दहशतवाद आणि पाक…

0
47

वेध
‘लष्कर-ए-तोयबा’ आणि  ‘जैश-ए-मोहम्मद’ यांसारख्या दहशतवादी संघटना आमच्याच देशात सक्रिय आहेत, अशी जाहीर कबुली, पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी दिली आहे. यामुळे ‘ब्रिक्स’ परिषदेतील घोषणापत्रात आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा जो उल्लेख झाला, त्यावर आसिफ यांनी शिक्कामोर्तबच केले आहे! पंतप्रधान मोदी यांनी सातत्याने आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुद्दा लावून धरला होता. आरंभी ‘ब्रिक्स’ परिषदेतील घोषणापत्र फेटाळणार्‍या पाकलाही अखेर सत्याचा नाइलाजाने का होईना स्वीकार करावाच लागला. अमेरिकेनेही पाकबाबतचे आपले धोरण पहिल्यांदाच कठोर केले, असे स्पष्ट दिसते. गेल्या दीड दशकामध्ये अमेरिकेकडून पाकिस्तानला २० अब्ज डॉलर्सची मदत मिळाली. ही मदत दहशतवादाविरोधात लढाई या नावाखाली केली गेली. मात्र, प्रत्यक्षात हा पैसा पाकिस्तान वेगळ्याच कारणासाठी वापरत असल्याचे दिसून आले. प्रामुख्याने या पैशाचा वापर धार्मिक मूलतत्त्ववाद्यांना आणि दहशतवाद पोसण्यासाठी पाकिस्तान करत असल्याची कल्पना अमेरिकेलाही होती; मात्र भूराजकीय अपरिहार्यतेमुळे पाकिस्तानला न दुखावण्याचे धोरण अमेरिकने स्वीकारले होते. मात्र, आताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगळ्याच धाटणीचे आहेत. आक्रमक राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी इस्लामिक दहशतवादाच्या विरोधातील भूमिका सातत्याने मांडली होती. तसेच सत्ता हाती येताच सात इस्लामिक राष्ट्रांवर बंदी घालून त्यांनी, आपण या भूमिकेवर ठाम असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र, या राष्ट्रांमध्ये पाकिस्तानचा समावेश नव्हता. त्यामुळे ओबामांप्रमाणेच फक्त बोलणे आणि कृती न करणे, हेच धोरण पाकिस्तानबाबत पुढेही सुरू राहील, असे वाटत होते. मात्र, अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांबाबत अमेरिकेचे धोरण जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानला गंभीर इशाराही दिला आहे. पाकिस्तानच्या भूमीतून दहशतवादाला खतपाणी घातले जात असून, ते थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. विशेषत: अफगाणिस्तानातील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानातील चाळीस टक्के भाग तालिबानने व्यापलेला आहे. त्याला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानातील पेशावर आणि क्वेटा या दोन्ही शहरांची नावे घेतली असून, या शहरांमध्ये दहशतवाद्यांची प्रशिक्षण तळे असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने देऊ केलेल्या मदतीचा गैरवापर होत असून, पाकिस्तानच्या पाठिंब्यामुळे अफगाणिस्तानातील दहशतवाद वाढतो आहे, त्यामुळे पाकिस्तानने त्यावर त्वरित नियंत्रण आणणे गरजेचे आहे, असा खरमरीत इशारा त्यांनी दिला आहे. या इशार्‍यामुळे पाकिस्तान हादरला आहे आणि संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानकडे लागले आहे. आतापर्यंत अमेरिका उदारपणे मदत करत होती ती भविष्यात थांबेल, हे पक्के झाले आहे. गतवर्षी गोव्यामध्ये झालेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या पाकिस्तानशी असणार्‍या मैत्रीवर जोरदार आक्षेप घेतला होता. आज जगभरातील चीनसारखे काही देश आपल्या राजकीय सोयीसाठी किंवा स्पर्धक अथवा शत्रुराष्ट्रावर कुरघोडी करण्यासाठी अप्रत्यक्षपणे दहशतवादाला खतपाणी घालत असतात अथवा पाठबळ देत असतात. मात्र, दहशतवाद हा भस्मासुर आहे. तो आज ना उद्या त्यांच्यावरही उलटू शकतो, याची जाणीव चीनने ठेवली तर अधिक चांगले होईल…
अभिजित वर्तक ९४२२९२३२०१