सुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

0
55

कोंडाणे धरण घोटाळाप्रकरणी आरोपपत्र दाखल
मुंबई, ११ सप्टेंबर 
रायगड जिल्ह्यातील कोंडाणे धरण घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने आज सोमवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचे नाव आहे की नाही याबद्दल सध्या संभ्रम असला तरी त्यांच्या चौकशीची मागणी यात करण्यात आल्यामुळे तटकरे यांच्या अडचणी अधिकच वाढणार आहेत.
प्रकल्पांच्या निविदांसाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन करून आणि बोगस निविदाकार उभे करून ८० कोटी रुपयांचे काम तब्बल ६१४ कोटींपर्यंत नेण्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील कोंडाणा धरणाबाबत घडला आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सहा अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच सुनील तटकरे यांच्या डोक्यावरही टांगती तलवार होती.
कोंडाणे येथील उल्हास नदीवर धरण बांधण्यासाठी २०११ मध्ये निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत एफ. ए. एंटरप्रायझेसचे भागीदार निसार खत्री यांनी भाग घेतला होता. निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या अन्य कंपन्यांना एफ. ए. एंटरप्रायझेस यांनीच पुरस्कृत केले होते आणि निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक झाल्याचे भासवले होते. एफ. ए. एंटरप्रायझेस अपात्र ठरत असतानाही नियमांना धाब्यावर बसवून या कंपनीला काम देण्यात आले होते. यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.
आरोपपत्र दाखल झाल्याने आता तटकरे यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. एसीबीने दाखल केलेल्या या तीन हजार पानांच्या आरोपपत्रात सहा अधिकार्‍यांच्या नावांचाही समावेश आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांनीही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात, राज्यात भाजपाची सत्ता आल्यास जलसिंचन घोटाळ्यातील सर्व दोषींना तुरुंगात पाठवू, असे जाहीर केले होते.
याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेल्या सहा अधिकार्‍यांमध्ये जलसंपदा विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक डी. पी. शिर्के, तत्कालीन मुख्य अभियंता बा. भा. पाटील, पाटबंधारे खात्याचे ठाणे विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता आर. डी. शिंदे, जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता प्र. भा. सोनावणे, रायगड पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अ. पा. साळुंके, कार्यकारी अभियंता रा. चं. रिठे आणि एफ. ए. एन्टरप्रायजेसचा भागीदार निसार खत्रीचा समावेश आहे.