतात… उन्मळून पडलेल्या या पन्नास वर्षांच्या वृक्षाची सोबत त्यावर घरटी असणार्‍या पाखरांनी सोडली नव्हती पण त्याच्या सावलीत ताडमाड वाढलेल्या माणसांनी मात्र कृतघ्नपणे त्याला जगविण्याच्या डॉ. अनिल पिंपळापुरेंच्या प्रयत्नांत अडथळे आणले… त्यावर मात करण्याचीही ही कहाणी आहे.
ताडोबा अभयारण्याच्या मोहर्ली गेट जवळील रॉयल टायगर रिसोर्टच्या शेजारीच हा वृक्ष आहे. तो कोसळला, मात्र त्याची मुळं काही प्रमाणात जमिनीत होती. रॉयल टायगर रिसॉर्टचे दीना रुपदे यांच्या मदतीने डॉ. पिंपळापुरे यांनी ‘आम्ही हे झाड जगवितो. त्यासाठी शासकीय जमिनीवर काम करू द्या’ असा रीतसर अर्ज तहसिलदारांकडे केला. तहसिलदारांनी असमर्थता व्यक्त केली. गावातल्या काही महिलांनी झाडाखाली देव मांडले होते, त्यामुळे त्यांनी या सद्कार्यावरच संशय घेतला. अखेर विषय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गेला. अत्यंत तप्तर आणि संवेदनशील वनमंत्री हळहळले. ‘पन्नास कोटी वृक्ष लावण्याची मोहीम आहे, याचा अर्थ नवी झाडे लावत असताना जुन्या झाडांकडे दुर्लक्ष करायचे असे नाही’, असे म्हणत त्यांनी योग्य ठिकाणी कान पिळले. गावातल्या सरपंचांना सूचना झाली आणि तेव्हा कुठे या वृक्षाच्या मुळांना बळ देण्याची प्रक्रिया सुरू झाली.
उन्मळला असला तरीही हा वृक्ष आणखी काही काळ तग धरेल, अशा स्थितीत तो नक्कीच होता. जमिनीबाहेर आलल्या मुळांवर मातीचा भराव टाकून त्याभोवती दगडी पार बांधणे खूप गरजेचे होते. तहसिलदार खांडरे यांना हे करणे आवश्यक असल्याचे वनमंत्र्यांच्या भाषेतच समजू शकले. वेळ महत्त्वाची होती. तातडीने काम सुरू करण्यात आले. झाडाभोवती पार बांधून त्यात मातीचा भराव टाकण्यात आला. झाड पेलवत नाही, जमीन सोडवत नाही, ही झाडाची अगतिकता संपली. झाड पूनर्जिवित करण्यात आले. तिथे असलेली अतिक्रमित कुंपणेही काढण्यात आली. आता तेथे गावकर्‍यांना बसायला एक छानसा पार होतो आहे.
पक्ष्यांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी
प्रत्येक ओंजळीमागे असतेच झर्‍याचे पाणी…
ग्रेसांची ही कविता त्या झाडाच्या पानांनी म्हटली असेल अन् गेल्या अनेक पिढ्या त्या झाडाच्या आश्रयाला असलेल्या पाखरांनीही आता पुन्हा त्या झाडावर गर्दी करीत गाणी गायला सुरुवात केली आहे.
वृक्षांनाही संवेदना असतात, त्यांना स्पर्शाची भाषा कळते, त्या द्वारे संवाद साधता येतो, हे भारतीय शास्त्रज्ञ जगदिशचंद्र बोस यांनी सिद्ध केलेले आहे. पक्षीप्रेमी डॉ. अनिल पिंपळापुरे, दिना रूपदे, पर्यावरण कार्यकर्ते धनंजय बापट यांच्या स्नेहाने केलेल्या प्रयत्नांना तो वृक्षही आता प्रतिसाद देतो आहे…
सोमवार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी सरपंच संजय मोंढे, पिंपळापुरे, रुपदे आणि गावकर्‍यांनी या झाडाची आणि तेथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि येत्या काळात ते अधिक चांगले करण्याची योजना आखली. दिना रुपदे आता या झाडाची देखभाल करणार आहेत.