शरद यादव, अली अन्वर अंसारी यांच्यावर राज्यसभा सचिवालयाची नोटीस

0
15

नवी दिल्ली, १२ सप्टेंबर 
तुमचे राज्यसभा सदस्यत्व रद्द का करण्यात येऊ नये, अशा आशयाची नोटीस राज्यसभा सचिवालयाने जदयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव आणि अली अन्वर अंसारी यांच्यावर आज मंगळवारी बजावली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील महाआघाडी तोडत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शरद यादव यांनी नितीशकुमार यांच्या या निर्णयाला विरोध केला, त्यामुळे या दोन नेत्यांमधील संबंध तणावपूर्ण झाले. राजद नेते लालुप्रसाद यादव यांनी २७ ऑगस्टला पाटण्यात आयोजित केलेल्या मेळाव्यात शरद यादव पक्षादेशाचे उल्लंघन करत उपस्थित राहिले होते. शरद यादव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत जदयूच्या नितीशकुमार गटाने शरद यादव आणि अली अन्वर अंसारी यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली होती. त्यानुसार राज्यसभा सचिवालयाने आज शरद यादव आणि अली अन्वर अंसारी यांच्यावर नोटीस बजावली आहे.
जदयू नितीशकुमार गटाने शरद यादव यांची याआधीच सांसदीय पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. आपला गटच मूळ जदयू असल्याचा दावा करत पक्षाचे निवडणूक चिन्ह आपल्या गटाला मिळण्याची मागणी शरद यादव यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक चिन्हावर दावा करण्याची शरद यादव यांची कृतीही पक्षविरोधी कारवाई असल्याचे नितीशकुमार गटाने म्हटले आहे. शरद यादव यांच्या पक्षविरोधी कारवायाची यादीच जदयू नितीशकुमार गटाने राज्यसभा सचिवालयाकडे सादर केली होती. कोणत्याही राज्यसभा सदस्याने दुसर्‍या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात जाणे हा पक्षशिस्तीचा भंग असल्याचा दावा करताना याआधी भाजपाचे जयप्रसाद निषाद यांनी राजदमध्ये प्रवेश केल्यावर त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द झाले होते, याकडे जदयूच्या नेत्यांनी लक्ष वेधले. (तभा वृत्तसेवा)