स्टे हंग्री, स्टे फुलिश…

0
42

कल्पवृक्ष
शिक्षणक्षेत्रात आज टक्केवारीने नको तितका गोंधळ घातला आहे. त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थीही केवळ परीक्षा पास करणे, गुण मिळवणे म्हणजे शिक्षण, असा गैरसमज करून घेतात. चौकटीबाहेर जाऊन आपल्यातल्या क्षमतांचा विकास करण्याची धडपडच त्यांच्यात दिसत नाही. आज मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण, या क्रांतीचा एक प्रमुख कर्णधार असलेला माणूस आपले पदवी शिक्षणही पूर्ण करू शकला नव्हता. हजारो संगणक अभियंते ज्याच्या हाताखाली काम करत होते, तो माणूस संगणक अभियंताच काय, साधा पदवीधरही नव्हता! तो जगप्रसिद्ध माणूस म्हणजे ऍप्पल कंपनीचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज!
जागतिक तंत्रज्ञानाचा चेहरामोहराच त्याने बदलवून टाकला. आकाराने छोटा, वापरायला सोपा, कमांड सिस्टीमऐवजी क्लिक करणारा माऊस असलेला पहिला वैयक्तिक संगणक त्याने बनवला. त्यामुळेच सामान्य माणसाच्या हातात संगणक आला. टचस्क्रीन असलेला पहिला आयफोन, पहिला आयपॉड, पहिला टॅब्लेट, या तंत्रज्ञानविश्‍वात क्रांती घडवून आणणार्‍या गोष्टी त्याने बनविल्या. संगणकाचा वापर करून बनविण्यात आलेली पहिली ऍनिमेशन फिल्म त्याच्याच पिक्सार कंपनीत तयार झाली. अशा अनेक अद्भुत निर्मितींचा तो जनक होता. वयाच्या ३० व्या वर्षी २ अब्ज डॉलर्स आणि ४ हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचा तो सीईओ होता.
एका कुमारी मातेच्या पोटी त्याचा जन्म झाला. जन्माच्या आधीच तिने त्याला दत्तक देण्याचे निश्‍चित केले होते. त्याचे दत्तक आईवडील फार शिकलेले नव्हते. त्यांची परिस्थितीही बेताचीच होती. त्यामुळे त्याचे बालपण काही फार चांगले गेले नाही. स्थिती चांगली नसतानाही शिकवण्याकरिता स्टिव्हला त्यांनी स्टॅनफोर्डसारख्या खर्चीक महाविद्यालयात टाकले. पण, त्याला त्यात रुची नव्हती. हे शिकून आपण काय करणार, असा प्रश्‍न त्याच्या मनात निर्माण होत असे. दीड-दोन वर्षांतच त्याने कॉलेज सोडले. तो ड्रॉपआऊट होता. आपल्या आवडीच्या क्षेत्राचा तो शोध घेत होता. पुढचे काही दिवस त्याने कठीण अवस्थेत काढले. संगणक व तंत्रज्ञानाची त्याला प्रचंड आवड होती. आणि तेच करण्याचा त्याने निर्णय घेतला. वेड्यासारखा, झपाटल्यासारखा तो त्याच्या मागे लागला. २० व्या वर्षी एका मित्रासोबत वडिलांच्या गॅरेजमध्ये त्याने ऍप्पल नावाची कंपनी काढली. पहिले उत्पादन करण्याकरिता दोघांनी आपल्या वस्तू विकून १००० डॉलर्स जमविले आणि पुढे त्याला कल्पनातीत यश मिळाले. कंपनीचा लोगो आणि ब्रोशर बनविण्याकरिता त्यांच्याजवळ पैसे नव्हते. म्हणून त्यांनी त्या कलाकाराला १० टक्के शेअर दिले. त्याला त्यात रुची नव्हती म्हणून त्याने ते ३०० डॉलर्सला विकले. ८० साली त्या शेअरची किंमत ६.