पानगळ

0
247

सकाळची वेळ. माधवराव आराम खुर्चीवर टेकून सूर्य उगवण्यापूर्वीच्या त्या सोनेरी,केशरी प्रकाशाच्या छटा पाहत होते. सूर्य उगवायला अजून वेळ होता. पण, उगवणार्‍या सूर्याचा निरोप मात्र या मोहक छटा घेऊन आल्या होत्या. माधवरावांमधील चित्रकार तेव्हा मनाशी हसला. कुंचल्यांनी खरोखरीच रंग भरल्यासारखे ते आकाश दिसत होते.
आज पाहता पाहता त्यांच्या आयुष्याची ६० वर्षे अशीच निघून गेली होती. जबाबदार्‍या संपल्या होत्या. २५ व्या वर्षी जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ऑफिसमध्ये पाय ठेवला, तेव्हा हा सगळा प्रपंच सुरू झाला होता, तो एक दिवस आणि आजचा हा दिवस. मधले काहीच त्यांना आठवावेसे वाटत नव्हते. तो २० वर्षांचा माधव आणि आजचे माधवराव दोघेही सारखेच वाटले त्यांना. फक्त ते दिवस कधी उडून गेले कळले नाही आणि हे दिवस सरता-सरत नव्हते…! बाजूला ठेवलेला फोटो त्यांनी हाती घेतला. केशव, शरद आणि प्रज्वल! आणि त्यांच्या पोटात गोळा आला. ते सोनेरी, दंगा-मस्तीने भरलेले दिवस त्यांना आठवले आणि ‘त्या’ एका क्षणात त्यांना पुन्हा तरुण झाल्याचा भास झाला. सेवानिवृत्तीनंतर आज पहिल्यांदा त्या दिवसांत हरवून जाण्यासाठी कारण मिळाले होते.
‘‘ चार वाजेपासून उठलाय्, काय करत काय आहात? चहा घ्या …’’ मालतीबाईंनी हळूच त्यांना म्हणाल्या नि माधवराव त्या दिवसांतून भानावर आले.
‘‘रात्रभर झोपच आली नाही मला. पडून होतो नुसता. म्हणून चारपासून या खुर्चीवर विराजमान आपलं, दुसरं काही नाही.’’ त्यांनी उत्तर दिलं.
‘‘ इतकी उत्सुकता तर तुम्हाला आपल्या लग्नाच्या दिवशीही नव्हती.’’ त्या चहाचा कप पुढे करत खोडकर आवाजात म्हणाल्या आणि माधवराव हसले.
एव्हाना सूर्य पूर्ण उगवला होता आणि चहाही थंड झाला होता. मालतीबाई तेथून उठून कामाला लागल्या आणि माधवराव फेर्‍या मारायला लागले.
‘‘बस रे शांत. एक वाजता येणार आहेत तुझे जुने मित्र. आतापासून का येरझार्‍या मारतोय?’’ मालतीबाई कंटाळवाण्या स्वरात म्हणाल्या.
‘‘ हा केशव माहिती आहे? एवढा बंड होता की, परीक्षेपूर्वीच कॉपीची तयारी करायचा आणि प्रज्वल तर मला न विचारता माझे कपडे घेऊन जायचा आणि ते घेऊन कधीच परतायचा नाही.’’ मित्रांच्या त्या आठवणी लहानग्या पोराच्या उत्साहाने माधवराव सांगत सुटले.
‘‘अरे हो, पण आज ३० वर्षे होत आली त्या गोष्टीला, सगळेच आपआपल्या प्रपंचात व्यस्त असतील. सगळं काही आता बदलेले असेल, नाही? ’’ कपडे ठेवता ठेवता मालतीबाई सहज बोलून गेल्या. पण ही गोष्ट माधवरावांना बोचून गेली.
‘‘बदलेल कसं ? भेटायला या म्हटल्यावर येत आहेत ना सगळे .’’ माधवराव म्हणाले खरे, पण सारे काही बदललेले असेल, ही बाब त्यांना अस्वस्थ करून गेली. ३० वर्षांत फक्त ५-६ वेळा ते मित्रांशी फोनवर बोलले असतील आणि जुजबी चौकशी केली असेल एवढंच. आणि हेच कारण होते की, माधवरावांनी त्यांना घरी न बोलवता, आज एक वाजता जवळच्या सेंट्रल पार्क कॅफे मध्ये ते भेटणार होते.
