नंदनवनात पर्यटकांचे स्वागत

0
33

– काश्मिरातील स्थिती सुधारली
– राजनाथसिंह यांचा दावा
श्रीनगर, ११ सप्टेंबर  
जम्मू-काश्मिरातील स्थितीत गेल्या एक वर्षाच्या काळात बरीच सुधारणा झाली आहे. शांतता दृष्टिपथात आहे. भारताच्या पृथ्वीवरील या नंदनवनात देश-विदेशातील पर्यटकांचे स्वागत आहे. पर्यटक आणि पर्यटन संस्थांनी काश्मीरमध्ये येण्यासाठी सज्ज व्हावे. काश्मिरी जनता तुमच्या स्वागतासाठी तयार आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी येथे केले.
चार दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौर्‍यावर असलेले राजनाथसिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, काश्मीर खोर्‍यातील शांततेचा वृक्ष अद्याप वाळलेला नाही. काश्मिरातील शांतता पाच ‘सी’ अर्थात कम्पॅशन, कम्युनिकेशन, को-एक्झिसटन्स, कॉन्फिडन्स आणि कन्सिटन्सी (दया, संदेशवहन, सहअस्तित्त्व, विश्‍वास आणि सातत्य) यावरच आधारित आहे. भेटीस आलेल्या शिष्टमंडळांशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. राजनाथसिंह पुढे म्हणाले, काश्मिरातील स्थितीत आता बरीच सुधारणा झाली असल्याचे मी पाहात आहे.  सर्वच काही सुधारले, असा दावा मी कदापि करणार नाही. पण, स्थिती पूर्वीसारखी राहिली नाही, असे मी विश्‍वासाने सांगू शकतो.
काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी वर्षभरात ५० वेळा येथे यावे लागले, तरी मी येईन. आम्हाला काश्मीरचा प्रश्‍न सोडवायचा आहे. राज्यातील या जटील प्रश्‍नावर काही ठरावीक लोकांशीच बोलायचे आहे, असे मी ठरवून आलेलो नाही. काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्यातील सर्व घटकांशी बोलायला आवडेल. ज्यांना माझ्याशी चर्चा करायची आहे, त्यांनी समोर यावे, त्यांचे स्वागतच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
३५ ए कलमाबाबत बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, सरकारने यापूर्वी आणि आताही या मुद्यावरून न्यायालयात जाण्यासाठी कधीच पुढाकार घेतला नाही. राज्य सरकारवरच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना येथील सरकार काश्मिरी जनतेच्या भावभावनांचा विचार न करता कुठलेही पाऊल उचलणार नाही, याची आम्हाला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)