७ कोटी डॉलर्स झाली. स्टीव्ह जॉब्जला हे यश का मिळाले? त्याच्या अनुभवावरून तो आपल्याला काय सल्ला देतो? तो म्हणतो, ‘‘मी जे काही केले ते आवडीने, प्रेमाने केले. तुम्हाला तुमची आवड कशात आहे, हे शोधलेच पाहिजे. तुमचे काम हे तुमच्या जीवनातील मोठा भाग व्यापून टाकते आणि खरे समाधान मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या आवडीचे काम करीत राहणे. श्रेष्ठ काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जे काम कराल त्या कामावर श्रद्धा ठेवणे आणि प्रेम करणे. जर ते तुम्हाला सापडले नसेल तर शोधायला लागा. ते मिळेपर्यंत शोधत राहा. स्वस्थ बसू नका.’’ याची कारणमीमांसा करताना तो म्हणतो, ‘‘कुठलेही क्षेत्र घ्या. वरवर पाहता ते सोपे वाटते, पण जसजसे तुम्ही खोलामध्ये जाता तसे तुम्हाला कळते की, त्या कामात अनंत अडचणी आहेत आणि त्याकरिता खूप कौशल्याची गरज आहे. अशा वेळी तुम्हाला त्या कामाविषयी उत्कटता नसेल, प्रेम नसेल तर तुम्ही अडचणींना तोंड देऊच शकणार नाही. अडचणींच्या वेळीच तुम्हाला त्या क्षेत्राची किती आवड आहे, याची परीक्षा होते आणि त्यावरूनच तुम्ही त्यात यशस्वी होणार की नाही, हेही निश्‍चित होते.’’
स्टीव्हचे हे विचार आपण जितक्या लवकर आत्मसात करू तितक्या लवकर जीवनाला निश्‍चित दिशा मिळेल. अन्यथा आपण वर्षानुवर्षे अंधारातच चाचपडत राहू.
कंपनीत भविष्यातील काही योजनांविषयी त्याचे संचालकांशी मतभेद झाले. त्याने सुरू केलेल्या कंपनीतून त्याचीच हकालपट्‌टी करण्यात आली. त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदूच नाहीसा झाला. हा काळ त्याच्या निराशेचा काळ होता. आपण जाहीर पराभूत आहोत, असे त्याला वाटू लागले. पण तो सावरला. त्याने नेक्स्ट आणि पिक्सार या कंपन्या सुरू केल्या. अल्पावधीतच त्याला यश मिळाले. ऍप्पललाही आपली चूक लक्षात आली. अवघ्या आठ महिन्यांत ‘नेक्स्ट’ ऍप्पलमध्ये विलीन झाली. तो पुन्हा ऍप्पलचा चेअरमन झाला.
हा झपाटलेला माणूस म्हणत असे, ‘‘तुमच्यात काही बदल करण्याची गरज आहे का, असा प्रश्‍न आरशासमोर उभे राहून स्वत:ला रोज विचारा आणि ते बदल तत्काळ करा. काळ कुणाकरिताही थांबत नाही. तुमचा वेळ मर्यादित आहे. तेव्हा दुसर्‍याचे जीवन जगण्यात ते वाया घालवू नका. इतरांच्या वैयक्तिक निष्कर्षांच्या सापळ्यात अडकू नका. तुमचे हृदय आणि अंतर्ज्ञान काय सांगते, याचे अनुकरण करा. तुम्हाला नेमके काय व्हायचे आहे, ते तुम्हीच ठरवा.’’ त्यांची एण्डोस्कोपी करताना डॉक्टरच अक्षरश: रडायला लागले. कारण त्यांना त्याच्या स्वादुपिंडात कॅन्सरच्या पेशी दिसल्या. अवघ्या ५६ व्या वर्षी निर्भयपणे तो मृत्यूला सामोरी गेला. ‘स्टे हंग्री, स्टे फुलिश,’ असा संदेश तो तरुणांना देत असे. ज्ञानाची, शिकण्याची, संशोधनाची, नवनिर्मितीची भूक कायम ठेवा. कधीही थांबू नका. वेडे व्हा, लोकांची चिंता करू नका. त्यांनी मूर्ख म्हटले तरी चालेल. वेडी आणि जगाच्या दृष्टीने मूर्ख असलेलीच माणसं इतिहास बदलतात. विशेष म्हणजे तो संपूर्ण शाकाहारी होता व बौद्ध धर्माप्रमाणे त्याचे आचरण होते.
रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११