राहुल गांधींना बडबडण्याची सवयच : इराणी

0
55

-• परदेशात जाऊन भारतावर टीका करणे चुकीचे
नवी दिल्ली, १२ सप्टेंबर 
कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे देशात कोणी ऐकत नाही, त्यामुळे परदेशात जाऊन ते बडबडत असतात, मात्र परदेशात जाऊन आपल्या देशावर टीका करणे हे औचित्याला धरून नसल्याचे भाजपा प्रवक्त्या आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आज मंगळवारी स्पष्ट केले.
नोटबंदीचा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला, हा राहुल गांधी यांचा आरोप खोडून काढताना स्मृती इराणी यांनी त्यांना या मुद्यावर संसदेत वा संसदेच्या बाहेर कोणत्याही व्यासपीठावर खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले.
आपल्या अमेरिका दौर्‍यात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत स्मृती इराणी यांनी याबद्दल राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यात काही नवीन नाही. मोदी यांच्यावर कोणत्याही गोष्टीसाठी तुटून पडण्याची त्यांची सवयच झाली आहे. हा त्यांच्या विफल राजकारणाचा एक भाग झाला आहे, याकडे लक्ष वेधत इराणी म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या राजकीय वेदना व्यक्त करताना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृृत्वावर विश्‍वास व्यक्त केल्याचा विसर त्यांना पडला असावा. देशातील जनता राहुल गांधी यांच्या कोणत्याच मताशी सहमत नसल्यामुळे ते परदेशात जाऊन आपल्या व्यथा व्यक्त करीत आहेत. पण, देशातील नागरिकच मतदार असतात आणि मतदारांनी मोदींच्या नेतृत्वावर याआधीच विश्‍वास व्यक्त केला आहे.
आपल्या सफलतेचा आणि विफलतेचा आढावा राहुल गांधी यांनी अमेठी या आपल्या लोकसभा मतदारसंघात जाऊन घेतला पाहिजे, असा टोला मारत इराणी म्हणाल्या की, अमेठीत आपण किती विकास कामे केली, लोकांच्या समस्या सोडवल्या, याचा आढावा राहुल गांधी यांनी घेतला असता तर ‘दूध का दूध पानी का पानी’ झाले असते.
२०१२ मध्ये कॉंग्रेस पक्षाला अहंकार आला होता, त्याचीच परिणती आमच्या पराभवात झाली, या राहुल गांधी यांच्या विधानाकडे लक्ष वेधताना इराणी म्हणाल्या की, राहुल गांधी यांचे विधान म्हणजे कॉंग्रेस पक्षाला एकप्रकारे घरचा अहेरच आहे. हा कॉंग्रेससाठी चिंतेचा विषय म्हणावा लागेल. अशी कबुली देत राहुल गांधी यांनी एकप्रकारे आपल्या आईवरच टीका केली आहे.
घराणेशाहीच्या राजकारणात अपयशी ठरलेल्या राहुल गांधी यांनी आपल्या अपयशी राजकारणाचा पाढा अमेरिकेत जाऊन वाचला. भारतात सर्व काही घराणेशाहीने होते, असे म्हणताना त्यांनी अखिलेश यादव आणि अभिषेक बच्चनचे उदाहरण दिले होते. भारताने कधीच घराणेशाहीचे समर्थन केले नाही. त्यामुळेच एका शेतकर्‍याचा, मागासवर्गीयाचा आणि समाजातील तळागाळातील मुलगा या देशात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यासारख्या घटनात्मक पदावर विराजमान झाला आहे, यावरून भारतातील लोकशाहीत गुणवत्तेने अशी निवड होते, घराणेशाहीने नाही, असे दिसून येते, याकडे इराणी यांनी लक्ष वेधले.
नोटबंदी आणि जीएसटी यासारख्या मुद्यांवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे, याचा संदर्भ देत इराणी म्हणाल्या की, जीएसटी मुद्यावर कॉंग्रेसच्या सरकारने विविध राजकीय पक्षांना आणि देशातील राज्य सरकारांना विश्‍वासातच घेतले नाही, त्यांनी आपली अडेलतट्टू भूमिका सोडून सर्वांना विश्‍वासात घेतले असते, तर जीएसटी कॉंग्रेस सरकारच्या राजवटीतच पारित झाले असते. नोटबंदीचा देशाच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम झाला, हा राहुल गांधी यांचा आरोप खोडून काढताना स्मृती इराणी यांनी त्यांना या मुद्यावर संसदेत वा संसदेच्या बाहेर कोणत्याही व्यासपीठावर खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले. जम्मू-काश्मीरच्या विद्यमान समस्येसाठी इराणी यांनी कॉंग्रेसच्या आधीच्या सरकारांना जबाबदार धरले.
कॉंग्रेसने केले राहुल गांधींचे समर्थन
अमेरिकेत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे कॉंग्रेसने समर्थन केले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या विधानातून परदेशात भारताची मान उंचावली, एका मुत्सद्दी नेत्यासारखे त्यांचे विधान आहे, असे कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. राहुल गांधी यांनी आपल्यामधील त्रुटींची कबुली देतानाच सरकारच्या अपयशाचाही उल्लेख केला, असे स्पष्ट करत शर्मा म्हणाले की, आपल्या संतुलित भूमिकेने राहुल गांधी यांनी परदेशात भारताची मान उंचावली. परेदशात भारताचा सर्वाधिक अपमान कोणी असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. भारताची प्रतिमा जगात एका भ्रष्ट देशाची आहे, असे विधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या परदेश दौर्‍यात केले होते. (तभा वृत्तसेवा)