प्राण तळमळला… आलासे मातृभूमीला!

0
57

– स्वप्नांच्या देशातून परतून स्वदेशी वास्तवाला भिडणार्‍या तरुणाची कथा
पवनकुमार लढ्ढा
चिखली, १२ सप्टेंबर 
चित्रपट वास्तवावर बेतलेले असतात की वास्तव चित्रपटांपासून प्रेरणा घेत असतं? कधी असं अन् कधी तसं असतं… आशुतोष गोवारीकर- शाहरुख यांचा ‘स्वदेस’ पाहिलत का? त्यात अमेरिकेत राहणारा एक तरुण शास्त्रज्ञ आपल्या आजीला तिकडे न्यायला गावात येतो अन् मग जे काय होतं ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे झालेय… मात्र, वास्तवातला हा नायक अमेरिकतेली ‘डॉलरी’ नोकरी सोडून गावाच्या, शेती-मातीच्या कळवळ्याने आला अन् त्याने त्याच्या परिघातला नक्षाच बदलून टाकला…
कृषिशास्त्रातील पदवी मिळविल्यानंतर थेट अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरेट (पीचडी) मिळविली आणि तेथेच शास्त्रज्ञ म्हणून डॉलर कमवून देणारी नोकरीही मिळाली, मात्र या सर्व बाबींचा मोह टाळत गाव गाठून शेतीपुरक व्यवसाय सुरू करण्याचे धाडस चिखली येथील डॉ.अभिषेक भराड या तरुणाने केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले होते, पाश्‍चात्य देशात गेलेले भारतातील मेधावी तरुण परत मातृभूमीकडे येतील… त्यांच्या या वक्तव्याच्या आधीच अभिषेकने त्याची सुरुवात केली आहे. मातृभूमी, आपले गाव हे तर फार दूरचे, आपल्या म्हातार्‍या माय-बापांनाही इकडे एकटे सोडून स्वप्नांच्या देशांच्या मोहपाशात तरुण अडकले असतात. डॉलर कमवून देणारी नोकरी सोडून गावी परतण्याचा साधा विचारही कोणाच्या मनात डोकावत नाही, मात्र चिखली येथील सिंचन विभागातून सेवानिवृत्त झालेले अभियंता भागवत भराड यांचे सुपुत्र डॉ. अभिषेक यांनी हे सर्व त्यागून गावी परतण्याचा पायंडा पाडला आहे. अमेरिकेतील जैविक इंधन मध्ये शास्त्रज्ञ पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि शेती करण्यासाठी त्यांनी थेट साखरखेर्डा गावाची वाट धरली.
डॉ.अभिषेक भराड यांनी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे बीएससी अँग्री हे पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील ल्युसीयाना स्टेट विद्यापीठातून मास्टर्स (एम.एस.) आणि डॉक्टरेट (पीच.डी.) चे उच्च शिक्षण घेतले व याच विद्यापीठात शास्त्रज्ञ म्हणून जवळपास दोन वर्षे नोकरीदेखील केली. विदेशात ८ वर्षे होते, मात्र गावच्या मातीशी असलेली नाळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेतकरी कुटुंबातून असल्याने तसेच कृषिशास्त्रातील उच्च शिक्षण घेतले असल्याने आपल्या जन्मभूमीतच आणि याच क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेने त्यांना परत गावाकडे येण्यास भाग पाडले.
चिखली येथे आल्यानंतर कुटुंबीयांशी चर्चा करून साखरखेर्डा येथे शेतीपुरक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. यास कुटुंबीयांनीही तसेच साखरखेर्डा येथील काटे परिवारानेसुद्धा साथ दिली. शेतीपुरक व्यवसायाअंतर्गत सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती, गोमुत्र व गाईच्या शेणापासून विविध उत्पादने निर्मिती, शेळी पालन, कुकुट पालन व इतर व्यवसाय ते यशस्वी पणे करीत आहेत.
शिक्षणाचा इतरांनाही लाभ व्हावा म्हणून डॉ. अभिषेक शेतकरी कुटुंबातील अनेक सुशिक्षित तरुणांना मार्गदर्शन करीत असतात. यासाठी त्यांनी तरुणांचा एक गट स्थापन केला असून, या गटाच्या माध्यमातून नियमितपणो त्रैमासिक मोफत कार्यशाळा घेतात. सेंद्रिय शेतीत तयार झालेल्या शेतकर्‍यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची त्यांची तळमळ आहे व त्या प्रमाणे ते सदर उत्पादने बुलढाणा, औरंगाबाद व इतर ठिकाणी विक्री साठी शेतकर्‍यांना मदत करतात. रासायनिक शेतीमुळे होणारी नापिकी व अवास्तव खर्च टाळण्यासाठी त्यांनी सेंद्रिय खत व पिकांवर पडणार्‍या विविध रोगावर त्यांनी जैविक औषधींचीसुद्धा निर्मिती केली आहे. ही औषधं अत्यल्प दरांमध्ये ते शेतकर्‍यांना उपलब्ध करून देतात. शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी तसेच महिला बचत गट, तसेच शेतकर्‍यांना शेतीपुरक जोड व्यवसायाचे ते विनामूल्य मागर्दर्शन करतात.
डॉ.अभिषेक यांनी १२ लाख रुपयांची गुंतवणूक करून शेतीपूरक शेळी व्यवसायसुद्धा उभारला आहे. १२० शेळ्यांपासून सुरुवात त्यांनी केली होती. वर्षभरात त्यांची संख्या दुप्पट झाली. आज त्यांच्याकडे २५० शेळ्या आहेत. वर्षभरात त्यांना या व्यवसायातून १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यातील सात लाख रुपयांचा खर्च वजा केला असता तीन लाखांचा नफा निव्वळ मिळाला. आफ्रिकन बोर, बीटल, जमुनापारी, सिरोही, सोजात, उस्मानाबादी व इतर अशा आठ प्रकारच्या शेळ्या त्यांच्याकडे आहेत. हा व्यवसाय करतानाच इतर व्यवसायीकांना शेळ्यांच्या क्रॉस ब्रिडींगसाठीचे प्रशिक्षणही ते देतात. आपले ज्ञान व अनुभव यांचा फायदा आपल्या गावगाड्यासाठी करण्याची त्यांची ही धडपड अनेकांना प्रेरणा देणारीच आहे.