मोदींचे मंत्रिमंडळ…

0
77

अग्रलेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल केल्यानंतर, आज त्यांच्या या मंत्रिमंडळाची पहिली बैठक होत आहे. या पहिल्या बैठकीत मोदी काय बोलतात, नव्या मंत्र्यांना काय संदेश देतात अन् भविष्याच्या दृष्टीने कोणत्या अपेक्षा व्यक्त करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मोदींनी विस्तार व फेरबदल केल्यानंतर लागलीच ते चीनच्या दौर्‍यावर गेले होते. चीनमधून ते म्यानमारला गेलेत अन् दौरा यशस्वी रीत्या आटोपून ते परत आले. आल्यानंतर आता ते पहिल्यांदाच आपल्या सहकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. केंद्रात भाजपाच्या नेतृत्वातील रालोआचे सरकार सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदींनी तिसर्‍यांदा आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात यांना स्थान मिळणार अन् त्यांची गच्छंती होणार, अशा प्रकारच्या अनेक बातम्या आल्या. फार आधीपासून वृत्तवाहिन्यांवर या विस्ताराची चर्चा होती. प्रसारमाध्यमांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होणार्‍यांची जी नावे सांगितली होती, त्यापैकी एकही नाव न आल्याने ज्या बातम्या दाखविण्यात आल्या होत्या, त्याची विश्‍वसनीयता पार संपुष्टात आली. मोदींनी वेगळीच नावे जाहीर करून सगळ्यांनाच आश्‍चर्यचकित केले होते. जरी मोदींनी आश्‍चर्यचकित केले असले, तरी टीका करण्याची फार संधी त्यांनी कुणाला दिली नाही. दोन आयएएस, एक आयपीएस आणि एक आयएफएस अशा चार माजी नोकरशहांना मंत्रिमंडळात सहभागी केल्यावरून मोदींचा आपल्या सहकार्‍यांपेक्षा नोकरशहांवर जास्त विश्‍वास आहे, अशी टीका तेवढी झाली. पण, टीकाकार एक बाब विसरले आणि ती म्हणजेे सत्यपालसिंग हे आयपीएस आणि आर. के. सिंग हे आयएएस असलेले माजी नोकरशहा २०१४ च्या निवडणुुकीत लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे ते मोदींचे सहकारीच आहेत. शिवाय, मंत्रिमंडळातून ज्यांची गच्छंती झाली, त्यांच्याबद्दलही कुणी नाराजी व्यक्त केल्याची बातमी नाही. जे गेले त्यांच्याबद्दल कुणीही सहानुभूती व्यक्त केली नाही. त्यामुळे जो काही फेरबदल आणि विस्तार झाला आहे, तो योग्य आहे आणि या विस्तारातूून पंतप्रधान मोदी यांचा दूरदर्शीपणाच दिसून आला आहे. बुद्धिबळाच्या खेळात केवळ पुढची चाल निश्‍चित करणारा खेळाडू चांगला नसतो, तर एकाच वेळी पुढच्या अनेक चाली डोक्यात ठेवून खेळणारा चांगला खेळाडू ठरतो. मोदींच्या बाबतीत नेमकी ही बाब लागू ठरते. मोदी फार पुढचा विचार करून निर्णय घेत असतात, हे देशाने अनुभवले आहे. खात्यांमधला फेरबदल आणि विस्तार करून मोदी यांनी पक्षातल्या आणि सरकारमधल्या अनेकांना एक ठोस संदेश दिला आहे. जनहिताची प्रभावी कामे केलीत, तर मंत्रिमंडळातील स्थान कायम राहील आणि कामगिरी दमदार नसेल तर बाहेर जाण्याचा दरवाजा खुला आहे, हे मोदींनी नव्या रचनेतून स्पष्ट केले आहे. जात, धर्म, प्रांत आणि भाषा या आधारावर मंत्रिमंडळात वर्णी लावली जाणे हे तर ठीकच, पण त्याआधी योग्यता महत्त्वाची मानून मगच मोदींनी धर्म, भाषा, प्रांत याला महत्त्व दिले, हे लक्षात घेतले पाहिजे. अमुक एक विशिष्ट जातिधर्माचा आहे म्हणून त्याला मंत्रिमंडळात घेतलेच पाहिजे, असा विचार न करता प्रत्येकाची योग्यता तपासूनच मोदींनी नव्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान दिले अन् काहींना पदोन्नती दिली, तर नितीन गडकरी यांच्यासारख्या दबंग व दूरदृष्टी असलेल्या कार्यक्षम मंत्र्याकडे जलंपदेसारखे अतिशय महत्त्वाचे खाते अतिरिक्त म्हणून सोपविले. एकप्रकारे नितीन गडकरी यांंनी गेल्या तीन वर्षांत रस्ते विकासाच्या क्षेत्रात जी अतुलनीय कामगिरी केली आहे, तिचा मोदींनी गौरवच केला आहे. मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात केलेले बदल भलेही २०१७ मध्ये केले असतील, पण त्याची झलक २०१९ साली दिसणार आहे. २०१९ नंतर देशात जे चित्र