गजर महाराष्ट्राचा…

0
33

विशेष
द्रष्टे मराठी कवी सुरेश भट यांच्या काही दार्शनिक काव्यपंक्ती आहेत. ते लिहितात, ‘‘लाभले भाग्य आम्हा, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, पाहतो मराठी…’’ हाच जागर महाराष्ट्राचा आहे. त्यांचा हा ‘एल्गार’ अभिमानाने मराठी हृदय धडकविणारा, नखशिखान्त नसानसांतून रक्तप्रवाह खळखळविणारा आहे.
सर्व प्रदेशांना भूगोल आहे, पण महाराष्ट्राला देदीप्यमान इतिहासाचा वारसा आहे. हा वारसा प्राक् ऐतिहासिक काळापासून चालत आला आहे. जुन्या पिढीतील प्रसिद्ध इतिहाससंशोधक राजारामशास्त्री भागवत यांच्या मते, शालिवाहन शकाच्या आधीपासून महाराष्ट्राला इतिहास आहे. ते म्हणतात, आर्य व यादव ही कुळे मूळ महाराष्ट्रातीलच होती. ही मंडळी रणवीर, धनुर्धारी व महारथी होती. त्यांच्या मते, महारथीवरून ‘मराठी’ हे नाव आले असावे. मराठी भाषा ही प्राकृत, पैशाची व शूरसेनीइतकीच आदिम आहे. रुक्मिणी ही विदर्भकन्याच होती. गोव्यात आलेला ख्रिश्‍चन धर्मगुरू फादर स्टीफन तर मराठीच्या प्रेमातच पडला! ‘मोगरीच्या फुलांचा सुगंध दरवळणारी भाषा मराठी आहे!’ असे त्याने लिहिले आहे. छापील मराठी पुस्तक ‘ख्रिस्तपुराण’ फादर स्टिफनने गोव्यात १५ व्या शतकात प्रकाशित केले.
एखाद्या स्फटिक लोलकातून प्रकाशाकडे वेगवेगळ्या अंगाने पाहिल्यास, मन मंत्रमुग्ध करणारी विविध रंगी प्रभा दृष्टीस पडते. तसेच मराठी भाषेची स्तिमित करणारी आनंददायी व आश्‍चर्यकारक दर्शने शतकानुशतकांपासून झळकत आहेत. जवळपास हजार वर्षांपूर्वी कृष्णदयार्णव-शिष्य मुकुंदराय यांनी ‘विवेकसिंधू’द्वारे मराठी समाजाच्या बौद्धिक परिपक्वतेचे दर्शन घडविले. गोविंद प्रभूलिखित श्रीचक्रधर स्वामींच्या ‘लीळाचरित्रा’तून, सर्वांगावरून हलकेच मोरपीस फिरावे, असा मनाला सुखदायक लडिवाळ आभास होतो. ज्ञानेशाची ज्ञानेश्‍वरी म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर! त्याला ना आदी ना अंत!! कितीही डुबक्या मारा, प्रत्येक वेळी वेगवेगळी अर्थरत्ने ओव्यांतून बाहेर पडतात. संत रामदास म्हणजे रोखठोक व्यक्तिमत्त्वाचे स्वामी! त्यांनी ‘दासबोधा’तून आगळ्यावेगळ्या रोखठोक मराठी भाषेचे आक्रमक दर्शन घडविले. मराठीचा काव्य फुलोरा फुलवीत, भाषासौंदर्याची मनसोक्त लयलूट करीत कवी मोरोपंत, वामन पंडित, श्रीधर स्वामी आदी कवींनी मराठी भाषेच्या अलौकिक सौंदर्याचे दालन रसिकांपुढे उघडले.
अभंगवाणीबद्दल काय लिहावे? भक्तिमागार्र्ची ही गंगा निर्माण करणार्‍या संतमंडळींची, संत तुकारामांपासून चालू होणारी मांदियाळी किती सांगावी, याला आदी ना अंत! महिम्नस्तोत्रात भगवान शंकराचे स्तवन करताना पुष्पदंत गंधर्व म्हणतो, ‘‘देवा! समुद्रातल्या पाण्याची शाई करून, कल्पवृक्षाच्या बोरूने तुझा महिमा लिहायला, पृथ्वीतलाचा कागददेखील अपुरा पडेल!’’ हीच उपमा मराठी अभंगवाणीलासुद्धा यथायोग्य लागू होते.
