‘इरमा’ चक्रिवादळाच्या तडाख्याने ३२ जणांचा मृत्यू

0
204

मियामी, ११ सप्टेंबर  
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात धुमाकूळ घालणार्‍या ‘हार्वे’ नंतर आता फ्लोरिडा प्रांताला ‘इरमा’ चक्रिवादळाने भीषण तडाखा दिला आहे. ताशी सुमारे २०० किमीच्या वेगाने धडकलेल्या या चक्रिवादळात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू आणि अन्य असंख्य जखमी झाले आहेत. त्यानंतर या वादळाचा प्रभाव कमी झाला असून ते दक्षिण जॉर्जियाच्या दिशेने ८५ किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे सरकत आहे.
फ्लोरिडातील किनारपट्टीच्या भागात समुद्राचे पाणी शिरण्याची शक्यता असल्याने नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील ६० लाखांहून अधिक नागरिकांना इरमा वादळामुळे सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी घटना आहे. इरमा हे १९२१ नंतरचे सर्वांत मोठे वादळ आहे.
इरमाचा वादळामुळे फ्लोरिडा प्रांतात वीज पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे लाखो घरे अंधारात आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तब्बल ६४० किलोमीटर क्षेत्राला तडाखा दिलेल्या वादळाची फ्लोरिडातून पश्‍चिम किनारपट्टीकडे सरकताना तीव्रता कमी झाली. या वादळामुळे  वार्‍याचा वेग तब्बल २०० किलोमीटर प्रति तास झाला होता.रविवारी रात्री ताम्पा आणि मार्को आयलंडवर तुफानी वादळ धडकले. सोबतच मियामीत चक्रीवादळाने हाहाकार माजवला. तर, ब्रिकेलमध्ये महापूर आला.
आताही या शहरात जोरदार पाऊस होत आहे. वादळामुळे दहा लाखांहून अधिक घरे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. प्यूर्टो रिको आणि अन्य समुद्रकिनार्‍यावरील शहरांत आपात स्थितीशी दोन हात करण्यासाठी अमेरिकन सैन्याचे ७४०० जवान आणि अभियर्ंते तैनात केले आहेत. याशिवाय १४० विमाने, ६५० ट्रक, १५० नौका तयार ठेवल्या आहेत. (वृत्तसंस्था)