सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ खुलाशामुळे शिवसेनेचा दावा ठरला खोटा

0
65

– राष्ट्रवादी-भाजपा युतीच्या अफवाच 
– सामनातील लेखामुळे गोंधळ
नवी दिल्ली, ११ सप्टेंबर  
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कधीही भेटले नाही, असा खुलासा खुद्द पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सोमवारी केला. त्यामुळे आता मोदी आणि पवार भेटीसंदर्भातील शिवसेनेचा दावा साफ खोटा ठरला आहे.
एका वृत्तवाहिनीकडे सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांमध्ये भेट झाली त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे तिथे उपस्थित होत्या. पंतप्रधान मोदींनी सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या लेखात केला होता. शरद पवारांनीच आपल्याला ही माहिती दिली, असे राऊत यांचे म्हणणे आहे. रविवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दीवर्ष सांगता सोहळ्याला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचदिवशी हा लेख प्रसिद्ध झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजपा युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांना स्थान देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विचार होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या मुखपत्रात केला होता. ‘सामना’चे संपादक व शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीचा उल्लेख केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रालोआमध्ये सहभागी होणार आहे का?, असा थेट प्रश्‍न आपण शरद पवारांना विचारल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या प्रश्‍नाला उत्तर देताना या सर्व चर्चांमागे अफवा असल्याचे पवारांनी सांगितले. याशिवाय पवारांनी पंतप्रधान मोदींसोबत नुकत्याच झालेल्या भेटीचाही संदर्भ दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सुप्रिया सुळे यांना कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेऊ इच्छित होते, असे शरद पवारांनी संजय राऊत यांना सांगितले. मोदींनी कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देताच सुळे यांनी ती ऑफर नाकारली होती, असे पवारांनी राऊत यांना सांगितले. संजय राऊत यांनी या संपूर्ण घटनेचा उल्लेख त्यांच्या सामनामधील लेखात केला आहे. मी भाजपात प्रवेश करणारी शेवटची व्यक्ती  असेन, असे उत्तर सुळेंनी मोदींना दिले होते, असेही सामनाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)