वेळ जाता जात नव्हता. माधवरावांच्या हृदयाचे ठोके वाढत होते आणि त्यांना जुने दिवस आठवले. जे मित्र पहिले जा म्हटल्यावरही जात नव्हते, त्यांनाच भेटायला आज कारणं शोधावी लागत होती. त्यांनी आपला काळा कोट चढवला, जुने घड्याळ घातले आणि आपले काळे बूट पॉलिश केले. मालतीबाईंनी त्यांच्या मनातील अस्वस्थता ओळखली आणि माधवरावांना रुमाल देत त्या म्हणाल्या, ‘‘काळजी नका करू, काहीही बदललं नसेल. त्यांना उद्या घरी जेवायला बोलवा.’’ एक वाजला. माधवराव कॉफी हाऊसला पोहोचले. मॅनेजरनी त्यांना सांगितले की, ‘‘कुणी शरद काळे येऊन बसले आहेत. माधवरावांना पाय उचलणे कठीण झाले,‘शरद्या आला’ ते मनाशी पुटपुटले. टेबल नंबर चारवर एक मध्यवयीन माणूस निळा चौकड्यांचा शर्ट घालून बसला होता. आपला चष्मा ठीक करत तो कुठलेतरी वृत्तपत्र वाचत होता. त्याचे केस आणि मिश्या दोन्हीही पांढर्‍या झाल्या होत्या. बाजूला काळी लेदरची बॅग ठेवली होती. तो शरदच होता. वेळ न घालवता माधवराव पुढे गेले, ‘‘ अरे शरद, लवकर आलास?’’ ते म्हणाले. ‘‘ नाही, पाचच मिनिटे झाली.’’ तो म्हणाला. दोघेही एकमेकात झालेला फरक न्याहाळत होते कदाचित. ‘‘प्रवासात त्रास तर नाही ना झाला? ’’ माधवरावांनी काळजीपूर्वक विचारले.‘‘ नाही, नाही, कारच केली मी इथवर, बसचा प्रवास नाही सहन होत आजकाल. पाठदुखीचा त्रास आहे.’’ शरदराव कंटाळवाण्या स्वरात म्हणाले. ‘‘ पाठदुखी नकोच. मलाही नवीनच बीपीचा त्रास होत आहे. औषधं- गोळ्यांनी कंटाळला माणूस! माधवराव म्हणाले खरे, पण मित्रांमधल्या खोडकर संभाषणाला दवडून त्याची जागा आजाराने घेतली, हे मात्र त्यांना मुळीच आवडले नाही. दोघांतील शांतता तोडण्यासाठी शरदराव वेटरला बोलवत म्हणाले, ‘‘वेळ लागेल त्या दोघांना, जुनीच सवय आणि त्यांनी आपआपली कॉफी बोलावली.’’ बाहेरून येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांकडे माधवराव पाहत होते. रस्त्यावर सगळ्या गाड्या सुसाट धावत होत्या. पुढे..!! मागे जाण्यास मार्ग नव्हता. माधवराव मनाशी हसले. भविष्य गूढ असतं, म्हणून भयाण वाटतं. पण भूतकाळ ओळखीचा आहे, सवयीचा आहे म्हणून मागे नाही जात येत. काचेचा दरवाजा ढकलला गेला आणि माधवरावांची तंद्री तुटली. प्रज्वल आणि केशव सोबतच आत शिरले. वय झाले होते, वर्षे लोटली होती, तरीही आपल्या मित्रांना ओळखण्यात माधवरावांना क्षणाचाही विलंब झाला नव्हता. प्रज्वलची कंपनी जोरात सुरू होती, हे त्याच्या कपड्यांकडे पाहूनच कळत होते म्हणा! जो हात त्यांनी हात मिळविण्यासाठी केला, त्यात महागडी टायटनची घड्याळ होती, आलिंगन द्यायला उठलेल्या माधवरावांनीही मग हात पुढे केला. टायटन पुढे त्यांची जुनी घड्याळ फारच फिकी दिसत होती, पण वेळ आणि परिस्थिती दोन्हीही घड्याळ मात्र सारख्याच दाखवत होत्या. केशवने मात्र सर्वांनाच आलिंगन दिले, जुनीच सवय होती त्याची ‘गळ्यात पडण्याची!’ चौघांनीही एकमेकांकडे पाहून स्मित केले आणि आपआपल्या जागी बसले. ‘‘काय म्हणता..?’’ प्रज्वलराव नाटकी स्वरात म्हणाले.
