नितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार

0
44

हंसराज अहिर यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली, ११ सप्टेंबर
महाराष्ट्रातील सिंचन क्षमता दुप्पट करण्याच्या केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्णयाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्वागत केले.
नितीन गडकरी यांनी अलीकडेच मुंबईत आयोजित एका बैठकीत महाराष्ट्रातील सिंचन क्षमता २० टक्क्यांवरून ४० टक्के करण्याची तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रलंबित सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची घोषणा केली. यासाठी ५५ हजार कोटींची तरतूदही गडकरी यांनी केली आहे. नितीन गडकरी यांच्या या घोषणेचे हंसराज अहिर यांनी स्वागत करताना गडकरी यांच्या नेतृत्वात सिंचनाच्या बाबतीत महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे त्याचा फायदा शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी होईल, परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्याही कमी होतील, याकडे अहिर यांनी लक्ष वेधले.
नितीन गडकरी यांच्यासारख्या दमदार नेतृत्वाकडे जलसंसाधन खाते सोपवल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानत नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात राज्यातील सिंचनक्षमता वाढण्यासोबतच नदीजोड प्रकल्पांच्या कामालाही गती मिळेल, असा विश्‍वास अहिर यांनी व्यक्त केला.
नितीन गडकरी यांनी केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सिंचन योजनांचा आढावा घेतला होता. तसेच या योजना लवकर पूर्ण करण्याचा निर्धारही व्यक्त केला होता.(तभा वृत्तसेवा)