शशिकला यांची हकालपट्टी

0
16

-• अण्णाद्रमुकमध्ये ‘अम्मा’युग
चेन्नई, १२ सप्टेंबर
अण्णाद्रमुकने व्ही. के. शशिकला यांचे सरचिटणीसपद काढून घेतले असून त्यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षात आता ‘अम्मा’ (जयललिता) युग पुन्हा अवतरल्याची चर्चा आहे.
पन्नीरसेल्वम आणि पलानीस्वामी गटातर्फे आज मंगळवारी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. त्यात शशिकला यांच्या हकालपट्टीचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावाची तामिळनाडूचे मंत्री आर. बी. उदयकुमार यांनी माहिती दिली.
दिवंगत अम्मांनी (जयललिता) निवड केलेले पक्षाचे पदाधिकारी यापुढेही पदावर कायम राहतील. पक्षात अखंडता कायम राहील तसेच निवडणूक चिन्ह ‘दोन पाने’ परत मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे ते म्हणाले. अस्थायी सरचिटणीसपद संपुष्टात आणण्यावरही यावेळी एकमत झाले. त्यानंतर शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. जयललिता या सरचिटणीसपदी (स्थायी) कायम राहतील आणि टी. टी. व्ही. दिनकरन यांनी केलेली घोषणा पक्षाला लागू होणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये फूट पडली होती. अलीकडेच पक्षातून फुटून निघालेल्या पन्नीरसेल्वम गटाशी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी दिलजमाई केली होती. या घडामोडींनी नाराज झालेल्या २२ आमदारांनी पलानीस्वामी सरकारचा पाठिंबा काढला आणि पलानीस्वामी सरकार अल्पमतात आले. हे सर्व आमदार शशिकला यांचे पुतणे दिनकरन यांचे समर्थक आहेत.
मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात नुकतीच पक्षाची बैठक झाली. या बैठकीत शशिकला, दिनकरन यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. जयललिता यांच्यानंतर शशिकला यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व गेले. पक्षाच्या १३४ आमदारांच्या पाठिंब्यावर त्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार होत्या.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि शशिकला यांचे स्वप्न भंगले. (वृत्तसंस्था)