‘‘सर्व ठीक! तुम्ही बोला!’’ हसतच शरदराव म्हणाले. चार चेहरे असूनही तिथे शांतता होती. शरदराव शिक्षक होते, आयुष्यच शाळेत गेलं. त्यांचा मुलगाही गणिताचा शिक्षक होता. सामान्य पण स्थायी आयुष्य ते जगत होते. केशवराव बँकेत काम करायचे, आता मुलीकडेच राहत होते. प्रज्वलराव मात्र जाम मजेत होते. मुलगा अमेरिकेत शिक्षण घेत होता. इतक्यातच मुलीचे लग्न झाले होते. सर्व आलिशान चालले होते त्यांचे! सगळ्यांचे व्यवसाय, मुलं-बाळांबद्दल बोलून झाले. माधवराव मात्र याकरिता आले नव्हते. चार चेहर्‍यांच्या चार वाक्यांच्या संवादांनंतर मात्र तिथे निरव शांतता पसरली. मालतीबाईंचे शब्द त्यांना आठवले , ‘‘सारे काही बदललेले असेल.’’ त्यांच्या मनातून वेदनेची लहर तरळून गेली. ‘‘खूपच मोठे झालो आम्ही सगळे!’’ ते स्वतःशीच बोलले. चार लोकांतील अस्वस्थता चौघांनाही जाणवत होते. बोलायचे तर खूप काही होते, हसायचे होते, रडायचे होते, पण शब्द मात्र कुठेतरी हरवले होते. कदाचित, आज त्या टेबलावर चार अनोळखी होते. बाजूच्या टेबलवर काही मुलं-मुली मनसोक्त हसत होती. माधवरावांना क्षणासाठी त्यांचा हेवा वाटला. उलटून जाणार्‍या काळा सोबत बहुधा त्यांची मैत्री, जवळीक ही उलटून गेली होती. कदाचित, सारे काही संपले होते. तरीही आज इतक्या वर्षांनंतर ते सोबत का होते? निराशेने माधवरावांनी बाहेर पहिले आणि ते अचानक म्हणाले, ‘‘अरे, ती आपल्या कॉलेजची सुमेधा आहे का?’’ सर्वांनी एक क्षण बाहेर पाहिले आणि सर्व कडाडून हसले. ते हास्य अविस्मरणीय होतं. ३० वर्षांनंतर त्या हसण्याचा स्वर आता या क्षणी आला होता. ‘‘सुधारशील का कधी?’’ प्रज्वलराव हसत म्हणाले. ‘‘अरे, पण आपल्या शरद्याची तर चांगली मैत्री होती तिच्याशी.’’ केशवरावांनी माहिती दिली आणि पुन्हा एकदा तिथे हसण्याचा लोट उडाला. सर्वांच्या डोळ्यांत पाणी तरळले. कारण सर्व मित्रांच्या मनात ती एकच भीती होती, अनोळख्या ओळखीची! ते सर्व मित्र आयुष्याच्या एकाच वळणावर उभे होते, गरज होती ती फक्त कुणा एकाच्या पुढे जाण्याची. माधवरावांना त्यांचे वेडे मित्र सापडले होते. संसाराच्या चक्रात ते हरवले नव्हते, त्यांची मैत्री हरवली नव्हती. त्यांच्या नात्यात तो ओलावा आजही होता. बाजूच्या टेबलावरील मुलं-मुली या वयोवृद्ध मित्रांचा दंगा कौतुकाने पाहत होती. पुढे आयुष्यात आपणही कुठे तरी असेच बसलेले दिसू, हे त्यांना जाणवले. चौघांनीही आपली आवडती कॉफी बोलावली आणि तितक्यात टीव्हीकडून त्यांाच्या कानावर आलं की, ‘‘रवींद्र जडेजा पहिला चेंडू खेळण्याकरिता मैदानावर उतरतोय’’ आणि त्यांच्या लक्षात आले की, आज भारत-बांगलादेश सामना आहे. ते दिवस परत आले त्यांचे. त्यांना ते सुंदर दिवस जगण्याची आयुष्याने त्यांना पुन्हा संधी दिली होती. सर्वांनी आपले कोट, घड्याळ, चष्मे ठेवले व ते मित्र आरामात खुर्चीवर विसावले, मॅच बघण्यासाठी. घड्याळ कितीही वेगाने पुढे जात होते. त्या मित्रांसाठी मात्र आज वेळ थांबला होता, नव्हे मागे फिरला होता. सामना रंगात आला होता. सगळीकडे जल्लोष होता. आज पुन्हा ते चार मित्र त्या दिवसांत, तशाच क्रिकेटच्या सामन्यात हरवले. मॅच संपली, कॅफेही रिकामा होत आला, पण गप्पांना शेवट सापडत नव्हता. आपल्या मित्रांकडे माधवराव पाहत होते. सुरकुत्या आलेल्या या चेहर्‍यांमध्ये त्यांना जुने चेहरे दिसत होते. काही नात्यांना मुद्दाम जपण्याची गरज नसते, ते भोवती दिसले नाही तरीही ते असतात! आज त्यांना इथे येऊन सुखाचा शोध लागला होता. काही गोष्टी मरेपर्यंत साथ सोडत नाही, कळले होते त्यांना!
– वैष्णवी घरोट