लष्कराच्या पदोन्नतीत भेदभाव

0
44

१०० अधिकारी सुप्रीम कोर्टात
नवी दिल्ली, ११ सप्टेंबर 
भारतीय लष्करात पदोन्नतीवरून भेदभाव होत असून याचा परिणाम जवांनाच्या मानसिकतेवर होत आहे, असा गंभीर आरोप लष्करातील १०० लेफ्टनंट व मेजर्सनी केला असून याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.लेफ्टनंट कर्नल पी. के. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या अधिकार्‍यांनी संयुक्त याचिका दाखल केली आहे. या याचिकेत लष्कर व केंद्र सरकारकडून पदोन्नतीत भेदभाव होत असल्याने याचिकाकर्त्यासह इतर अधिकार्‍यांवर अन्याय होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आर्मी कॉप्स प्रमाणेच सर्व्हिस कोरचीही जोखीम असलेल्या ठिकाणी नेमणूक केली जाते. ज्याप्रमाणे आर्मी कॉप्सला जोखमीचा सामना करावा लागतो तसाच सामना सर्व्हिसेस कोरच्या अधिकार्‍यांनाही करावा लागतो. दोघेही देशासाठी बलिदान करतात. पण असे असतानाही अधिकार्‍यांना पदोन्नती देताना मात्र जाणिवपूर्वक या दोन्ही अधिकार्‍यांमध्ये भेदभाव केला जात आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. यामुळे १०-१५ वर्षापासून उच्च पदावर कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होत असून ही देशाच्या सुरक्षिततेसाठी चिंताजनक बाब असल्याचेही या याचिकेत म्हटले आहे.
सर्व्हिसेस कोरच्या अधिकार्‍यांनाही नियमानुसार सर्व सोयी सुविधा मिळायलाच हव्यात. अन्यथा सरकार व लष्कराने आपातकालिन परिस्थिती वगळता संवेदनशील भागात सर्व्हिसेस कोरला तैनात करू नये, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)