दिसणार आहे, त्याची झलक म्हणजे मंत्रिमंडळात झालेले फेरबदल आणि विस्तार आहे. मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान मिळणार, याच्या बातम्या अंदाज लावून देण्यात आल्या होत्या, ते सगळे अंदाज मोदी यांनी खोटे ठरविले. माध्यमांची जी विश्‍वसनीय सूत्रे होती, तीही कशी बोगस होती, हेही मोदींनी कृतीने दाखवून दिले. ज्या चार माजी नोकरशहांना मोदींनी मंत्रिमंडळात स्थान दिले, ते चारही नोकरीत असताना प्रामाणिक होते, कार्यक्षमही होते. ज्या आर. के. सिंग यांनी ‘हिंदू आतंकवाद’ या शब्दाचा उच्चार केला होता, तो शब्द त्यांच्या मंत्री बनण्याच्या मार्गात न येण्याचे कारण म्हणजे त्यांची कार्यक्षमता! बिहारमधून अश्‍विनीकुुमार चोबे यांना स्थान देण्यात आले आहे. ते बिहारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. ‘घर घर मे हो शौचालय का निर्माण, तभी होगा लाडली बेटी का कन्यादान’ हा नारा लोकप्रिय करण्यासोबतच चौबे यांनी बिहारमधील महादलित कुटुंबांच्या घरी ११ हजार शौचालये बांधून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मोदींनी योग्य निर्णय घेतला आहे. त्याचे चांगले परिणाम येणार्‍या काळात दिसतीलच. मोदींनी मंत्रिमंडळ विस्तार करताना जातपात अन् प्रांत या बाबींचा विचार केला, अशी कितीही टीका काही लोक करीत असले तरी त्यात फार तथ्य नाही. कारण, मोदींनी योग्यतेला प्राधान्य दिले आहे आणि प्रामाणिकपणाला गुण दिले आहेत. शेवटी मोदींना चांगले परिणाम अपेक्षित आहेत. मित्रपक्षांना स्थान देण्यासाठी आणखी एखादा विस्तार होऊ शकतो. पण, भाजपाच्या खासदारांसाठी हा अखेरचा विस्तार होता, असे मानायला हरकत नाही. चांगले काम करणार्‍या चार राज्यमंत्र्यांना मोदी यांनी पदोन्नती दिली आहे. निर्मला सीतारामन् यांना केवळ पदोन्नतीच दिली असे नव्हे, तर सगळ्यांना धक्का देत मोदी यांनी त्याना संरक्षणमंत्री बनविले आहे. सीतारामन् यांनी राज्यमंत्री म्हणून काम करताना जे परिश्रम घेतलेत, जो प्रामाणिकपणा दाखविला, काम करण्याची चिकाटी दाखविली, अपेक्षित परिणाम दिले, त्यामुळे प्रसन्न होत मोदींनी त्यांच्यावर एवढी प्रचंड जबाबदारी सोपविली आहे, ही बाब लक्षात घेणेही गरजेचे आहे. कोळसा मंत्रालयाची जबाबदारी ज्या कौशल्याने पीयूष गोयल यांनी हाताळली, ती बाब लक्षात घेत मोदींनी त्यांना पदोन्नतीसोबतच रेल्वे खात्याची अतिरिक्त जबाबदारीही दिली आहे. ही त्यांच्या गुणवत्तेची पावती आहे. निष्ठापूर्वक काम करणारे पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही केवळ दमदार कामगिरीच्या आधारावरच मोदी यांनी कॅबिनेटचा दर्जा दिला. ‘पंतप्रधान उज्ज्वला योजना’ ज्या प्रभावीपणे राबवून प्रधान यांनी गरीब महिलांच्या स्वयंपाकघरातील धूर नष्ट केला, ती बाब लक्षात घेत त्यांना ही पदोन्नती दिली आहे. अल्पसंख्यक व्यवहार खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करताना जो समतोल मुख्तार अब्बास नकवी यांनी साधला, जे काम केले त्याची पावती म्हणून त्यांनाही पदोन्नती मिळाली. नव्या-जुन्यांचा आणि ज्येष्ठ-तरुणाईचा संगम साधत मोदींनी आपले मंत्रिमंडळ तयार केले आहे. हे मंत्रिमंडळ भविष्यात कशाप्रकारे देशकारण करणार, अर्थकारण कसे यशस्वी करणार, अच्छे दिन कसे आणणार, हे पाहण्यासारखे राहील. नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ मोठे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आता असे घडणार आहे की, पंतप्रधानांसोबत जे पाच मंत्री महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी एकत्र बसतात, त्या पाचमध्ये सुषमा स्वराज आणि निर्मला सीतारामन् अशा दोन महिलांचा समावेश असेल. हे असे पहिल्यांदाच घडणार आहे. मोदींनी विस्तार केल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक होत आहे. या बैठकीत ते आपल्या सहकार्‍यांना काय मंत्र देतात, हे जाणून घेण्याची देशवासीयांची उत्सुकता योग्यच म्हटली पाहिजे!