दैव कुणाचीही पाठ सोडत नाही. आपापसातले हेवेदावे, भाऊबंदकी याची लागण महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासालाच नव्हे, तर वर्तमानालापण आहे. १८१८ साली चतुर इंग्रजांनी कोरेगाव पार्कच्या लढाईत, त्यांच्या पदरच्या मराठी सैन्याला पेशव्यांच्या मराठी सैन्याशी झुंजवून पेशव्यांचा पराभव केला. तेव्हा फक्त मराठी राज्य नव्हे, तर पूर्ण देश पारतंत्र्याच्या जोखडात बांधला गेला. १८१८ साली पारतंत्र्याने झाकोळलेल्या भारतात, स्वतंत्र असणार्‍या एकुलत्या एक राज्याचे- मराठी राज्याचे- दोन बुलंद बुरूज- पुणे आणि नागपूर- जमीनदोस्त झालेत आणि अख्ख्या भारतावर युनियन जॅक मोठ्या डौलाने फडकायला लागला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भाषावार प्रांतरचनेमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र अस्तित्वात आला. चारशे वर्षांच्या अथक प्रयत्नांनी, विदर्भकन्या जिजाबाई व शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी जोपासलेले स्वप्न अखेरीस प्रत्यक्षात आले. पण, महाराष्ट्राच्या दुर्दैवाने काही दशके हे राज्य स्वार्थी, आपमतलबी, फक्त आपले कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक, आपला पक्ष, आपली व्यावसायिक संस्थाने, जात-पात याचाच विचार करणार्‍या नतद्रष्ट नेत्यांच्या हातात पडले. त्याचा परिणाम म्हणजे झाडाझाडावर लटकणार्‍या सुगरण पक्ष्याच्या खोप्याप्रमाणे, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे कलेवर झाडाझाडावर लटकताना दिसायला लागलेत, पण निगरगट्‌ट नेत्यांना त्याची ना लाज, ना चिंता, ना खंत! निराशेचा अंधकार महाराष्ट्रावर दाटून आला.
पण, महाराष्ट्राची कुलदेवता भवानी आई व महाराष्ट्रात मठाधिशस्थ असलेले अनेक महान साधुसंत-महात्मे यांच्या आशीर्वादाने नव्या दमाच्या युवा पिढीचे राज्य उदयाला आले. या नवउन्मेषी नेत्यांनी, अनेक वर्षे निष्काम कर्माच्या गर्तेत फसलेल्या प्रगतीच्या रथाला खेचून बाहेर काढले. पाहता पाहता हा ‘देवेंद्र-रथ’ चौखूर धावायला लागला. या युवा नेत्यांनी प्रगतीची एकेक शिखरे अथक प्रयत्नांनी काबीज करीत सर्वांचे डोळे दिपवले. निराशेचे काळे ढग केव्हाच नाहीसे झालेत. महाराष्ट्राच्या नभोमंडळात प्रथमच प्रगतीच्या तेजाची आभा झळकायला लागली आहे.
महाराष्ट्री संस्कृती, कला, आस्था, प्रगती यांचा गजर दहाही दिशांना दणाणतो आहे. अतिपूर्वेच्या वैनगंगेच्या काठापासून. तर अरबी समुद्रापर्यंत, उत्तरेकडील नर्मदा नदीच्या तीरापासून दक्षिणस्थित गोदावरी, कृष्णा, कावेरीच्या काठापर्यंत, महाराष्ट्राच्या नवऊन्मेषी जागरात चिंब होऊन मराठी मन आनंदाने म्हणते, ‘‘लाभले भाग्य आम्हा बोलतो मराठी… ऐकतो मराठी…!’’
या वाणीचा/दोह्यांचा पुरावा महाराष्ट्रात पोहोचवावयाला म्हणून नागपुरात चौकाचौकांतून हातात महाराष्ट्राची पताका व घोषणा देऊन महाराष्ट्राची एकता-अखंडता लोकांपर्यंत पोहोचावयाचा हा संकल्प!
मधुकर कुकडे
९४२३१०४४३२